top of page

झांशीची राणी लक्ष्मीबाई चरित्र

Updated: Aug 13, 2020



रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी | पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली  |     ‌ ‌  कडकडा कडाडे बिजली        शत्रूंची  लष्करं  थिजली   ‌ ‌     मग कीर्तीरुपाने उरली ती पराक्रमाची ज्योत मालवे इथे झांशीवाली || कवीवर्य ‌भा.रा.तांबे यांनी झाशीच्या राणीचे ग्वाल्हेर येथील स्मृतीस्मारक पाहून लिहिलेली ही कविताच राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करते. अलिकडेच वाचनात आलेल्या प्रतिभा रानडे लिखित झाशीची राणी लक्ष्मीबाई चरित्र‌ ह्या पुस्तकाने माझ्या मनाचा ठाव घेतला.पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.पहिले वैशिष्टय म्हणजे राजहंस प्रकाशनाने प्रतिभाताईंना राणी लक्ष्मीबाईचे चरित्र किंवा कादंबरी, काहीही एक लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले होते.परंतू कादंबरीमध्ये कल्पनाविलास असतो म्हणून प्रतिभाताईंनी  झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे चरित्र लिहिणेचं पसंत केले. दुसरं वैशिष्टय म्हणजे चरित्र अधिक वास्तववादी व्हावे म्हणून प्रतिभाताई झांशी येथे स्वतः जाऊन राहिल्या. राणीच्या संबंधित सर्व स्थळांना भेटी दिल्या. जुन्या जाणकार माणसांशी चर्चा केली. ग्रंथालयांना भेटी देऊन जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेली सारी मेहनत हे पुस्तक वाचताना आपल्याला पदोपदी जाणवते. तिसरं वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक एकूण सहा भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. आतापर्यंत ह्या पुस्तकाच्या एकूण ९ आवृत्त्या निघालेल्या आहेत. चौथं वैशिष्टय म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर राणीचं चिरपरिचित चित्र डाव्या कोपऱ्यात अंधूकसर आहे आणि मध्यभागी ठळकपणे सिंहासनावर विराजमान झालेली राणी आहे. टपोरे, भावविभोर, करारी, आत्मविश्वासाने ठासून भरलेले डोळे, धारदार नाक, निर्भय चेहरा आणि जबरदस्त पकड असलेले हाताचे रुंद पंजे. कोणतीही व्यक्ती जन्माला येते ती दोन गोष्टी घेऊनच.एक म्हणजे त्या व्यक्तीचं विधिलिखित आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मजात वृत्ती-प्रवृत्ती. राणी लक्ष्मीबाईचे आयुष्य, तिचं विधिलिखित, तिच्या अंतस्फूर्त उर्मी यांचा विचार करायला गेलो तर त्यांच्या परस्पर संबंधातील नात्याचे रहस्य अधिकच गडद होत जाते. त्याचा शोध घेऊ लागल्यास समोर येतं ते राणी लक्ष्मीबाईचे चारित्र्य, चारुता आणि तिचं चातुर्य. याच कसोट्यांवर राणी लक्ष्मीबाई श्रेष्ठ ठरते. आपली नियती मुकाट्याने मान्य न करता आयुष्यभर दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊन आपलं श्रेयस आणि प्रेयस साध्य करण्याचा प्रयत्न करतच ती जगली आणि वीराला शोभेल असाच मृत्यु तिनं कवटाळला. ब्रम्हावर्त येथे दुसऱ्या बाजीरावाकडे आश्रीत म्हणून असलेल्या मोरोपंत आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३० रोजी कन्यारत्न जन्माला आले. गंगाकाठी काशीला जन्म झाला म्हणून मुलीचं नाव मनकर्णिका ठेवलं. लाडाने तिला सगळे मनूच म्हणायचे. मनूची आई ती ३-४ वर्षांची असतानाच वारली. आईवेगळ्या पोरीला मोरोपंतांनी खूप प्रेमाने वाढवलं. दुसऱ्या बाजीरावांनी सुध्दा तिला आपली मुलगी मानलं होतं. भातुकली खेळण्याच्या वयात मनू बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालविणे, पिस्तुल,जांबिया चालवणं याचं शिक्षण घेत होती आणि त्या सगळ्या विद्यांमध्ये ती पारंगतही झाली. ती बाळबोध आणि मोडी लिहायला शिकली. तसेच तिला इंग्रजीही समजत होतं. मल्लखांब विद्येतही तिनं प्राविण्य मिळवले होते. त्याकाळी अश्वपरिक्षेत निष्णात असणारी ती एकमेव भारतीय स्त्री होती. अशा या मनूचं  बाराव्या वर्षी तिच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठ्या असलेल्या झांशीचे संस्थानिक गंगाधरपंत  यांच्याशी लग्न झाले. सासऱ्यापेक्षा जावई वयाने मोठा होता. गंगाधरपंत त्यांच्या बायकीपणाबद्दल आणि विचित्र सवयींबद्दल सर्वांना परिचित होते. त्याकाळी विषम विवाह सर्रास प्रचलित होते. मोरोपतांचा, मनुच्या वडिलांचाही  ३५ व्या वर्षी दुसरा विवाह  नऊ वर्षांच्या मुलीबरोबर  झाला होता. लग्नानंतर मनकर्णिका तांबे हिची झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली आणि लहानपणी तिच्याबाबत वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं. आश्चर्य म्हणजे लग्नानंतरही तिनं रोजचा व्यायाम, कसरत, नेमबाजी, तलवारबाजी, घोडेस्वारी यांचा नियमित सराव चालू ठेवला होता. इतकेच नाही तर तिनं आपल्या कुंदर, सुंदर, काशी ह्या दासी, तसेच गावातील सर्वसामान्य गृहिणींना सुध्दा नेमबाजी व तलवारबाजीत पारंगत केले होते. याचा उपयोग तिला ब्रिटीशांशी झालेल्या युध्दात झाला. यथावकाश राणीला पुत्ररत्न झाले. परंतू तान्हा राजपुत्र तीन महिन्यांचा होऊन गेला. पुत्रवियोगांनी गंगाधरपंतानी अंथरुण धरलं. राज्याला वारस म्हणून वासुदेवराव नेवाळकर यांचा पाच वर्षांचा मुलगा आनंद ह्याला दत्तक म्हणून घेऊन दामोदर असं नामकरण करण्यात आले. दत्तकाच्या दुसऱ्याच दिवशी गंगाधरपंत स्वर्गवासी झाले आणि राज्याची  सारी जबाबदारी राणीवर येऊन पडली. परंतू इंग्रजांनी ताबडतोब झांशी संस्थान खालसा केले व दत्तकविधानही नामंजूर ‌केले.अनेकवेळा, अगदी कंपनीच्या थेट लंडन आॅफीसशी पत्रव्यवहार करुन देखील इंग्रजांनी राणीची संस्थान खालसा न करण्याची तसेच दत्तक विधानाची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे राणीला झाशीचा किल्ला सोडून दुसरीकडे रहायला जावं लागलं. हा राणीला भयंकर अपमान वाटला. ती सूडाने पेटून उठली. पण जेव्हा १८५७ मध्ये सैनिकांचा उठाव झाला आणि अनेक इंग्रजांची कत्तल झाली तेव्हा कंपनी सरकारनेच राणी लक्ष्मीबाईंना झांशीचा कारभार सांभाळण्याची आज्ञा दिली. राणी कायम पुरुषी कपडे परिधान करून राज्यकारभार चालवत होती. ती सतत आपल्या प्रजेच्या हिताचा विचार करत राज्याचा गाडा हाकत होती. जनतेच्या मनातही राणीबद्दल अपार माया आणि प्रेम होतं. राणीचं जनतेवर आणि जनतेचे राणीवर अतोनात प्रेम होते. झांशीचा कारभार हाती घेतल्यानंतर झांशी खालसा झाल्यानंतरच्या तीन वर्षांत इंग्रजांनी ज्या ज्या गोष्टी प्रजाजनांकडून  हिरावून घेतल्या होत्या त्या त्या सर्व गोष्टी राणीनं प्रजेला परत दिल्या आणि आपण कणखर राज्यकर्त्या आहोत हे तिनं सिध्द केलं. ह्यामुळे राणी जनतेच्या गळ्यातला ताईत बनली. आपल्या उण्यापुऱ्या २७ वर्षाच्या आयुष्यात इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारी, सतत ११ दिवस  ह्यू  रोजसारख्या निष्णात सेनानीशी प्राणपणाने लढून सैन्याचा खडापहारा असताना त्यांच्या डोळ्यांदेखत मुलासह शिताफीने निसटून जाणारी ती रणरागिणी होती. वैधव्यानंतर केशवपनासारख्या जाचक निर्बंधांना युक्तीप्रयुक्तीने दूर सारणारी ती एक स्वयंभू स्त्री होती. संस्थाने खालसा करण्यामागचा कंपनी सरकारचा कावा १८५४ सालीच ओळखून सरकारचा दुटप्पीपणा वेशीवर टांगणारी पहिली भारतीय संस्थानीक म्हणजे राणी लक्ष्मीबाई . कसलेल्या इंग्रज सेनाधिकाऱ्यांनीही जिचं युध्दकौशल्य व युध्दनेतृत्व गौरविले आणि तिला ' जोन ऑफ  आर्क' म्हणून संबोधलं. राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की आजही जवळपास ३०० वर्षांनंतरही कोणत्याही धाडसी स्त्रीला राणीचीच उपमा दिली जाते. अशी अनेक भारतीयांची स्फू्र्तीदेवता असणाऱ्या अशा ह्या झांशीच्या राणीच्या विविधांगांचा वेध घेणारं, अस्सल  दस्तऐवजांवर आधारित असलेलं हे पुस्तक खरोखर अतिशय वाचनीय आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असेच आहे. ऐतिहासिक असूनही ओघवत्या भाषाशैलीमुळे कुठेही बोजड किंवा रटाळ झालेले नाही. राणीची मोहोर, तिची काही  हस्तलिखित पत्रं, किल्ल्यामधील प्रचंड तोफा आदींच्या छायाचित्रांमुळे पुस्तकाचं खरेपण वाढण्यास  मदतच होते.


हे पुस्तक ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा

लेखिका: सौ. संध्या यादवाडकर (मुंबई)

मो: 9819993137


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

Comentários


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page