हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्राच्या सान्निध्यात असतो म्हणून या मराठी महिन्याला माघ महिना असे म्हणतात. माघ हा मराठी वर्षाच्या कालगणनेनुसार अकराव्या क्रमांकाचा महिना आहे.धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो.माघ महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा व उपासना केली जाते.
श्री. गणेश जेव्हा पृथ्वीवर प्रथम प्रकटले तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता म्हणून या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते आणि म्हणून गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो. या दिवशी श्री.गणेशाचा जन्मोत्सव साजरा करतात. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेला वरद विनायक या श्री.गणेशाच्या रूपाच्या जयंतीचा उत्सव या दिवशी साजरा केला जातो.या चतुर्थीला वरद चतुर्थी असे म्हटले जाते.या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी गणेश भक्तांना विनायकी चतुर्थीचा उपवास धरावयाचा असतो.एरवी पांढरे तीळ उपवासाला चालत नाहीत पण या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखविला जातो म्हणून प्रसाद म्हणून हे तिळाचे लाडू या दिवशी खायला परवानगी असते. या उत्सवाला माघी गणेश जयंती उत्सव असेही म्हणतात. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जेवढे महत्व गणपतीच्या पूजेचे आहे तेवढेच महत्व या माघ महिन्यातील गणेश जयंती/तिलकुंद चतुर्थीला आहे.
माघ आणि फाल्गुन हे दोन महिने शिशिर ऋतूचे असतात माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमी.वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. या काळात सगळीकडे कोकिळेचे कूजनही ऐकू येऊ लागते. पुढे येणाऱ्या वसंत ऋतूच्या छान काळाची ती नांदीच एक प्रकारे असते. ब्रह्मदेवांनी जेव्हां सृष्टीची निर्मिती केली त्या वेळेला सरस्वती माता प्रकट झाली तो दिवस वसंत पंचमीचा होता. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी सरस्वतीचे पूजन करायला सांगितले आहे. पूजनाचे वेळी सरस्वती मातेचे वर्णन करणारा खालील श्लोक म्हणण्याची पद्धत आहे.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
अर्थ : जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे; जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे; जिचे हात उत्तम विणेमुळे शोभत आहेत; जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे; ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात; जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.
वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध मानला जातो आणि त्यामुळे शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात आणून ते देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे.
सरस्वती देवीला वागीश्वरी , भगवती , शारदा , विणावादनी आणि वाग्देवी अशी अनेक सुंदर नांवे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. वसंत पंचमीला पंढरपूर येथे रुक्मिणी पांडुरंग यांचा विवाह सोहळाही खूप छान प्रकारे साजरा केला जातो.
माघ महिन्यातला रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो व या रथाला सात घोडे असतात आणि म्हणून हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करतात असे सांगतात. या दिवशी श्री. आदित्य नारायणाची पूजा करतात. पूजेच्या वेळी सूर्य मंत्र "ओम घृणि सुर्याय नम:" किंवा " ओम सुर्याय नम:" मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे सांगितले आहे. रथ सप्तमीच्या दिवशी अंगणात रांगोळी काढून त्यावर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या पेटवतात. एक मातीच सुगड घेऊन त्याला हळद कुंकू लावून त्यात थोडेसे तांदूळ आणि दूध घालून ते विस्तवावर ठेवावयाचे आणि ते उतू जाईपर्यंत तापवावयाचे आणि उतू जाऊ द्यायचे.आता या सुगडातलं दूध वर येऊन ज्या बाजूला उतू जाईल त्या दिशेला सुबत्ता येते असे मानतात, आणि सुगडातला दूध भात किंवा खीर सुर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. पौष शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया एकमेकींना वाणे वाटून संक्रांती निमित्त हळदी कुंकू करतात,या उत्सवाचा माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो.
रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेचे महत्व सांगणारी एक पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान श्रीकृष्णांच्या अनेक मुलांपैकी जांब नावाचा मुलगा अतिशय सुदृढ प्रकृतीचा,बळकट स्नायूंचा,रुबाबदार असा मुलगा होता. आपल्याला मिळालेल्या उत्तम प्रकृतीबद्दल त्याला स्वात:चा फार अभिमान होता. त्या बळावर तो अशक्त आणि किडकिडीत आशा लोकांचा खूप उपहास करायचा.त्यांची टिंगल टवाळी करून त्यांना खूप त्रास द्यायचा असा तो दुराग्रही आणि दुर्वर्तनी होता.
आपली खूप मोठी तपश्चर्या संपवून अतिशय कृश झालेले दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णांना भेटायला आलेले असतांना या जांबने इतक्या मोठ्या तपस्वी माणसाची तोंडाला येईल ते बोलून खूप हेटाळणी केली त्यामुळे आपल्या संतापासाठी प्रसिद्ध असलेले दुर्वास ऋषी जांबवर संतापले.दुर्वास ऋषी खूप शीघ्रकोपी असल्यामुळे त्यांनी श्रीकृष्ण पुत्र जांब याला क्रोधीत होऊन तू गलितगात्र कुष्ठरोगी होशील असा शाप दिला.श्रीकृष्णांना हे कळल्यावर त्यांनी जांबला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची उपासना करून सूर्य नमस्कार घालून व्यायाम करावयास सांगितले. त्यानंतर त्याचे दुखणे सूर्याच्या केलेल्या या उपासनेमुळे कमी झाले असे सांगितले जाते ,आणि म्हणून रथसप्तमीला सूर्य नमस्करचे खूप महत्व आहे. भगवान श्रीकृष्णांवर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप करणाऱ्या द्वारकेच्या सत्राजिताला सुद्धा सूर्योपासना केल्यामुळे आरोग्य संपदा प्राप्त झाली होती असाही उल्लेख पुराणात सापडतो.
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य नमस्कार घालून सूर्याची उपासना करण्याची पद्धत आहे.हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून मानला जातो. सूर्य नमस्कार घालताना प्रत्येक नमस्काराचे वेळी खाली दिलेल्या नावांचा उच्चार करून बारा नमस्कार घालण्याची पद्धत आहे
ही बारा नावे अशी आहेत:
1) ओम मित्राय नमः
2) ओम सूर्याय नमः
3) ओम खगाय नमः
4) ओम हिरण्यगर्भाय नमः
5) ओम आदित्याय नमः
6) ओम अर्काय नमः
7) ओम रवये नमः
8) ओम भानवे नमः
9) ओम पूष्णय नमः
10) ओम मरिचये नमः
11) ओम सवित्रे नमः
12) ओम भास्कराय नमः
वरील प्रमाणे साष्टांग नमस्काराचेही महत्व सांगितले आहे.
माघ शुद्ध पौर्णिमेला गंगा स्नानाचे महत्व सांगितले आहे. प्रत्येक गावच्या नदीला स्थानिक लोक गंगेच्या ठिकाणी मानतात. नदी ही आपली जीवनदायिनी माता आहे असे आपली संस्कृती आपल्याला शिकविते , त्यामुळे नदीला आई मानून तिची पूजा,आरती करून नदीची ओटी पण काही ठिकाणी भरली जाते.
आपल्या आराध्य दैवताच्या जन्माच्या दिवशीच म्हणजेच श्री.राम जन्माच्या दिवशीच दुपारी बारा वाजता श्री.समर्थ रामदासांचा जन्म झाला. श्री. राम प्रभू व श्री. समर्थ रामदास या दोघांच्या जन्मतिथी व जन्मवेळ एकच असल्याचा सुंदर योग इतर कोठेही ऐकिवात नाही. आपण भारतीय लोक आपापल्या आराध्य दैवताचा जयंती उत्सव साजरा करतो., जसे राम नवमी कृष्णाष्टमी, दत्त जयंती वगैरे , तसेच लोकोत्तर कामे करणाऱ्या थोर संतांची मात्र पुण्यतिथी साजरी करतो. ही आपली त्यांनी आयुष्यभर केलेल्या लोकोपयोगी कामाची एक प्रकारे मानवंदनाच असते. माघ वद्य प्रतिपदेला सुरू झालेला समर्थ रामदास स्वामींचा दासनवमीचा उत्सव हे त्याचे छान उदाहरण आहे. प्रतिपदेपासून नवमी पर्यंत सज्जनगड ,सातारा येथे हा दासनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवात सकाळी काकड आरती,महापूजा,प्रवचन,भजन,मंदिराभोवती पादुकांची मिरवणूक आणि महाप्रसाद असा दिवसभराचा कार्यक्रम असतो.समर्थ रामदासांनी माघ वद्य नवमीच्या दिवशी देह ठेवला असल्यामुळे या दिवसाला दास नवमी असे म्हणतात.
प्रत्येक महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यातल्या चतुर्दशीला शिवरात्र असतेच.वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रींमध्ये माघ महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात आणि त्याला अध्यात्मिक महत्व आहे. समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल विष प्राशन करून भगवान महादेवांनी ब्रह्मांडाला वाचविले आणि सृष्टीचे रक्षण केले तो हा दिवस मोठ्या उत्साहाने महाशिवरात्र उत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. बरेच लोक हा दिवस शंकर पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणूनही साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान महादेवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात.या दिवशी बेलाची पाने वाहून भगवान महादेवाची पूजा करावी असे सांगितले आहे. या बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी. एक पारधी जंगलात शिकार शोधत फिरत होता,परंतु दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही आणि अंधार पडल्यावर तो एका झाडावर चढून बसला.शिकार दिसावी म्हणून त्याने झाडाची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली.योगायोगाने ते झाड बेलाचे होते आणि झाडाखाली भगवान महादेवाचे शिवलिंग होते,आणि आपोआपच त्याच्या नकळत झाडाची पाने शिवलिंगावर पडल्यामुळे त्याच्या हातून नकळत बेलपत्रांचं लक्षच महादेवावर वाहिला गेला आणि त्याला उपवास घडल्यामुळे आशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रतच त्या पारध्याकडून पूर्ण झाले होते आणि तो पावन झाला. यामुळे पारध्याच्या विचार प्रवृत्तीमध्ये एक चांगला बदल झाला आणि तो एक चांगला माणूस बनला आणि त्याने शिकार करण्याचा आपला निश्चय सोडून दिला. अशी गोष्ट पुराणात सांगितली आहे.
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते.शिवलिंगावर पंचगव्य,म्हणजे गाईचे दूध,तूप,शेण,गोमुत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो, आणि त्यानंतर पंचामृती पूजा केली जाते. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.काही ठिकाणी शिवलिंगावर चक्याने पूजा बांधली जाते. या वेळेस शिवमानस पूजा केली जाते आणि "ओम नम: शिवाय" असा जप एकशे आठ वेळा करून महामृत्युंजयचा जप पण केला जातो. महाशिवरात्रीपासून गोवोगावच्या जत्रा या निमित्ताने सुरू होतात. महाशिवरात्रीचा हा उत्सव सर्व देशभर सगळीकडे उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.
सौ . उमा अनंत जोशी,
११.०२.२०२१.*
फोन : ०२०२५४६८२१३ / मो.९४२०१७६४२९.
ईमेल: anantjoshi2510@gmail.com
हा लेख कसा वाटला ? कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments