एवढ्याश्या या विषाणूनं । अहंकाराला पळवून लावलं
पृथ्वीसकट माणसाला । डोळयांदेखत कैद केलं
किती हा काळ ! कर्दनकाळ !! जीवघेणा सर्वकाळ ?
एकांताच्या कोंडवाड्यात । शांतिदूत प्रलयकाळ..?
पांढरा-हिरवा-गडद लाल । काटेरी मुकूट कुठून आला ?
सर्वच ग्रहगोलांची । भविष्यवाणी तोच झाला..!!
रख्ख उन्हाच्या रांगोळीतही । झाडं कापली माणसांवाणी
उजाड काया.. उजाड रया । खाक केली जंगले ज्यांनि..!!
निसर्गावरचा विजय हा । निश्चितच मुजोर होता
पृथ्वीवरच घाव घालत । कुठला आत्मा जळत होता .. ?
टॉवरवरच्या टॉवरवरती । घरटी आपली बांधू चला
ही तर चंद्र-मंगळाची नांदी । पाखरांसोबत नांदू चला
शीतयुद्ध हे जैवयुद्धाशी । कुठेच आकांड-तांडव नाही
अवकाशाचे सम्राट जे-ते । त्यांनाही भोग चुकला नाही
विश्वंभराचा सैरभैर मेंदू । एकांतातही भ्रमिष्ट होता
तेहतीस कोटी देवआत्मा । कुठल्या कुलूपात बंदिस्त होता ..?
जातीधर्माच्या मोडून शिड्या । नाना रंग हे एक दिसू दे !
लाल रंगाला चटावलेले । एकाच सूर्यात विलिन होऊ दे..
माझ्यातला मी दुषित आत्मा । माणूसकीचे स्त्रोत फवारून ;
निर्जंतुकीकरण करून घेतो
अहंकाराच्या षडरिपूंना । माणूस म्हणून विराम देतो
एवढ्याशा या विषाणूला । पृथ्विगोलासह शरण जातो
कर्दनकाळाचा अहंकार मी । तुझ्याच बिंदूत विलिन होतो ..
कवी: विलास माळी, गडहिंग्लज, (जि. कोल्हापूर)
मो.: ९४२२०३३८४०
ईमेल: vilas3375@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
कल्पना सुंदर आहे. आशय सुद्धा छान !