top of page

अश्विन म्हणजे...



हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राच पृथ्वी भोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात.अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा अश्विनी हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला अश्विन महिना असे म्हणतात.

दरवर्षी सर्वपित्री अमावस्या झाली की लगेच दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदा येते आणि या तिथीला शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होतो. शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूमध्ये आदिशक्ती दुर्गामातेचा उत्सव केला जातो म्हणून त्यास शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. हा शारदीय नवरात्र उत्सव साधारणपणे नऊ दिवसांचा असतो.पहिल्या दिवशी एक अतिशय समाधान देणारा श्राद्धाचा विधी केला जातो,त्यास मातामह श्राद्ध असे म्हणतात. या दिवशी नातवाने अतिशय आदरपूर्वक आपल्या आईच्या वडिलांचे म्हणजेच आपल्या आजोबांचे स्मरण करून एखाद्या सत्पात्र व्यक्तीचा योग्य तो सन्मान करून दान करायचे असते. मातामह श्राद्ध हे जरी श्राद्ध असले तरी पितृ पंधरवड्यात मात्र ते केले जात नाही. या वर्षीचा नवरात्र उत्सव १७ ऑक्टोबरला सुरू होऊन २५ ऑक्टोबरला विजया दशमीच्या दिवशी संपन्न होत आहे.पौराणिक कथेप्रमाणे महिषासुराबरोबर आदिमायेचे नऊ दिवस घनघोर युद्ध सुरू होते आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा  दुर्गामातेने वध केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात आणि त्या दिवसाला विजया दशमी असे म्हणतात.आणखी एक कथा अशी सांगितली जाते की रावणाशी लढण्यासाठी आणि विजय मिळविण्यासाठी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांनी  सुद्धा शक्तीची उपासना केली होती. आदीमायेकडून मिळालेल्या अशिर्वादाच्या बळावर श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि विजय मिळविला म्हणून  या दिवसाला विजया दशमी असे म्हणतात. कौरवांविरुद्धच्या युद्धामध्ये पांडवांना विजय मिळविण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पण अर्जुनाला शक्तिमातेची उपासना करायला सांगितले होते. वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय अशा प्रकारे जगात कायमच होत असतो.


अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अगदी विजया दशमीपर्यंत येणाऱ्या शारदीय नवरात्र आणि विजया दशमी या दहा दिवसांमध्ये "या देवी सर्व भुतेशू शक्तीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:"  अशी शक्तिमातेची सप्तशतीच्या पाचव्या पाठात सांगितलेली उपासना केली जाते.शक्तिमातेची आराधना करून तिचे आशीर्वाद मिळविले जातात. नवरात्रात नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.


१.प्रतिपदा : शैलपुत्री देवी मातेची पूजा आणि आराधना.या यदिवशी देवी मातेला राखाडी रंगाची साडी नेसविली जाते.शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या.तिला दक्ष राजाची कन्या सतीचेच रूप आहे असे मानले जाते.हा नवरात्राचा पाहिला दिवस असल्यामुळे या दिवशी देवीची घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे पितळ्याचे,तांब्याचे किंवा चांदीचे घटासारखे किंवा कळशीसारखे गोलाकार भांडे घेऊन त्यामध्ये पाणी भरून त्यात पैसा सुपारी ठेऊन त्याला हळद कुंकू वाहून त्याच्यावर एक झाकण ठेऊन त्या झाकणात रेशमी वस्त्र घालून महालक्ष्मीची प्रतिमा किंवा  टाक ठेऊन त्या देवी रूपाची पूजा केली जाते. किंवा त्या महालक्ष्मीच्या प्रतिमेला किंवा टाकाला चांदीच्या ताम्हनात रेशमी वस्त्रात ठेऊन तिची पूजा केली जाते, आणि त्या घटावर नारळ ठेऊन त्याची पूजा करून त्या नारळापर्यंत येईल अशी झेंडूची किंवा तिळाच्या पिवळ्या फुलांची माळ  सोडली जाते .अशी रोज एक माळ वाढवून नऊ दिवसांपर्यंत नऊ माळा अर्पण केल्या जातात.काही ठिकाणी कडक पुऱ्या करून त्याची पण माळ सोडली जाते त्यांना कडकण्या असे म्हणतात.पूर्ण नवरात्रात देवीजवळ अखंड नंदादीप लावला जातो.

 नवरात्राच्या या पहिल्या दिवशी देविमातेला घटी स्थापित करून तिच्यापुढे एक छोटस काळ्या मातीच शेत  तयार करून त्या शेतात धने ,गहू ,मेथ्या या प्रकारची धान्ये पेरून त्या मातीवर रोज थोडं थोडं पाणी शिंपडून नऊ दिवसांनी पेरलेल धान्य उगवण्याचा निसर्गातल्या पुनर्निर्मितीचा आनंद घेतला जातो.काही घरांमध्ये मातीच्या नऊ सुगडांमध्ये नऊ प्रकारची धान्ये ठेऊन घरातली सुबत्ता देविमातेला अर्पण केली जाते.आणि नंतर त्या धान्याचे दान केले जाते.


२.द्वितीया :  ब्रह्मचारिणी देवी मातेची पूजा आणि आराधना.या दिवशी देवी मातेला केशरी रंगाची साडी नेसविली जाते.ब्रह्मचारिणी रुपामधील पार्वती देवीने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्राप्त करून घेतले होते.


३.तृतीया :  चंद्रघंटा देवी मतेची पूजा आणि आराधना.या दिवशी देवी मातेला पांढऱ्या रंगाची साडी नेसविली जाते. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर चंद्राच्या आकाराच कुंकू रेखलेलं असत म्हणून तिला माता चंद्रघंटा असे म्हणतात.


४ चतुर्थी : कुष्मांडा देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला लाल रंगाची साडी नेसविली जाते. सगळ्या ब्रह्मांडाला आपल्या उदरात सामावून घेण्याची ताकद असलेल्या देवीच्या रुपाला माता कुष्मांडा असे म्हणतात.


५. पंचमी : स्कंदमाता देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला निळ्या रंगाची साडी नेसविली जाते.नवरात्राच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये ललिता पंचमीचा " ओम लं ललिता देव्ये नमः " असा ललिता देवीचा जप केला जातो. कुंकवाच्या करंड्याचे झाकण म्हणजे ललिता देवी असे म्हणतात. त्या रुपातल्या ललिता देवीची विधिवत पूजा करून,कहाणी वाचून तिला ४८ दुर्वांची एक जुडी अशा ४८ दुर्वांच्या जुड्या वाहिल्या जातात. ललिता पंचमीच्या दिवशी २ ते ९ वर्षांपर्यंतच्या ९ कुमारिकांना जेवावयास बोलाविले जाते.त्यांची पूजा केली जाते आणि भेटवस्तू दिल्या जातात. ललिता देवीची तीन रुपे वर्णिलेली आहेत.८ वर्षाच्या रुपातल्या ललिता देवीला त्रिपुरसुंदरी असे म्हटले जाते . १६ वर्षांच्या रुपातल्या ललिता देवीला षोडशी असे म्हटले जाते.यौवनात पदार्पण केलेल्या रुपातल्या ललिता देवीला ललिता त्रिपुरसुंदरी असे म्हटले जाते. या पुजेमध्ये नैवेद्याला केलेले लाडू ,  पेढे,  वडे या वस्तू ४८ या संख्येमध्ये घेऊन सुवासिनीला वाण म्हणून दिले जाते.ललिता पंचमीचे व्रत हे एक काम्य व्रत आहे. हे व्रत केल्याने तुमच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात.


६. षष्ठी : कात्यायनी देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला पिवळ्या रंगाची साडी नेसविली जाते. कात्यायन ऋषींच्या विनंतीवरून त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या पार्वती मातेला माता कात्यायनी असे म्हणतात.


७.सप्तमी : काळरात्री देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला हिरव्या रंगाची साडी नेसविली जाते.बऱ्याच संकटांना तोंड देऊन त्याचे निवारण करणाऱ्या पार्वती मातेला माता कालरात्री असे म्हणतात.


८. अष्टमी : महालक्ष्मी /महागौरी देवीमातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला मोरपंखी रंगाची साडी नेसविली जाते. या दिवशी पार्वती मातेच्या महालक्ष्मी या रूपाची पूजा केली जाते.सोळा धागे घेऊन त्यांना सोळा गाठी मारून तयार केलेला तातू देवी मातेला अर्पण केला जातो. पूरणावरणाचा स्वयंपाक करून त्याचा महानैवेद्य महालक्ष्मी मातेला दाखविला जातो. त्या दिवशी सायंकाळी तांदुळाच्या उकडीचा महालक्ष्मीचा सुबक मुखवटा तयार करून उभ्या रूपातली देवी उभी केली जाते आणि तिची पूजा, आरती करून नैवेद्य दाखविल्यावर,कहाणी वाचून झाल्यावर उत्तर पूजा करून व्रताचे उद्यापन केले जाते..या दिवशी संध्याकाळी घागरीमध्ये धूप घालून घागरी फुंकण्याचा कार्यक्रम करून त्या निमित्ताने देवीपुढे जागरण केले जाते. याच दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याचा पण प्रघात आहे. त्या निमित्ताने घरातील आपल्याला गुरूस्थानी असलेले निरनिराळे ग्रंथ किंवा पोथ्या यांची पूजा केली जाते.


९. नवमी : सिद्धिदात्री देवीमतेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला जांभळ्या रंगाची साडी नेसविली जाते. सर्व सिध्दी किंवा संकल्प पुरे करून त्यांची पूर्तता करून देण्याच सामर्थ्य ज्या देवीच्या रुपात आहे त्या पार्वतीमातेच्या रुपाला सिद्धिदात्री माता असे म्हणतात .या दिवसाला खंडेनवमी असे पण म्हणतात.या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. आपण करीत असलेल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे आपण वापरीत असलेल्या यंत्रांची पण पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे लोक आपापली शस्त्रे, अस्त्रे यांची स्वछता करून त्यांची पूजा करून पुढील लढाईसाठी तयार करून ठेवीत असत.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदिमातेच्या नऊ रुपांची मनापासून पूजा अर्चना आराधना करताना आदिमातेच्या निरनिराळ्या मूर्तींना कधी सोन्या चांदीच्या दागिन्यांनी किंवा मोत्याच्या अलंकारांनी सजविले जाते.त्यांना कधी वाघावर,सिंहावर,हत्तीवरच्या अंबारिमध्ये,कमळामध्ये मोरावर,हंसावर बसविले जाते.तुळजापूरच्या भवानि मातेच्या पुढे भवानी मातेने शिवाजी महाराजांना दिलेल्या भवानी तलवारीचा देखावा पण उभा केला जातो. कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजाभवानी या दोन्ही ठिकाणी महिषासुर मर्दिनीचा पण देखावा उभा केला जातो.आदिमायेची पार्वती,उमा,गौरी ही जशी शांत रूपे आहेत तशीच तिची अंबा, चंडी, भवानी,काली महिषासुर मर्दिनी अशी उग्र रूपे पण आहेत.नवरात्री उत्सव म्हणजे आदिमायेच्या रूपाने केलेला स्त्रीशक्तीचा जागरच असतो.स्त्री सुद्धा वेळ पडली तर आलेल्या संकटाला महिषासुर मर्दिनी बनून तोंड देऊ शकते हे यातून सुचविले जाते असे मला वाटते.


१०. दशमी : खंडेनवमीला तयार केलेली शस्त्रे,अस्त्रे घेऊन पूर्वीचे राजे,अगदी आपले पेशवे सरकार सुद्धा नव्या लढाईसाठी बाहेर पडत असत त्याला सीमोल्लंघन असे म्हटले जाई. त्या लढाया जिंकून येताना जी लूट मिळत असे त्याला शिलंगणाचे सोने असे म्हटले जाई. सर्व वाईट गोष्टींवर विजय मिळवून सर्व देविमातांची मनापासून पूजा करून आनंदाने भरलेल्या मनाने विजयोत्सव साजरा करण्याचा,एकमेकांना आपट्याच्या पानाच्या रुपातले सोने लुटून शुभेच्छा देण्याचा आणि गुढ्या पताका उभारून आनंद साजरा करण्याचा हा विजयादशमीचा दिवस.या दिवशी उत्तर भारतामध्ये लंकेचा राजा रावण याच्या प्रतिमेचे दहन करून विजयोत्सव साजरा केला जातो.या दिवशी आपल्या घरातल्या लहान मुलांच्या पाटीवर सरस्वती देवीची रांगोळी काढून त्यांच्या हस्ते तिची पूजा करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा पण केला जात असे त्याला पाटीपूजन असे म्हणत असत.


भारतासारख्या खंडप्राय आणि बहुभाषिक देशामध्ये नवरात्री उत्सव बहुतेक सर्व राज्यांमध्ये साजरा केला जातो. काश्मीर मधल्या वैषणवी देवीपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या आपल्या भारत देशात ज्या ज्या ठिकाणी सतीमातेची शक्तिपीठे आहेत त्या त्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यातील साडेतीन शक्तिपिठे तर एकट्या महाराष्ट्रातच आहेत. माहूरची रेणुका माता,तुळजापुरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई माता ही तीन पूर्ण पीठे आणि सप्तशृंगी  गडावरील  सप्तशृंगी माता हे अर्धे पीठ मानले जाते. ही साडेतीन शक्तिपिठे जागृत देवस्थाने मानली जातात .वैष्णवी देवीपासून कन्याकुमारी पर्यंत असलेल्या देवीमातेच्या सर्व मंदिरात हा उत्सव आपल्या आपल्या पद्धतीने साजरा केला जातो ,पश्चिम बंगाल, आसाम , मध्यप्रदेश,त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या प्रांतात अश्विन शुद्ध पंचमीपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत दुर्गा पूजा किंवा कालिमातेचा महोत्सव साजरा केला जातो. दुर्गामातेच्या उंच प्रतिकृती तयार करून त्यांची रथातून मिरवणूक काढून दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते. गुजरात आणि राजस्थानमध्ये  नऊही रात्री दुर्गा मातेची पूजा करून तिच्या समोर रास गरबा खेळला जातो आणि नंतर तिला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून भक्षण केला जातो.

भारतामध्ये ठिकठिकाणी राहणाऱ्या आपल्या अदिवासी जमातीत सुद्धा हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.आपल्याकडे महाराष्ट्रात नवरात्राच्या काळामध्ये हस्त नक्षत्र असल्यामुळे पाटावर रांगोळीने ऐरावत हत्ती रेखाटून त्याच्या भोवती फेर धरला जातो याला हादगा किंवा भोंडला असे म्हणतात.जुन्या काळी मुलींची लग्ने लहान वयात होत असल्यामुळे बहुतेक या भोंडल्याचे किंवा हादग्याचे आयोजन केले असावे असे वाटते. गोल धरून फिरताना लहान वयातल्या त्या सुवासिनी आपल्या सासरचे आणि माहेरचे वर्णन करणारी आणि माझा संसाराचा खेळ नीटपणे मांडून देण्यासाठी गणेश देवाला साकडं घालणारी लोकगीते म्हणत असत.दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पण नवरात्री उत्सव खूप धार्मिक चालीरीती पाळून मनोभावे साजरा केला जातो. 


                         पावसाळा संपत आल्यामुळे नवरात्राच्या वेळेला हवेमध्ये किंचित गारठा आलेला असतो आणि हवा अतिशय आल्हाददायक आणि मोहक असते.शेतामध्ये पण धनधान्य भरपूर प्रमाणात तयार झालेले असते त्यामुळे एक प्रकारचा हर्ष आणि उल्हास सर्वत्र पसरलेलाअसतो.नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पुजाअर्चेच्या निमित्ताने धान्यदान आणि मिष्टांनांचे अन्नदान पण केले जाते. सवाष्ण आणि ब्राम्हणाचे मेहुण असो,उठती बसती सवाष्ण जेवावयास असो किंवा नऊ कुमारिकांचे पूजन आणि भोजन असो या सर्वांना त्या त्या निमित्ताने घरामध्ये बनविलेल्या मिष्टानांच्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी बोलावून त्यांचा सन्मान करणे ही आपली अतिशय उच्च विचारांची संस्कृती आहे. या नऊ दिवसात पूजल्या गेलेल्या दुर्गामातांच्या ठिकाणी असलेलं निराळं तेज आणि चैतन्य यामुळेच त्या पूजनीय ठरतात आणि म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो ,पण ही झाली पुराण कथातली गोष्ट.कलियुगामध्ये आपापल्या तेजाने,कर्तुत्वाने, दातृत्वाने,पराक्रमाने,दृढ निश्चयाने झळाळून निघालेल्या संत मुक्ताबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी, रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई, बाया कर्वे, ताराबाई मोडक, अनुताई वाघ , दुर्गाबाई भागवत आणि अगदी मदर टेरेसा सुद्धा या साऱ्या आधुनिक युगातल्या पूजनीय आणि म्हणूनच अनुकरणीय वाटणाऱ्या नवदुर्गाच आहेत असे मला वाटते.


नवरात्र संपल की आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमेचे. शरद ऋतूमध्ये ही पौर्णिमा येत असल्यामुळे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे म्हणतात. अश्विन आणि कार्तिक या दोन्ही महिन्यांना मिळून शरद ऋतू असे म्हटले जाते या महिन्यांमध्ये पृथ्वी भोवती फिरता फिरता चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो त्यामुळे चंद्राचे पडणारे चांदणे खूप सुंदर,प्रकाशमान आणि तेजस्वी असल्यामुळे त्याला टिपुर चांदणे  असे आपण म्हणतो.या दिवसात पाऊस जवळ जवळ थांबलेला असल्यामुळे आकाश निरभ्र असते,त्यामुळे चांदण्याची  मजा आपण घेऊ शकतो. अश्विन महिन्यामध्ये अश्विन महिन्यातल्या ज्या तिथीला आकाशात चंद्राचे पूर्ण गोलाकार बिंब दिसेल त्या तिथीला पौर्णिमाअसे म्हणतात.या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाची, लक्ष्मीमातेची पूजा करण्याची पद्धत आहे.या रात्री चंद्राची पण पूजा केली जाते आणि दूध आटवून त्यात केशर,पिस्ते ,बदाम,चारोळी,वेलदोडे,जायफळ,साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि त्या सुंदर दुधाचे दुग्धपान केले जाते आणि उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.या दिवशी प्रत्येक कुटुंबातील जेष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात.

पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी ती  समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो ,त्यामुळे चंद्राचे गोलाकार पूर्ण बिंब दिसते.विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते.लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. सगळीकडे पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जतो. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीमाता सगळ्यांना सजग रहाण्याचे सुचवत असते आणि आयुष्यामध्ये जे सजग असतील, प्रामाणिकपणे आपले काम करीत असतील त्यांना लक्ष्मीमाता धनधान्य,सुख समृद्धी आणि आयुरारोग्य देते असे म्हणतात. अशा ह्या शांत,निर्मळ, मुठी भरभरून अमृद्धी देणाऱ्या मातेच निराळेच दर्शन घडते. म्हणूनच आपले आयुष्य मंगलमय,शांतीपूर्ण करणाऱ्या या मातेला आपण असे अळवतो." सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नामोस्तुते."


ज्या दिवशी आकाशात चंद्र पूर्ण गोल आकारात दिसतो त्या तिथीला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो.याच तिथीला कोकणामध्ये नवान्न पौर्णिमा असे म्हणतात. कोकणात केली जाणारी शेती ही पावसावर अवलंबून असते.अश्विन महिन्यात ही शेती कापणी योग्य होणं म्हणजेच निसर्गानं आनंदाच्या भरात मानवाला दिलेली भेटच म्हटली पाहिजे. नवान्न पौर्णिमेला शेतात तयार झालेलं भात, वरी, नाचणी ईत्यादी धान्य आंब्याच्या पानात एकत्र करून ते लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी मुख्य दारावर बांधलं जात.धनधान्याची समृद्धी देणाऱ्या लक्ष्मी मातेच  असं मनापासून मोठ्या भक्तिभावाने केलेले स्वागत खूपच समाधान देणारे वाटते.


                      प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे नाव आणि महत्व निराळे आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी केली जाते.जेष्ठात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा साजरी केली जाते.भाद्रपदातिल पौर्णिमेला पितरांचे श्राद्ध करतात. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस त्रिपुरी पूर्णिमा असे म्हणतात. मार्गशिर्षातिल पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस विष्णूची पूजा केली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तीर्थस्नानाचे महत्व आहे.,आणि फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस होळी पौर्णिमा असे म्हणतात व या दिवशी होळीचा सण साजरा करतात.


                           वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांची नावे आणि महत्व या निमित्ताने सांगावेसे वाटले म्हणून त्यांचा उल्लेख येथे केला आहे. कोजागिरीच्या चांदण्यात बसून अलिकडच्या काळात मनसोक्त भेळीचा आणि आटीव दुधाचा आस्वाद घेऊन जागरण करण्यासाठी निरनिराळ्या बागांमधून फिरण्याची मजा पण हल्ली तरुणांकडून मोठ्या प्रमाणात घेतली जाते.सर्व बागांमध्ये,देवळांमध्ये कोजागिरीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा होत असतो,त्यामुळे दिवाळीसारख्या पुढे येणाऱ्या मोठ्या दीपोत्सवाची एक प्रकारे नांदीच होत असते.वातावरणात एक सुखद असा गारवा पण आलेला असतो.बाजारामध्ये रांगोळी, तिच्यात भरावयाचे रंग,मातीच्या आणि निरनिराळ्या शोभेच्या पणत्या, बाळ गोपाळांसाठी तयार किल्ले, किंवा किल्ले बनविण्याचे साहित्य, त्यावर ठेवायला मातीचे बनविलेले मावळे,शिवाजी महाराज आणि निरनिराळ्या आकाराचे आणि रंगाचे आकाशकंदील आणि फटाक्यांची विक्रीसाठी रेलचेल असते. बाजारात सर्व प्रकारच्या मिठायांचे, सुक्या मेव्याचे आणि सर्व प्रकारच्या फराळाचे जिन्नस पण विकावयास असतात. एकूणच येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या बाजारांमध्ये खरेदीसाठी सर्वांची झुंबड उडालेली असते. एकूणच सगळीकडे वातावरणात दिवाळीचा वास पसरलेला असतो त्यामुळे सगळ्यांची मने उल्हसित होतात आणि दिवाळीची वाट पहातात.


                         भारतात राहाणारे आपण सगळेच भारतीय दिवाळी साजरी करतो.महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून. दिवाळीच्या सुरवातीला येणारा वसुबारस हा सण अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.वसू म्हणजे द्रव्य (धन) आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला वसुबारस हे नाव पडले आहे.यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.


                       भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे घरामध्ये पशुधन असणे शेतकऱ्याचे मोठेपण दाखवितो.त्यामुळे ते पशुधन वाढावं,त्याची छान निगा राखली जावी म्हणून त्याची या दिवशी पूजा केली जाते.गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपल्या हिंदू धर्मात गाईला फार महत्वाचे स्थान आहे.समुद्र मंथनाच्या वेळी जी चौदा रत्ने बाहेर निघाली त्यातले एक रत्न म्हणजे कामधेनू गाय, त्यामुळे आपण गाईला देवतेचा मान दिलेला आहे आणि म्हणून तिची पूजा या दिवशी करतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त राहून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या 

गाईचे पूजन करतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणा वरणाचा स्वयंपाक करतात. घरातिल सवाष्ण स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात, नंतर हळदी कुंकू,फुले,अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.भरपूर कृषी उत्पादन व्हावे आणि आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून या दिवसाच्या पूजेचे महत्व आहे.


                       धनत्रयोदशी हा दिवाळीतला पहिला दिवस मानला जतो.या दिवशी आपल्याकडे असलेले सुवर्ण अलंकार,पैशाच्या रुपात असलेले धन,चांदीचे अलंकार यांच्या रुपातल्या लक्ष्मी मातेची पूजा केली जाते.ही पूजा करताना,

"ओम महालक्ष्मीच  विदमहे विष्णुपत्नीच धीमही.

तन्नो लक्ष्मी प्रचोदयात"

अशी प्रार्थना करून तिची पूजा करतो.तिची पूजा करताना तिने आपले घर सोडून कधीच जाऊ नये आणि सदासर्वकाळ आपल्याच घरात रहावे अशी मनापसून प्रार्थना केली जाते.


                         धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून समस्त देवादिकांचे आरोग्य सांभाळणारे वैद्यराज धन्वंतरी आपल्या दोन्ही हातात एक अमृताने भरलेला कुंभ घेऊन प्रकट झाले.त्यामुळे समस्त वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स या दिवशी धन्वंतरीची धने आणि गूळ वाहून पूजा करतात,आणि आपापल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी धन्वंतरिंकडून आशिर्वाद मागतात,म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते.


                         धनत्रयोदशीच्या दिवसापासून संध्याकाळी घराच्या बाहेर पणतीमध्ये तेल वात घालून पणतिचे तोंड दक्षिणेकडे करून तो यमदीप म्हणून लावायला सुरुवात केली जाते.या निमित्ताने काहीही  अमंगळ गोष्ट आपल्या घराचा उंबरा ओलांडून आत येऊ नये अशी यमदेवाला प्रार्थना केली जाते.


                        शेतकरी आणि कारागीर लोक धनत्रयोदशीच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधित अवजारांची पूजा करतात.तिफन, नांगर,कुळवाची पूजा केली जाते.शेतकऱ्यांसाठी शेतातून घरात आणलेले धान्य म्हणजेच लक्ष्मी, त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पूजा करतात.धने आणि गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.या दिवसापासून सगळीकडे पणत्या,आकाशकंदील लावून,रांगोळ्या काढून दीपोत्सव साजरा करून दिवाळीच्या सणाची सुरुवात केली जाते.


                         दिवाळी या सणाला तीन हजार वर्षांची परंपरा आहे असे सांगितले जाते.अश्विन वद्य चतुर्दशी या दिवसाला नर्क चतुर्दशी असे म्हणतात.या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे. शरद ऋतुची अखेर आणि हेमंत ऋतुची सुरुवात या कालावधीत हा दिवस येतो. मार्गशीर्ष आणि पौष या दोन माहिन्यांमध्ये हेमंत ऋतु असतो. या काळात थंडीचा कडाका पण वाढतो,त्यामुळे या थंडीला सामोरे जाण्यासाठी अभ्यंगस्नान करावयास सांगितले आहे. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे करावयास सांगितले आहे.या दिवशी सकाळी लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून संपूर्ण शरीरास तेल लावून सुवासिक उटणे लावून केलेले स्नान याला अभ्यंगस्नान असे म्हणतात.या दिवशी सर्व पृथ्वीला  आणि पर्यायाने तिथे राहणाऱ्या सर्व मानवजातीला आपल्या कृष्ण कृत्यांनी त्राही भगवान करून सोडणाऱ्या नरकासुर राक्षसाचा वध भगवान श्रीकृष्णांनी केला आणि संपूर्ण मानवजातीला राक्षसी विळख्यातून सोडविले.तो दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा होता म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या या अतुलनीय पराक्रमाचे कौतुक म्हणून दिवाळीमध्ये या दिवशी पहाटे घरभर पणत्या उजळविल्या जातात,आणि फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.घराघरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने तयार केलेल्या निरनिराळ्या फराळाच्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवून मग त्याचे सेवन केले जाते . घरातील माणसे आणि इतर नातेवाईक एकत्र येऊन फराळ करतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.


                      अश्विन वद्य अमावास्येला लक्ष्मी पूजन करतात.हे पूजन लक्ष्मीमातेचे आणि तिच्याबरोबरच अलक्ष्मी या तिच्या मोठ्या बहिणीचेपण पूजन केले जाते. या दिवशी कुबेराचेपण पूजन केले जाते. कुबेर हा धनाचे रक्षण करणारा देव मानला जातो. त्यामुळे लक्ष्मीमातेबरोबर कुबेराचेपण यथाविधी पूजन केले जाते.ही पूजा या दिवशी संध्याकाळी किंवा प्रदोषकाळी पंचांगात दिलेल्या वेळेनुसार केली जाते. लक्ष्मीमातेचे वाहन हत्ती आहे किंवा ती कमळात बसून पण येते. अलक्ष्मीमातेचे वाहन गाढव असून तिच्या हातात केरसुणी असते.म्हणून या पूजेत केरसुणीला पण पूजेचा मान दिला जातो. या दिवशी व्यापारी लोक त्यांच्या मागील वर्षाच्या हिशेबाच्या वह्या किंवा चोपड्या बंद करून नवीन वह्या शुभलाभ असे लिहून या नव्या वह्यांची पूजा करतात, याला वहीपूजन असे म्हणतात.लक्ष्मीची पूजा करण्यासाठी चौरंगावर रेशमी वस्त्र घालून त्याच्यावर एक पाण्याने भरलेला तांब्या ठेऊन त्यामध्ये आंब्याची पाने पाण्यात बुडतील अशी ठेऊन त्यावर नारळ ठेवावा.हा कलश म्हणजेच लक्ष्मीचे रूप.नारळाला हळद,कुंकू लावावं आणि कलशाच्या एका बाजूला हळदीने काढलेल्या कमळावर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी.या साऱ्यांची विधिवत पूजा करून आरती करावी,महालक्ष्मीचा जप करावा आणि आपापल्या रितीप्रमाणे देवापुढे नैवेद्य दाखवावा.आपल्याकडे महाराष्ट्रात साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखविला जातो.देवीसमोर एका ताटामध्ये रेशमी वस्त्र घालून त्यावर घरातले स्त्रीधन कीव दागदागिने आणि चांदीच्या वस्तू आणि नाणी यांच्या रुपातल्या लक्ष्मीची पण मनोभावे पूजा केली जाते.देवाजवळ समई उजळविली जाते आणि त्या संध्याकाळी सगळ्या घरभर दिवे लावून,सगळीकडे पणत्या लावून,आकाशकंदिल लावून मोठ्या प्रेमाने आपल्या घरी येणाऱ्या लक्ष्मीमातेचे स्वागत केले जाते.घरी केलेल्या फराळांच्या पदार्थांचाही नैवेद्य दाखविला जातो.दारासमोर काढलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या पण लक्ष्मीमातेचे स्वागत करतात आणि सगळीकडे फटाके उडवून लक्ष्मीमातेचे स्वागत केले जाते. पण लक्ष्मी पूजनाच्या रात्री दिवाळीच्या सणात जास्तीत जास्त फटाके उडविले जातात त्यामुळे ध्वनी प्रदूषण,वायू प्रदूषण होऊन वातावरण खूप अशुद्ध झालेले असते त्यामुळे त्या धुराचा खूप लोकांना त्रास होतो हे ध्यानात घेतले पाहिजे,म्हणून कमितकमी फटाके उडविण्याचे भान  राखले पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असे मला वाटते.


                     नवे कपडे घालून छान छान फराळाचे खाऊन आपण दिवाळीचे वसुबारस, धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे चार दिवाळीतले दिवस तर साजरे केले पण अजून दिवाळीतले दोन मुख्य दिवस तर साजरे करावयाचेच आहेत.लक्ष्मीपूजन हा दिवस अश्विन वद्य अमावास्येला येत असल्यामुळे अश्विन महिना येथे संपतो. मराठी वर्षातल्या बारा महिन्यातल्या आषाढ अमावास्या म्हणजे दिपपूजन,हिला दिव्याची आवस असे म्हणतात, श्रावण अमावास्या म्हणजे पिठोरी अमावास्या आणि अश्विन आमावस्या म्हणजे लक्ष्मी पूजन ता तीन अमावास्या चांगले शुभ दिन म्हणून गणले जातात. उद्यापासून म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून कार्तिक महिना सुरू होतो त्यामुळे बळीप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दोन दिवाळीतले मुख्य दिवस कार्तिक महिन्यात साजरे करतात. आपल्या आपलं मराठी वर्ष म्हणजे या मालिकेतील अश्विन महिना अगदी प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत खूप सणावारांनी पूर्ण भरलेला आहे,त्यामुळे अश्विन म्हणजे हे विवेचन थोडे मोठे झाले आहे,क्षमस्व.


लेखिका: सौ. उमा अनंत जोशी, कोथरूड, पुणे

मो:९४२०१७६४२९


 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page