top of page

माझी आवडती विज्ञान कादंबरी - ‘प्रेषित’


अंतरिक्षाची ओढ प्रत्येक मानवाला जन्मजात असतेच. लहाणपणी चिऊ-काऊचे घास देखील आपल्याला आईने चांदोमामा दाखवून भरवलेले असतात,  आकाशातील टिमटिमणाऱ्या चांदण्या बघून लहान मुले “ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार” गुणगुणू लागतात. सांगायचे तात्पर्य म्हणजे आपल्या अवतीभवती पसरलेले विस्तिर्ण आणि अफाट आकाश नानातऱ्हेने आपल्याला खूणावतं असते. “देवा तुझे कित्ती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो !” जिथे आपल्यासारख्या सामान्यांना त्या आसमंताप्रती इतके कुतुहल , इतके अप्रुप , इतके प्रश्न असतील, तिथे वैज्ञानिक , शास्त्रज्ञ, खगोल शास्त्रज्ञ यांबद्दल काय सांगावे !

 

‘ प्रेषित ’ डॅा. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकादंबरी, जिचे प्रकाशन मौज प्रकाशन द्वारा सन् १९८३ मध्ये झाले. मी ही कादंबरी पहिल्यांदा वाचली साधारण १९९४-९५ च्या सुमारास वाचली होती, शाळेचे ग्रंथालय माझ्यासाठी अलिबाबाची गुहा होती, ‘ टिळा-टिळा दार उघडं’ म्हणावं आणि अमूल्य अशी साहित्य रत्न आपल्या ओंजळीत अलगद येऊन पडावी ! अर्थात् वयाच्या १२व्या वर्षी त्या कादंबरीतून एक विलक्षण कथा एवढंच काय ते उमगले होते. काळ पुढे सरकतं गेला आणि सहा-सात वर्षांपूर्वी एम.ए. च्या विद्यार्थ्यांना अनुवादित ( भाषांतर) साहित्याच्या पेपरसाठी डॅा. जयंत नारळीकरांची ‘व्हायरस’ ही कादंबरी विद्यापीठाने लावली होती. विद्यार्थ्यांना नारळीकर कळावेत आणि एकूणच विज्ञान साहित्याबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून पुन्हा एकदा व्हायरस, प्रेषित, यक्षांची देणगी, विज्ञानाची गरूडझेप सारखे नारळीकरांचे साहित्य वाचले गेले. यांतूनच डॅा. जयंत नारळीकरांमधील एक निष्णात साहित्यकार अधिकच प्रकट होतं गेला.


‘प्रेषित’ एक अशी विज्ञान कादंबरी आहे, ज्यात भौतिकशास्त्र , अंतराळविज्ञान , गणित यांची माळ सहज आणि सोप्या भाषेतून एक कथानकाच्या धाग्यात ओवलेली आहे. ( आम्हां आर्ट्सवाल्यांना !) रूक्ष वाटणारे विषय देखील कथा-कादंबरीची गुंफण घालून प्रकट झाले की इतके आकर्षक वाटतात, की विचारू नका !

 

संपूर्ण कादंबरीचे कथानक रहस्याने भरलेले आहे, प्रत्येक नवीन पान उघडल्यावर आत्ता पुढे काय ? ही उत्कंठा निर्माण होत रहाते. पृथ्वीवरील जीवसृष्टीपल्याड एखादी प्रगत, अतिप्रगत जीवसृष्टी असावी , तिचा शोध मानव अनेक वर्ष घेत आहे. मानवाप्रमाणेच इतर परग्रहवासी देखील आपला शोध घेत असतील तर ! असाच मानवसदृश्य परग्रहवासी पृथ्वीवर अवतरतो व मानवांमध्ये मिसळून जातो; याची कथा ‘प्रेषित’ कादंबरीतून उलगडतं जाते. संशोधक जेव्हा एका उदात्त व दूरदृष्टीच्या विचारातून सायक्लॅाप्स सारखी महाकाय दुर्बिण निर्माण करतात, पण राजकारण्यांच्या कचाट्यातून सुटतं नाही तेव्हा नारळीकर लिहितात, “पण सायक्लॅाप्स अस्तित्वात आल्यावर त्याचा वापर करण्याचे सुख शास्त्रज्ञांना फार काळ लाभले नाही. …………… काटकसरीच्या नावाखाली विज्ञानाला मिळणाऱ्या अनुदानांना रात्री लागली. सायक्लॅाप्सही त्यातून सुटला नाही.” ( पृष्ठ ३) पुढे जॅानने शोधलेला सुर्याजवळचा तारा, त्या ताऱ्याच्याभोवती असलेल्या एका ग्रहाकडून जॅानला आलेले संदेश, जॅानचा अपघात , सुधाकर नाईक व मालिनी या दांपत्याला शेतातील रस्त्यावर सापडलेलं तान्हं मूलं, त्या बाळाचा त्यांनी केलेला स्वीकार व सांभाळ, त्या मूलाची म्हणजेच आलोकची असलेली असामान्य बुद्धीमत्ता, त्याला असलेली अंतराळाची ओढ, पुढे त्याच्या आयुष्यात सॅंड्रासारखी देखणी आणि त्याच्यासारखीच मेधावी मैत्रिण , चेंगसारखा जीवाला जीव देणारा बुद्धीमान मित्र, त्यांचे स्पेस अकॅडेमीतील शिक्षण , सर पीटर लॅारींशी भेट व आलेकच्या अस्तित्वाचा शोध  ‘प्रेषित’ कादंबरीतून एकामागे एक कमळाच्या पाकळ्यांसारखा उलगडतं जातो. पुढे सॅंड्राच्या मनातील भीती, “….. यांच्या दृष्टीनं आपण मानवदेखील निकृष्ट , मागासलेले. मानव स्वतः कितीही प्रगत समजो, त्याचं हे मोठेपण पृथ्वीपर्यंतच मर्यादित आहे.” ( पृष्ठ १२५) हीच भीती पुढे आलोक काय करेल अशी वाचकांच्या मनातं देखील उत्पन्न होते.

 

स्वातंत्र्यापूर्व काळापासून महाराष्ट्र व मराठी माणूस शैक्षणिक , सांस्कृतिक , साहित्यीक , नैतिक व वैज्ञानिक जडणघडणीत केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात स्वतःचे अमूल्य योगदान देतं आहे. मराठी विज्ञान साहित्याच्या दृष्टीने डॅा. जयंत नारळीकरांचे नाव सम्मानाने घेतले जाते. अंतराळविज्ञानाचा अभ्यास म्हणजे आकाशाची उंची व सागराचा तळ मोजण्यासारखे आहे. अशाच विस्तृत आभाळाला गवसणी घालणारी कादंबरी म्हणजे डॅा. जयंत नारळीकर यांची ‘प्रेषित’……. प्रत्येक वाचनवेड्या माणसाने आवर्जून वाचावी अशी!

-    डॅा.गौतमी अनुप पाटील

78 views0 comments

Bình luận


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page