top of page

मंदाताई खरंच कोण होत्या ???



मंदाताई


लहानपणी शाळेत पाठ्यपुस्तकात स्वयंपाकीण काकुचा धडा सगळ्यांनी वाचलाच असेल. तशाच एका वेगळ्या काकुंशी माझी गाठ पडली त्याचीच ही गोष्ट. त्या आल्या त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलच असे सुरवातीला नाही पण अनुभवांनी मला पटलेच. अगदी वाटले की पुल असते तर व्यक्ती आणि वल्ली मध्ये नक्की एक पात्र वाढलं असतं. तर मंडळी एका प्रभाती मी अगदी कामाच्या गडबडीत असताना तीन तीनदा दरवाजाची बेल वाजली.

टिंग टिंग

टिंग टिंग

टिंग टिंग

मी कणिक भिजवत होते, जरा हात धुवून पोचतच होते , तोवर पुन्हा दरवाजाची कडी पण जोरजोरात वाजवत एक

मध्यमवयीन स्त्री उभी होती.

“अहो, बेल वाजवली ना तीनदा ,मी येतच होते,”

“ ह्या ह्या ह्या ,मला वाटले बेल बंद आहे की काय ? म्हणून मी दरवाजाची कडी वाजविली.”

चेहरा थोडा ओशाळा आणि सालस. घाई घाईत गुंडाळलेली लकस वकस साडी. कपाळावर मोठे कुंकू. साधारण गोरी मध्यमवयीन साधारण अंगकाठीची स्त्री उभी होती. एका नजरेत मी बघितले.

“ घरात येऊ का ताई ? मी मंदा घारे .” स्वयंपाकासाठी त्या साठे काकूंनी पाठवले.

“ अरे हो हो ,या ना आत,”

मी घरात आले.

“तुम्ही समोर बसा, मी हात धुवून येतेच.”

खुर्ची कडे बोट दाखवत मी बसण्याची खूण केली. आणि आत गेले.

दोन मिनटात मी हॉल मध्ये आलेच तर मंदा घारे कुठे दिसेनाच. मी एकदम चक्रावले. गेल्या कुठे या ?

तेवढ्यात हातात फुले , तुळशी घेऊन बगीच्यात उभ्या असलेल्या घारे बाई मला दिसल्या. चेहऱ्यावर थोडे लोचट हसू.

“ वहिनी ,फुले खूप छान लागली आहेत. मी न विचारता तोडली, अर्थात देवाला काही तुम्ही नाही म्हणणार नाहीच ना ”

मी काहीच बोलले नाही.

“ राग नाही ना आला तुम्हाला ?

“ काकू चला आधी आपण कामाचे बोलू या का?”

मी विषय संपवला.


“ वहिनी , कसे आहे घरात माणसे किती त्याप्रमाणे मी पैसे घेते. चार असतील तर चार हजार महिना, त्यामध्ये रोजची भाजी पोळी, वरण भात एवढेच करते. एखादी कोशिंबीर करते. गोड धोड काही करावे लागले तर त्याप्रमाणे वेगळे पैसे द्यावे लागतील. पोळ्या रोज दहा या हिशेबाने पकडल्या आहेत.जादा असतील तर प्रत्येक पाचला शंभर वाढतील. दोन वेळेला यायचे असेल तर तीन हजार जास्त.”

एका दमात इतके सांगून त्यांनी श्वास घेतला. मी त्यांच्या हाती पाणी दिले.

अरे बापरे, माझ्या लग्नाला झाली पंचवीस वर्षे , या हिशेबाने चार गुणिले बारा गुणिले पंचवीस म्हणजे किती , असे

आकडे माझ्या नजरेसमोरून फिरू लागले. बाईग ! म्हणजे बारा लाख झाले की काय ? इतके दिवसात या घरचे मी बारा लाख वाचवले ? हां ,खरेच की.

आणि मला मेलीला एका लाख सुद्धा मागायची कधी हिम्मत झाली नाही ह्यांच्या कडे. शेवटी घरकी मुर्गी दाल

बराबर. मी मनात पुटपुटले.

“ फार जास्त मागत नाही मी, पण आता रेट वाढलेच आहेत. बाहेर मोठ्या ऑर्डर घेते, तेव्हा शंभर प्रमाणेच पात्राची

ऑर्डर असते.” इती घारे बाई.

“काय आहे की माझ्या लेकीचे लग्न दोन महिन्यांनी आहे, बाकी कामे पण असतील तेव्हा निदान तीन महिने तरी

मला स्वयंपाकाची बाई हवी आहे.”

“लग्न आहे होय ? मला बाई लग्न घर फार आवडते. खूप छान कित्ती मज्जा! ”

घारे बाई अगदी नाचल्या सारख्या गर्रकन फिरल्या. आता या गिरकी घेतात की काय असेच वाटले मला. त्यांचा तो

लहान मुलीचा अभिनिवेश बघून मला हसावे की रडावे तेच समजेना.

“ मग उद्यापासून येऊ का मी ? किती वाजता ?”

“ठीक आहे या उद्या नऊ वाजता.”

दुसऱ्या दिवशी मंदा ताई नऊ वाजण्या आधीच तयार.

“ वहिनी , अहो मी इथे आता तीन महिने काम करणार, म्हणजे तुमच्या घरातली होऊन. मग मला सगळे घर माहीत हवेना.”

मी एकदम अवाक झाले. हे काय विचित्र?

“ वहिनी, तुमची मुलगी आता किती वर्षाची आहे? तरी बावीस चोवीस असेलच ना.आता माझी पण तेवढीच राहिली

असती हो, दहा वर्षांची होती तेव्हा खूप तब्येत जास्त झाली होती आणि अचानक आम्हाला सोडूनच गेली ती देवाघरी.

आज मी पण तिचे लग्न केले असते.”

“मृणाल आता चोवीस ची होईल,”

नकळत मी उत्तरले. या बाईचा काहीच अंदाज येत नव्हता. जरा जादा कारभार तर करणार नाही ? पण साठे वहिनी म्हणाल्या होत्या, अगदी खात्रीची बाई आहे, तू डोळे मिटून ठेवून घे. कुठे म्हणून तुला त्रास होणार नाही घरातल्या सारखी मदत करेल, म्हणून मी तयार झाले होते.

“ माझी मृणाल ची ओळख करून द्या ह आधी. नवरी मुलगी फार आवडते मला.”

इतक्यात मृणाल खाली आली. तेव्हा मंदाताई स्वतः तिचे अभिनंदन करू लागल्या. बहुदा कुठेतरी त्या तिच्यात

त्यांच्या मुलीला शोधत होत्या. तिच्याशी बोलून सगळे घर बघून झाले. मग मात्र त्या निमूट कामाला लागल्या.

एकंदरच साठे वहिनी म्हणाल्या ते खरेच होते. तशा चटपटीत आणि हाताला खरेच चव होती. दुसऱ्याने चार घास

जास्त खावे, यासाठी आग्रह होता. दोन चार दिवसात त्या इतक्या रुळल्या की वर्षानुवर्षे आमचे घरी काम करीत होत्या.


फक्त एकच गोष्ट खटकत होती. लग्न त्याची खरेदी, त्याच्या गोष्टी सुरू असल्या की त्या जरा वेगळ्या विश्वात

जायच्या. एक वेगळी चमक त्यांचे डोळ्यात दिसायची. किंवा तिथे त्या जास्तच लक्ष देतात असे जाणवत होते.

विहिणीला काय देणार, नणंद दुर्डी काय घेणार एक ना दोन चौकशा. कधी उगाच एखादा सल्ला.

“ वहिनी माझे एकता , असे केले तर बरे दिसेल.विहिनीला एक हिरवी आणि आहेराची दुसरी साडी घ्या.”

उगाचच चांभार चौकशा पाहून एकदोनदा मला त्यांना रागवावेसेही वाटले.पण आता दोन तीन महिने निभवायचे आहे, उगाच कशाला वाईट व्हायचे ? असा विचार करून मी गप्प बसले. कधी असेही वाटले तेवढ्या गोष्टीत जर त्यांना समाधान वाटत असेल तर काय हरकत आहे ? शेवटी बिचारी आई ती. कुठेतरी तिनेही लेकीच्या लग्नाची स्वप्ने पाहिली असतील.


घरातले पण एकंदर त्यांच्या स्वयंपाक आणि पदार्थांवर खुश होते. मृणाल तर म्हणेल तो पदार्थ त्या तिला करून देत. अगदी कौतुकाने तिचे हट्ट पुरवीत. त्यामुळे मंदा मावशी तिच्या फेवरेट झाल्या होत्या. त्यामुळे तेवढी लग्न या

विषयातली त्यांची काहीशी चमत्कारिक वागणूक मी नजरेआड करण्याचे ठरविले. असतात काही नाजूक बाबी. नसेल मन भरल या विषयावर. लग्नाला आठच दिवस उरले होते.खऱ्या अर्थानी लगीनघाई सुरू झाली होती. दोन दिवसात पाहुणे पण येऊ घातले होते.


“मंदाताई आता दोन दिवसांनी खरे लग्न घर होईल. तुम्हाला आता जास्तीचा स्वयंपाक ,कामे राहतील. तेव्हा तयारीत रहा.”

“ वहिनी , मला काय कळत नाही का माझी जबाबदारी ? तुम्ही बेफिकीर रहा. मी काही कमी पडू देणार नाही, उरवून

वाया पण घालणार नाही. पडेल तेव्हा रांधायची तयारी आहे माझी.”

“ ठीक आहे, पण नाहीतर चार दिवसांनी इथेच रहायला येता का ? मलाही बरे पडेल,”

“ नाही हो, घरी आमचे बाबा आहेत ना, मी कितीही उशीर पर्यंत थांबेन पण अंग टाकायला घरीच जाईन.”

“ बघा तुम्ही कस करायचे ते.”


आता लग्न पाच दिवसांवर आले होते. उद्या ग्रहमक कुलाचार होता. सगळा स्वयंपाक मंदाताई करणार होत्या. मदतीला त्याच एकीला घेऊन येणार होत्या. सकाळचा सगळा कार्यक्रम पूजेचा,जेवणाचा पार पडला. शेवटची पंगत चालू होती.

इतक्यात ……


“ मंदा काकू इथेच काम करतात का ? ”

दरवाजा जवळ एक पोरसवदा मुलगा जोरात विचारत होता. कुणी तरी मंदा ताईंना बोलावले. तो त्यांच्या शेजारी रहाणारा मुलगा होता. त्यांचे यजमान अचानक चक्कर येऊन पडले असा निरोप घेऊन तो आला होता. ते ऑफिसमध्येच पडले होते आणि त्यांना दवाखान्यात नेले होते.

“ वहिनी , आता मी काय करू हो ?”

“मंदा ताई तुम्ही आधी दवाखान्यात जा,तिथे काय हवे नको ते बघा. इथली काळजी करू नका.”

“ नाही हो, कार्य चार दिवसावर , अन् माझ्यामुळे तुमची किती पंचाईत ?”

“मला तर काही सुचत नाहीय.”

“ तुम्ही आता आधी तिकडे जा बर ,तुम्हाला कुणी तरी सोडून देईल.”

मी ड्रायव्हरला आवाज देऊन त्यांना तिकडे सोडायला सांगितले.

“ पण वहिनी , मला ते गंगावन आणि ती साडी नक्की ठेवा हो. जमले तर मी उद्या येतेच. मृणाल चे लग्न तर मला

बघायचेय आहे ,”


दोन दिवसापूर्वीच मी त्यांना देणार होते ती अहेराची साडी दाखवली होती. मुली बाहेर काही सामान आणायला गेल्या तेव्हा त्यांनी स्वतः साठी गंगावन आणायला सांगितले होते. पण आत्ता या क्षणाला ह्या गोष्टीत त्यांचे मन असलेले पाहून मला जरा धक्काच बसला. वेळ काय अन् यांचा हट्ट काय ? जरा अतीच वाटत होते .

काय करावे बरे ? मी आई कडे बघितले. ती मला खुणावत होती.बाजूला बोलवत होती.

“काय ग आई ?”

मी विचारले.

“ एक काम कर ,तू आत्ताच त्या म्हणत आहेत ते देऊन टाक , त्यांना. उगाच आपल्याला देखील रुखरुख नको.”

“ अग पण बरे दिसेल का ?”

“ हे बघ अजुन तसे काही झाले नाहीय. आणि त्या नाही आल्या तर ,तुलाही मनात राहील.”

हे कुठेतरी मला पटले आणि मी त्यांना थोडे अधिकच पैसे, साडी,बांगड्या आणि आणखी वस्तू दिल्या. ड्रायव्हर लगेच दवाखान्यात सोडून आला.

आता पर्यायी व्यवस्था म्हणून अजुन एका बाईला दुसरे दिवशी बोलावले. देवाला हात जोडले,

“कुठलेही विघ्न आणू नकोस रे बाप्पा,कार्य निर्विघ्न पार पाडू दे.”


मंदा ताई आता बहुधा येणार नाहीत, अशीच आमची अटकळ होती. पण दुसऱ्या दिवशी नऊच्या ठोक्याला त्या हजर.

“ वहिनी ,मी आले बर का.”

“ मंदा ताई काकांची तब्येत ठीक आहे ना, काय झाले होते, तब्येत वगैरे

सगळे ठीक आहे ना ?”

“ काही नाही, थोडे ब्लडप्रेशर कमी झाले होते, म्हणून चक्कर आली होती. अजुन दवाखान्यात आहेत. पण उद्या घरी सोडतील.नंतर घरी आराम करायला सांगितले आहे.”

“ पण तुम्ही थांबायचे ना तिथे , ते जास्त महत्वाचे होते की नाही ? कशाला त्यांना सोडून आलात? इथे कसेही होऊन

जाईल.”

“ अहो, पण माझ्या लेकीचे लग्न माझे शिवाय कसे होऊ द्यायचे ? मला घरी बसवेल का ? माझा आहेर करायचा

होता.”

मला यावर काय बोलावे ते सुचलेच नाही. मंदाताई आपल्या कामाला लागल्या. जरा वेळाने आम्हाला एकत्र बसवून

त्यांनी रीतसर आहेर देखील केला. शिवाय मी काल दिलेले पैसे पण परत केले. मृणाल साठी स्वतः विणलेले एक स्वेटर देखील आणले होते.

“वहिनी मी दिलेला आहेर कुणाला देऊ नका बरे, मी खूप आवडीने घेतले आहे सगळे. आणि या कामाचे मी खरेच पैसे घेणार नाही.मी ठरविले आहे तसे. तुम्हाला फोटो दाखवते माझ्या मुलीचा, अगदी तुमच्या मुलीचा तोंडवळा आहे हो.”

त्यांनी दाखवलेला फोटो आम्ही बघितला.खरेच नाकी डोळी साम्य वाटत होते. मृणालचा म्हणून लहानपणच्या

कुठल्याही फोटोत हा सहज खपला असता. आम्ही आश्चर्याने थक्क झालो. जगात एकसारखी दिसणारी माणसे असतात हे ऐकलेच होते. पण असे काही होईल असे वाटले नव्हते.

“ खरच मंदाताई, खूप साम्य आहे.”

“ म्हणून तर वहिनी आल्या दिवसापासून मी माझ्या छकुलीचे लग्न आहे , असे समजते. तुम्हाला वाटलेही असेल की

मी जास्त लक्ष देते पण माझी मुलीच्या लग्नाची हौस भागवून घेत होते. उद्या हिचे लग्न लागले की पुन्हा एकदा

मला छकुली सोडून गेल्याचे दुःख वाटेल हो. आता मात्र मी दोनतीन दिवस येणार नाही. बाबा ना घरी सोबत रहावे

लागेल.पण लग्नाला मात्र नक्की येते.”

त्यांच्या या उत्तराने मी खरेच निशब्द झाले. आणि त्यांना मायेने जवळ घेतले. शेवटी एका आईला दुसऱ्या आईची ती भावना नक्की समजली होती. मंदाताई आता कायम आमच्या घरच्या झाल्या होत्या.त्यांनी खरेच जीव लावला होता.


लग्न व्यवस्थित पार पडले. दुसऱ्या दिवशी मंदाताईचा पत्ताच नव्हता. त्या येणार होत्या पण कामाला आल्या नाहीत

म्हणून मी पुन्हा ड्रायव्हरला त्यांचे घरी पाठवले. तिथे त्यांचे घरी कुणी नव्हतेच.बाजूला विचारल्यावर कळले की चार

दिवसापूर्वी त्यांचे मिस्टर हार्ट फेल झाल्याने वारले होते. आणि याचा धक्का सहन न झाल्याने मंदा ताईही दोन दिवसांनी घरीच घेरी येऊन पडल्या होत्या. मागचे दोन दिवस त्या हॉस्पिटलला होत्या. मात्र त्यांचेही दोन दिवसापूर्वीच निधन झाले होते. ड्रायव्हर तर एकदमच चपापला. तो कसाबसा घरी पोचला.त्याचे तोंडी हे सर्व ऐकले आणि मी मटकन खालीच

बसले. मला काही सुचेचना.पाय थरथर कापत होते.

मग कालच्या लग्नात मी दिलेली साडी नेसून आलेल्या मंदाताई खरंच कोण होत्या ???



लेखिका: स्वाती वैद्य (रावेत ,पुणे)

मो.: 9890373139

ईमेल: su.vaidya6@gmail.com


 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.


840 views0 comments

Recent Posts

See All

Comentários

Não foi possível carregar comentários
Parece que houve um problema técnico. Tente reconectar ou atualizar a página.
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page