बेटा लाडू खातोस का? हे ऐकून मोबाईलवर गेम खेळणारा राज क्षणभर दचकला.
राज इंटरव्यूसाठी ट्रेनने कोल्हापूरहून मुंबईला निघाला होता. त्याच्या समोरील सीटवर बसलेल्या काकूंनी डब्यातून लाडू काढले आणि त्या त्याला विचारत होत्या "बेटा लाडू खातोस का"?
हो, नको नको, राज गडबडला. घे रे पोरा,साजुक तुपाचे आहेत आणि मी स्वतः केले आहेत म्हणत अगदी मायेने त्यांनी राजला लाडू दिला. काकू खूपच छान म्हणत राजने दोन लाडू फस्त केलेत.
राजचे नुकतेच लग्न झाले होते आणि तो कोल्हापूरच्या एका छोट्या कंपनीत काम करत होता. मुंबईची कंपनी मोठी होती, पगारही चांगला होता आणि म्हणूनच राज त्याचे नशीब आजमावण्यासाठी मुंबईला निघाला होता.
वयाची साठी पार केलेल्या काकू पारशी होत्या, अनेक वर्षे मुंबईत राहिल्यामुळे अतिशय शुद्ध मराठी बोलत होत्या. मुंबईला गाडीतून उतरताना "बेस्ट ऑफ लक बेटा" म्हणणाऱ्या काकूंना राजने वाकून नमस्कार केला.
राजला नोकरी मिळाली, पगारही मनासारखा मिळाला. राज घराच्या शोधात भटकत असताना अचानक आवाज आला "बेटा". हो त्या गाडीतल्या काकूच होत्या.
बेटा कसा आहेस? तुला ती नोकरी मिळाली का? इकडे काय करतोस? काकूंनी विचारले.
काकू मी घर शोधतोय, परंतु खिशाला परवडणारे घर मिळत नाही, राज केविलवाण्या स्वरात म्हणाला.
चल मी तुला घर दाखवते म्हणत काकूंनी राजला एका छानशा सोसायटीत आणले. काकू इथे घर खुपच महाग असेल, मला परवडणार नाही.
घर खुप प्रशस्त होते. ३ बेड रूम, मोठा हॅाल आणि किचन. एवढ्या मोठ्या घरात राहत होत्या काकू एकट्याच! तु आणि सुनबाई इथेच राहायचे आणि हो, मुलगा आणि सुनेकडुन कोणी भाडे घेतं का?
राज आणि नेहा काकूंसोबत राहु लागले. मनमिळावू नेहाने काकूंना आपलेसे केले. काकूंना "सुन" नव्हे तर "मुलगी" मिळाली.
लवकरच नेहाला नोकरी मिळाली. नेहाचा सहवास कमी झाल्याने काकू जरा नाराज झाल्या पण हळूहळू त्यांना सवय झाली.
शनिवारी, रविवारी पत्ते खेळणे, कॅरम खेळणे, पिक्चर बघणे, संध्याकाळी चौपाटी किंवा गार्डन आणि रात्री बाहेर जेवण. काकूंच्या एकाकी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला. आपले कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली, जगण्याची उमेद वाढली.
नेहाने घराची जबाबदारी स्वीकारली. नेहा आणि राजच्या एका बेडरूममधील राज्याची व्याप्ती संपूर्ण घरभर पसरली, अर्थात् काकूंच्या संमतीनेच.
राज कंपनीच्या कामासाठी ३ महीने बेंगलोरला आला, नेहाची जबाबदारी काकूंवर आणि काकूंची जबाबदारी नेहावर सोपवुन. नेहाची आणि काकूंची जवळीक अजूनच वाढली. विकेंडला कधी नेहाच्या मैत्रिणींकडे जाणे, कधी जवळपासच्या पिकनिक स्पॉटला भेट तर कधी घरीच मनसोक्त गप्पा रंगत.
नेहाला तिच्या मैत्रीणीच्या लग्नाला जाताना काकूंनी त्यांचे हिऱ्याचे महागडे दागिने दिले. घरी आल्यावर नेहाने दागिने काढून काकूंकडे दिले.
नेहा, अगं तुझ्याकडेच असू दे दागिने, काकू म्हणाल्या. काकू, नको नको, मला लागले तर मी परत मागेन, परंतु दागिने तुम्ही तुमच्याकडेच सुरक्षित ठेवा, नेहाने सांगितले.
नेहा, अगं काल दागिने कुठे ठेवलेस तू? दुसऱ्या दिवशी काकूंनी विचारले. काकू मी तुम्हालाच दिलेत ना, नेहा म्हणाली. हो आठवतं मला, असू देत, असू देत, डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असतील मी, समजुतीच्या सुरात काकू म्हणाल्या.
काकू मिळालेत का दागिने? दुसऱ्या दिवशी नेहाने विचारले. काकूंकडून नकार ऐकून नेहाही घाबरली. नेहा मला मदत करतेस का? आपण दोघी मिळून शोधूया. तेवढ्यात आलेल्या राजच्या फोनमुळे नेहा काकूंना मदत करायला पूर्णपणे विसरली.
नंतरचा आठवडा नेहासाठी धावपळीचा ठरला.
२ दिवस पुण्याला सेमिनार, क्लायंट व्हिजीट, उशीरा पर्यंतच्या मिटींग्ज. या गडबडीत काकूंचा नवीन चष्मा दुकानातुन आणायला नेहा विसरली आणि भरीस भर म्हणून की काय, काकूंचा आवडता डिनर सेट नेहाकडून पडल्याने फुटला.
आताशा काकूंचं घराबाहेर जाणं वाढलं आणि संध्याकाळीही त्या उशिरा परत येऊ लागल्या. अबोल, उदास, एकाकी राहु लागल्या, चिडचिड करू लागल्या. रात्री उशिरापर्यंत त्या झोपत नव्हत्या. नेहाने काकूंना विचारल्यावर त्या नेहावरच भडकल्यात.
परवा तर कहरच झाला. नेहा ऑफिसमधून घरी आली त्यावेळी काळा कोट घातलेल्या एका माणसाशी काकू बोलत होत्या. नेहा येताच काकूंचा आवाज दबला तरीही दागिने, घर, पोलीस, वकील, साक्षीदार, राज, नेहा असे शब्द नेहाने ऐकलेत. नेहाला काळजी वाटू लागली. काकूंचे दागिने घातल्याचा तिला पश्चात्ताप झाला. नेहाने राजला फोनवर थोडक्यात सांगितले. नेहा, काळजी करू नकोस, मी परवा येतोच आहे राज म्हणाला.
राज दुपारी आला, नेहाने आज रजा घेतली होती. नेहाकडून राजने सर्व माहिती घेतली. दागिने न मिळाल्यामुळेच काकूंचे वागणे बदलले असणार राजला नेहाचे म्हणणे पटले. काकूंच्या हरवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात राजची अंगठी, लॅाकेट आणि नेहाचे सर्व दागिने अगदी मंगळसूत्र सुद्धा काकूंना द्यायचे असे दोघांनी मिळून ठरविले.
राजने काकूंना फोन केला. काकूंचे फोनवरील बोलणे ऐकून राज खूपच घाबरला. काकू म्हणाल्यात, राज तु आलास हे खूप बरे झाले. मी तुझ्या येण्याचीच वाट पाहत होते. मी थोड्याच वेळात वकील आणि इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन घरी येईन. तू आणि नेहा कुठेही जाऊ नका. तुमच्या दोघांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड तयार ठेवा. राज आणि नेहाची भीती आणि धडधड वाढली.
थोड्याच वेळात काकू इन्स्पेक्टर साहेब आणि वकील साहेबांना घेऊन घरात शिरल्यात. राजने आणि नेहाने दागिने एका तबकात ठेवले आणि ते तबक काकूंपुढे धरले. तुमच्या हरवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात आम्ही आमचे सर्व दागिने तुम्हाला देत आहोत, अगदी नेहाचे मंगळसूत्र सुद्धा. प्लीज आम्हाला पोलिसांच्या हवाली करू नका. आमच्यावर पोलीस केस झाली तर आमच्या दोघांचीही नोकरी जाईल, आम्ही रस्त्यावर येऊ.
नेहाने तर काकूंचे पायच धरले आणि म्हणाली, काकू तुम्ही माझ्यावर आईसारखे प्रेम केले आहे, मी शपथ घेऊन सांगते, मी तुमचे दागिने चोरले नाहीत. एक क्षणभर तुम्ही माझी आई बना आणि आम्हाला पोलिसांकडे द्यायचा निर्णय बदलवा. आई, मी तुझी लेक तुझ्याकडे प्रथम आणि शेवटची भीक मागते, नाही म्हणू नकोस. पुढच्या काही क्षणांतच नेहाच्या अश्रूधारांनी काकूंचे पाय ओलेचिंब झाले. काकू एक शब्दही बोलल्या नाहीत. नि:शब्द नी जीवघेणी शांतता.
शांततेचा भंग करीत वकील साहेब म्हणालेत, राज आणि नेहा, तुम्हाला आम्ही कायमचे अडकवणार आहोत.
सर, प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या. कंपनीतुन अॅडव्हान्स घेऊन आणि दोघांचे लॅपटॉप विकून आम्ही अजून पैसे देऊ. सर, मी तसे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. मी आजच बेंगलोरहून आलो. थोडासा वेळ द्या सर.
राज, आपल्याकडे फार थोडा वेळ आहे. काकूंना एक दुर्धर आजार डिटेक्ट झाला आहे आणि आता त्या थोड्याच दिवसांच्या सोबती आहेत. त्या तुम्हाला पोलिसांत देतील असे कसे वाटले रे तुम्हाला? जीवापाड प्रेम करतात त्या तुमच्यावर. अरे, हे घर आणि सर्व मालमत्ता त्तुमच्या नांवावर करायची आहे त्यांना. त्यासाठीच मी आणि इन्स्पेक्टर साहेब येथे आलो आहोत. लवकरच तुम्हाला आणि विशेषतः नेहाला सोडून जावे लागणार म्हणून त्या मनातल्या मनात खंत करू लागल्या, त्यांची चिडचिड होऊ लागली. नेहाला हे सहन होणार नाही म्हणून त्या गप्प गप्प होत्या, तुझ्या येण्याची वाट पाहत होत्या.
राज, नेहा आपण फॅारमॅलिटीज पुर्ण करु या, तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड द्या.
"आई" म्हणत नेहाने हंबरडा फोडला आणि ती आईच्या कुशीत शिरली. आईने राजला देखील जवळ घेतले. परमेश्वरा, आमचे आयुष्य आईला दे अशी प्रार्थना दोघांनी केली.
मिलनाचा तो विलक्षण प्रसंग बघताना काळा कोट नी खाकी वर्दीलाही अश्रु लपविता आले नाहीत.
दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६
Comentarios