लेक चालली चालली
लेक चालली सासरी
माहेरच्या आसवांनी
चिंब भिजली ओसरी
तहान - भूक हरपुनी
खेळायाची भांडीकुंडी
आता खेळाया जाताना
का गं आली रडकुंडी
तुझं रूसणं फुगणं
मला वाकुल्या दावणं
तुझ्या सासरी जाण्याणं
दावी वाकुल्या जिवन
नको मायेच्या वढीनं
लावू पायाला लगाम
कन्यादानाचं कर्तव्य
लय पुण्याचं गं काम
घाल आसवा आवर
कर सुखाचा संसार
जातीवंत तू बियाणं
व्हावं हिरवं शिवार
तुला सोडाया निघाली
तन - मनाची गं गाडी
वाट पाण्यातुनी काढी
नजरंची बैलजोडी
श्वास लयीत चालंना
कोण घालीन वंगण
मोत्याशिवाय पोरकं
माझं काळीज कोंदण
👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
सुनिलनाना पानसरे (खेड)
मो: 9657954383
ईमेल: sunil.pansare1980@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
अंगण ही कविता आवडली. घराचं चित्र समर्पक आहे.