हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात.
मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर,डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो.मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो.हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतीशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. या वेळी धनधान्याची सुबत्ता असते.
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं
मासानां मार्गशीर्षोsहं ऋतूनाम कुसुमाकर:
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवतगीतेमधील विभूतीयोग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे.सामवेदातली गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुति म्हणजे बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद , सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतुंमध्ये वसंत ऋतु जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्णवर्षातलं उच्च स्थान कसे आहे ते भगवत गीतेत वर्णिले आहे.
मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हां धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास, खरमास,धुंधुर्मास असे म्हणतात. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो.त्यावेळी हवेत खूप गारठा असतो.दिवस लहान व रात्री मोठ्या असतात,त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते.या काळात धुंधुरमासाचे व्रत केले जाते.आरोग्य शास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासात दिसतो. या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर ऊन्ह चढायच्या आत जेवण केले जाते.या जेवणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी,वांग्याची भाजी , पावट्याची उसळ, वांग्याचे भरीत , गुळाची पोळी , बाजरीची भाकरी,लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात.मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात,त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात म्हणून या आहाराला व्रताचे स्वरुप दिले गेले असावे.जो पर्यंत हवेत सुर्योदयापर्यंत गारठा असतो तो पर्यंत हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे.कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे,त्याचा हेतु हाच आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे.आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्व त्यामुळेच वर्णिले आहे.
त्रिपुरी पौर्णिमेला जशी त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे देवदिवाळी साजरी केली जाते त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पण देवदिवाळी साजरी केली जाते. देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापन केला जातो. ताम्हनामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेऊन त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडले जाते.श्रीफळ कलशाची विधिवत पूजा केली जाते,त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधली जाते.आशा रीतीने घटस्थापना झाल्यावर पाच अथवा सात पानांची माळ सोडतात. अखंड तेलाचा नंदादीप देवाजवळ सहाही दिवस तेवत राहील असे पाहतात,आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. असा पूजा विधी सांगितला आहे .मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षडरात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात .प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्ठीपर्यंत रोज मल्हारी महात्म्य,मार्तंड विजय ग्रंथ याचे पारायण करावे असे सांगितले आहे.
या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी.मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्व सांगितले आहे.पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखविला जातो.
चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते. पुरणा वरणाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखविला जातो.घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो.घरातल्या पै पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातला खोबर आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो.मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाच आणि ऋषिमुनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांच युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लांचा संहार केला म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांज्याच्या गोड घारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो.
॥५४ ।। संस्कृत बावीस अध्याय उत्तम । ग्रंथ जाणिजे मल्लारिमाहात्म्य । त्याची प्राकृत टीका सप्रेम । दो अध्यायांत कथियेली ।।५५ ।। ब्रह्मानंदा श्रीधरवरा । म्हाळसाहृदयारविंद भ्रमरा । भक्तवत्सला करुणासमुद्रा । अतिउदारा अभंगा ! ।। १५६ ।। ।। इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्य सम्पूर्णमस्तु ।।
महिमा अपार । वणू न शके सहस्रवक्त्र जाऊन पूजिती जे नर । त्यांस इहपरत्र सुखरूप ।।१६ ।। ब्रह्मादि शक्र ऋषि मिळोनी । मृत्तिकेची लेपे करोनी । प्राणप्रतिष्ठा करिता तत्क्षणी । सजीव जाली रूपे तीच।।१७ ।। म्हाळसा गंगा दोघी जणी । दोहीकडे विलसती कामिनी । दिव्यवस्त्री दिव्याभरणी । देदीप्यवंत सर्वदा।।१८ ।। देव म्हणती , ' मल्लारी ! । तू कुळदैवत ज्याचे घरी । त्याचे सर्व काम पूर्ण करी । उणे तिळभरी पडो नेदी ।।१९ ।। अष्टगंधे आणि भंडार । आरक्तपुष्पे गुंफून हार । अचिंती जे म्हाळसाप्रियकर । तेचि नर धन्य पै ।।१२० ।। तुझे
रत पूर्ण । त्यास मी अंतबाह्य रक्षीन । कोठाह पडा नंदा न्यून । भक्ताअधीन मी साच ! ' ।। ०७ ।। त्यावरि कल्प वृक्षातळी । दोनी लिंगे उत्पन्न जाली । मल्लारी म्हाळसा देव सकळी । षोडशोपचारे पूजिते जाले।।०८ ।। मासांमाजी उत्तम मास । हरीची विभूति मार्गशीर्ष । शुद्धपक्षी चंपाषष्ठीस । शततारका नक्षत्री।।०९ ।। रविवारी प्रकट अवतार । मणिमल्लमर्दन परमेश्वर । देव ऋषि गंधर्व
ब्रम्हांड पुराणात सुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी रविवारी शततारका नक्षत्र असताना मल्हारी मार्तंड प्रगट झाल्याचा उल्लेख आहे , त्यावेळी देवांनी त्यांची पूजा करून त्यांच्यावर चंपक पुष्पांची वृष्टी केली असा उल्लेख आहे.
मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्षमी व्रत केले जाते.आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता रहावी यासाठी हे व्रत केले जाते. या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मणही बोलवावयची जरुरी नसते. जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करावयाचा असतो.ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढावयाची असते.त्यावर चौरंग ठेऊन एक ताम्हण ठेवून त्या ताम्हनात अक्षता ठेऊन त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी, दुर्वा, द्रव्य टाकून त्याच्यावर विड्याची पाने गोलाकार ठेवून त्यावर श्रीफळ ठेवलं जातं.कलशाला आणि नारळाला हळदीकुंकू लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वर देवीचा मुखवटाही ठेवला जातो. लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी,आणि सौभाग्यच वाण दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते. गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो. या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळदकुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मानसन्मान आणि आदर सत्कार केला जातो आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो. श्री. महालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. पार्वती,सिंधुकन्या,महालक्ष्मी,लक्ष्मी,राजलक्ष्मी,गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशिला, अशा विविध नावांनी श्री. महालक्ष्मी ओळखली जाते. हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते.
मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. ह्या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्य प्राण्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात. कुरुक्षेत्रावर जेव्हां कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते तेव्हां आपल्या नातलगांना, गुरूंना, भावंडांना मारून मला आमचा विजय मिळवावयाचा नाही, तरी मी त्यांच्याशी कसे लढू अशा संभ्रमात असलेल्या धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्माविषयी आणि धर्माविषयी दिलेले ज्ञान म्हणजेच भगवतगीता होय. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण साजरी केली जाते कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला होता.एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही गोष्ट अखिल विश्वात गीतेचे वैशिष्ट्य आणि महात्म्यच सांगून जाते. समग्र महाभारताचे सारच महर्षी व्यासांनी भगवत गीतेत सांगितले आहे. प्राचीन काळी गीतेला उपनिषदाचा पण मान दिला गेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने समस्त मानवजातीला जीवन कसे जगावे याची शिकवणच दिली आहे. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, आणि महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी पण गीतेवर चिंतन केले आहे. म्हणूनच गीता हा भारताचा धर्मग्रंथ बनला आहे आणि तो सर्वांना आदरणीय आणि वंदनीय पण आहे. म्हणून गीता जयंतीच्या दिवशी भगवत गीता ग्रंथाची पूजा केली जाते आणि त्याचे वाचन केले जाते. अलिकडच्या काळात आचार्य विनोबा भावे यांनी पण गीतेचे थोरपण अगदी आदराने, विनयाने, आणि भक्तिभावाने मान्य केले आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पाजलेल्या गितामृताच वर्णन संस्कृत श्लोकात केले आहे तो श्लोक खालीलप्रमाणे.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन:
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धम् गीतामृतं महत.
ज्याप्रमाणे एखादा गवळी आपल्या गोठ्यातल्या गाईचे दूध काढून तिच्याच वासराला प्यावयास देतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषदांमधील जीवन विषयक तत्वज्ञान एकत्र करून गोंधळलेल्या अर्जुनाला हे गीतारूपी बोधामृत पाजून त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले असा वरील श्लोकाचा अर्थ सांगता येईल.
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त गुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या आधी दत्तात्रेयांचे भक्तगण सात दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात,त्याला गुरूचरित्राच्या परायणाचा सप्ताह असे म्हणतात. ठिकठिकाणच्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी भजन,कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी दत्त गुरूंची पूजा धूप दीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रात औदुंबर,नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो.
दत्त जन्माची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की दत्तगुरु हे अत्री ऋषी आणि माता अनसुयांचे सुपुत्र. हे भगवान विष्णूंचा अवतार समजले जातात. एकदा अत्री ऋषींनी खडतर तप केले होते. त्यांच्या या तपामुळे प्रसन्न होऊन ब्रम्हा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अत्री ऋषींना दर्शन दिले.अत्री ऋषींच्या मागण्याप्रमाणे त्यांची पत्नी अनसूयेच्या पोटी तीन पुत्र जन्माला आले त्यांची नावे सोम म्हणजे चंद्र, दत्तात्रय आणि तिसरा दुर्वास अशी होती. पुराणानुसार दत्त जन्माची आणखीन एक गोष्ट सांगितली जाते. इंद्र आणि इतर देवतांच्या मागणीप्रमाणे ब्रम्हा, विष्णू, आणि महेश अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिचे पातिव्रत्य भंग करण्यासाठी किंवा तिच्या पातीव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी साधूंचा वेष करून अत्री ऋषींच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांनी अनसुयेकडे आम्हाला भूक लागली आहे तेव्हा आम्हाला जेवावयास वाढा अशी विनंती केली. अनसूयेने त्यांची पाद्य पूजा करून त्यांना जेवावयास पाटावर बसवून जेवण वाढण्यासाठी तयारी केली. पण आम्हाला तुम्ही विवस्त्र होऊन जेवण वाढावे अशी इच्छा तिच्याकडे तीनही साधूंनी व्यक्त केली. पतीपरायण आणि सत्शील असलेल्या अनसूयेने तिचे पती अत्री ऋषी यांची आठवण काढून त्या तीनही साधूंच्या अंगावर थोडेसे तीर्थ शिंपडले. आता त्या ठिकाणी पाटावर तीन साधूंची तीन बाळे झाली होती आणि ती भुकेमुळे रडत होती. त्या तिघांना आपल्या छातीशी धरून अनसूया मातेने त्यांना दूध पाजून एकेकाला शांत केले आणि ती बाळे झोपी गेली. अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले अत्री ऋषी जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा सती अनसूयेने त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. हे तीनही साधू नसून ब्रम्हा विष्णू आणि महेश आहेत हे अत्री ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्याने ओळखले. मग हे तिघे जण अत्री आणि अनसूया यांच्यापुढे मूळ रुपात प्रगट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले.अनसूयेने आपण आमच्या पोटी जन्म घ्यावा असे सांगून आपली इच्छा व्यक्त केली.अनसूया मातेला तीन पुत्र झाले.ब्रम्हदेव झाले सोम किंवा चंद्र,भगवान विष्णू झाले दत्तात्रेय ,आणि महेश झाले दुर्वास. य तीनही पुत्रांमध्ये तीनही देवांचे अंश होते आणि तिन्ही देवांचे तत्व घेऊन अत्री ऋषींचा मुलगा देवांनी दिला म्हणून दत्तात्रेय या नावाने गुरुपरंपरेच मूळ पीठ म्हणून दत्तात्रेय महा प्रभू म्हणून पुजले जाऊ लागले. ब्रम्हा विष्णू आणि महेश या तीनही देवांच तत्व किंवा देवांचा अंश असलेली तीन चेहेरे असलेली दत्तात्रयांची मूर्ती बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते . पण काही ठिकाणी तीन चेहेरे नसून एकाच चेहेऱ्याची दत्तात्रयांची मूर्ती असते तिला एक मुखी दत्त असे म्हणतात. दत्तगुरूंचे भक्तगण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त अशा नावाचा जप करून किंवा घोष करून दत्तात्रयांची आराधना करतात. महाराष्ट्रात श्री. दत्त आराधनेची उज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ह्या पाच संप्रदायातील असलेले भक्तगण श्री. दत्तात्रयांची उपासना करतात.श्री. दत्तगुरु दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला,चंदनाची उटी लावायला प्रयागला, तर दुपारची भिक्षा मागायला कोल्हापूरला जात असत. दुपारचे जेवण बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर येथील गोदावरी नदीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाडयातील बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे जात असत तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिशारण्यात पोहोचत असत.निद्रेसाठी मात्र माहूर गडावर आपल्या अनसूया मातेकडे जात असत आणि योगासाठी गिरनार पर्वतावर जात असत असे सांगितले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार,श्री.नृसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे असे म्हणतात.महाराष्ट्रात हिंदूंच्या प्रमाणे मुस्लिम समाजात पण दत्त गुरूंची उपासना केली जाते.
एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातली उत्तम हवा,सुरू झालेली लग्न सराई, खंडोबाचे नवरात्र,देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत,गीताजयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री. दत्तगुरूंचा जन्म सोहोळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंधुरमास या सर्वांमुळे खरच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेवाद्वितीय आहे असे म्हटल्यावाचून राहवत नाही.
सौ उमा अनंत जोशी
कोथरूड, पुणे
02025468213
9420176429
Email.: anantjoshi2510@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
सुंदर !