top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

मौनराग - अस्वस्थ बंदिश!!



जसजसे वय वाढत जाते तशा आपल्या जाणीवा बदलत जातात, विचार करायची वृत्ती बदलते. एकूणच "माणूस" म्हणून प्रगल्भ तरी होतो किंवा प्रसंगी एककल्ली!! अर्थात, विचारांत परिवर्तन तर नक्कीच होते. पूर्वी कसे वागलो यावर विचार करता, त्यात अनेक दोष देखील दिसायला लागतात!! असे देखील होऊ शकते, आपण अधिक "राठ" होऊ शकतो. अर्थात, यात अनेक गोष्टी अंतर्भूत असतात आणि केवळ एकाच बाजूने त्याकडे बघणे संय्युक्तिक नसते!! हि वृत्ती देखील बनू शकते. "मौनराग" म्हणजे अशाच विचारांचा आढावा आहे. मला, हे नाव फार अन्वर्थक वाटले. खरेतर "मौन" आणि "राग", या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी!! संगीताचे प्रकटीकरण नेहमीच आविष्कृत साधनेतून सादर होते आणि मौन, म्हणजे सगळा संवाद वठलेला!! जरी मौनात संवाद होऊ शकला तरी तो संवाद सहजप्राप्य नसतो. अशावेळी मनात येते, नेमके हेच नाव, लेखसंग्रहाला का द्यावेसे वाटले? थोडा विचार करता, याची संगती लागते. संगीत जरी सादरीकरणात आविष्कृत होत असले तरी, याची साधना हि नेहमीच अंतर्मनात चालू असते आणि त्या मैफिलींचे "दर्शन" कधीच कुणाला होत नसते!! त्यातून, "राग" हि कल्पना, भारतीय संगीतातील अत्यंत विशाल, अगदी "आदी-अंत" नसलेली ध्वनिरूप कल्पना!! यादृष्टीने, मला हे नाव अतिशय आवडले.


पहिलाच लेख - "काळोखाची फुले". खरतर, "फुले" ही नेहमीच उजेडाचे,आनंदाचे प्रतिक मानले जाते. रात्री फुले उमलत नाहीतच, असे नव्हे. तरी, "काळोख" या नावाने जेंव्हा फुलांना विशेषण दिले जाते, तेंव्हा ती फुले नक्कीच "आनंद" या भावनेला पारखी असतात. याच भावनेचे प्रतिबिंब या लेखात पडलेले आहे. वास्तविक, लेखात अनेक, आकाराने छोट्या अशा गोष्टी आहेत, बहुतांशी पूर्वायुष्यातील आहेत. सुरवातीला दोमिएच्या चित्राने, मनात उमटलेले तरंग, पुढे एका नातेवाईकाचा मृत्यू, शाळेत नार्सिससची कथा शिकवतानाचा आलेला अनुभव, फार पूर्वी घरात येणारी गाणारीण बाई, आरसेमहालाच्या आठवणी आणि एका स्नेहाच्या मुलाची शोकांतिका!! या सगळ्या आठवणी दोन,तीन परिच्छेदाच्या सहाय्याने लिहिलेल्या आहेत. वरवर वाचता, एकचा दुसऱ्याशी काय संबंध? असा प्रश्न उद्भवू शकतो पण तरीदेखील, या प्रत्येक गोष्टीतील दु:खाची प्रत सारखी आहे. घरी येणारी गायिका, पुढे अचानक एका स्टेशनवर भेटते आणि लेखकासमोर तिचा भूतकाळ उभा राहतो, नातेवाईकाचा विषण्ण करणारा मृत्यू याच अनुरोधाने मनात ठसतो तर वर्षानुवर्षे नार्सिससची कथा शिकवून देखील, एका विविक्षित क्षणी त्या कथेतील आत्मलुब्धता करुणामय होते, याची ठसठसणारी जाणीव, सगळे वाचताना आपण अंतर्मुख होतो. मला तर, पुस्तक वाचताना, कुठेतरी आपण विचारप्रवृत्त झालो नाही तर फार अपुरे वाटते आणि मताने बघायला गेल्यास, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत पण तरीही विचार करायला लावणाऱ्या आहेत, कुठेही लेखनात फोफषेपणा नसून, घडण अतिशय बांधीव आहे.


"अरण्यातील आत्मभान" हा लेख म्हणजे अल्पाक्षरी कविता आहे!! शिक्षकी पेशात वावरताना, आजूबाजूला अनेक विद्यार्थी भेटतात. त्यातला एक विद्यार्थी!! एका स्पर्धेत बक्षीस न मिळाल्याने दुखावला गेलेला!! असे दुखावणे, आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवलेले असते. अशा वेळी, त्याचा आत्मविश्वास खचलेला असतो. या मुद्द्याने पुढे लेखात विस्तार केलेला आहे. कलावंत म्हणून जगताना, वावरताना आणि पुढे चालत असताना, ज्या "अटळ" बाबी भोगाव्या लागतात, त्यातून कलावतांना आपली अशी "वेगळी" वाट शोधावी लागते, जेणेकरून प्रस्थापित होणे शक्य असते!! ही वाट शोधण्याचे "आत्मभान" आणि त्या "आत्मभानाची" वाट शोधण्यासाठी गाठावे लागणारे "अरण्य"!! असा सगळा प्रवास म्हणजे हा लेख!! हा लेख वाचताना, मला जी.ए. कुलकर्ण्यांच्या कथेतील एक वाक्य आठवले - "इतरांचे प्रवास संपतात पण रस्ता राहतो, पण आपला मात्र प्रवास संपून गेला आहे पण प्रवास मात्र चालूच राहणार आहे."


"गहकुटं विसंडितम" म्हणजे मोठेपणी पाठीला डोळे फुटल्यावर आरशाच्या तुकड्यातून अवलोकता येणारे बालपण!! लहानपणी राहिलेलो, वऱ्हाडातील "पारवा" गाव, त्यावेळच्या आठवणी, आणि एके दिवशी अचानक स्वत:ला अचानक गाव सोडून दुसरीकडे राहावे लागणे, तशात, ते गावच आई-वडिलांनी कायमचे सोडणे, याचा मनावर उमटलेला चरका!! गाव सोडताना,घरातील सगळ्यांना विश्वासात घेऊन सोडलेले (फक्त लेखकाला वगळून!!) त्यामुळे मनात राहिलेली अढी!! पुढे स्थिती जरा व्यवस्थित झाल्यावर, मनात परत "मूळ" गावाला भेट देण्याची अनिवार्य इच्छा आणि त्या इच्छापूर्तीनंतर मनात साठलेले विषण्णपण!! या सगळ्या भावनांचा अनुपमेय आलेख, या लेखात आहे. पुनर्भेटीत बालपणीच्या गहाळ झालेल्या गोष्टी, म्हणजे काही झाडे, झोपाळा वगैरे…. त्यामुळे खंतावलेले मन.


"जातस्य हि ध्रुवो मृत्यू". एका क्षणी अचानक, वडील घर सोडायला सांगतात, त्यामुळे मनात आई आणि वडिलांच्या बाबत निर्माण झालेली "अढी"!! "तुला आम्ही देऊन टाकलंय नs! तू आता इथं परत यायचं नाही." या वाक्याने उमटलेला कायमचा ओरखडा!! पुढे आईवडिलांच्या अंत्यसमयी देखील भेटीला गेलो असताना, मनात तोच ओरखडा नागाच्या फण्याप्रमाणे उभा राहतो आणि वागण्यात कोरडेपणा येतो. यामुळे, मनात खोलवर दडलेली असुरक्षतेची भावना, विशेषत: ""आपले इथे कुणी नाही" अशी वैफल्यग्रस्त भावना मनात राहते. दिवस असेच जात असतात परंतु अचानक एका रात्री निसर्गाच्या अलौकिक दर्शनाने मनाला आलेली उभारी, हा निसर्गाचा चमत्कार काही क्षणांचाच पण अंतर्बाह्य थरकवुन टाकणारा!! त्यामुळे आत्तापर्यंतचे घालवलेले आयुष्य आणि यापुढे घालवायचे आयुष्य, किंबहुना मनातला संभ्रम नाहीसा करणारा अनुभव, या लेखात फारच सुरेख मांडला आहे.

"पुन:पुन्हा" हा लेख असाच ज्याला Nostalgia म्हणतात असाच आहे. लेखक, परदेशप्रवासाला निघतो. परदेशात भारतीयांना कशी वागणूक मिळते हा खरेतर विशेष संशोधनाचा विषय आहे!! अर्थात, संशोधन कितपत नेमके होईल याबद्दल बऱ्याच शंका आहेत. असो, अशाच प्रवासात रोम येते. त्यानिमित्ताने, अनेक प्रक्षणीय स्थळे बघण्याच्या उद्देशाने पायपीट चालू असते. अशीच पायपीट चालू असताना, "काप्री" ला जायचे ठरते परंतु हवामान योग्य नसल्याने , सोरन्तो इथल्या पोंपई गावाला भेट देण्याचे आणि त्या निमित्ताने वेसुवियसचा जागृत ज्वालामुखी आणि त्याने बेचिराख झालेले शहर बघायचे ठरवतो. सगळीकडे उद्धस्ततेचे नमुने दिसतात आणि त्या उध्वस्ततेतून अचानक मनातील "पारवा" जागृत होते आणि फारान्यातली सगळीच मजा निघून जाते. लगेच मनात तुलना, त्या आठवणी याचा फेर सुरु होतो. लेखकाला प्रश्न पडतो, आपल्या मनातले "पारवा" गाव कधीच नष्ट होणार नाही का? बालपणीच्या विद्ध करणाऱ्या आठवणी या मनात नेहमीच जिवंत असतात, हेच खरे!!


"पुनरागमनाय च" हा माझ्यादृष्टीने खरा "ललित" लेख, संपूर्णपणे अंतर्मुख होऊन लिहिलेला. आईच्या माहेरच्या आठवणीने सुरवात होते, ( तोपर्यंत आईला माहेर नाही, हीच सगळ्यांची समजूत!!) चिखलदऱ्याला जाताना, अचानक एका मित्राच्या आग्रहाने एका वाड्याला भेट द्यायला काय जातात आणि आठवणी व गप्पांच्या नात्यात आपल्या आईचे हेच "माहेर" असा शोध लागतो आणि मनात, त्या रात्री विचारांच्या असंख्य गुंतवळी निर्माण होतात, भोवंडायला होते,. आईने या आठवणी आयुष्यभर स्वत:शीच ठेवल्या, कधी विचारणा केली तरी कधी अवाक्षर काढले नाही!! या निमित्ताने, एक लेखक म्हणून या आठवणींनी झालेली बेचैनी, घटनांमागील ठसठसणाऱ्या सत्याची विखारी जाणीव आणि त्या जाणीवेने जाणवणारी ग्लानी, याचा सगळा आलेख आहे. वाचताना हेच लक्षात येते, आत्मपर लेखन म्हणजे पोरखेळ नव्हे!!


संगीताची भाषा तशी अनिर्वचनीय म्हणायला हवी. कुठले संगीत कुणाला कशा प्रकारे "साद" घालील, याचा कुणालाच कधीही पत्ता लागत नाही. वेगळ्या अनुभूतीने म्हणायचे झाल्यास, कवी अनिलांच्या भाषेत "आज अचानक" असे अवचितपणे संगीत आपल्याला भेटले की मनात जी स्तब्धता साठते ती केवळ अपूर्व असते, मग लेखकाला अवचित ऐकायला आलेला लताबाईंचा सूर किंवा हिराबाईंची सोज्वळ लय!! तसेच ध्यानीमनी नसताना, भेटलेला "बाख", त्यानिमित्ताने ऑर्गनच्या सुरांची महती. या सगळ्या आठवणीत मनात एकाच गोष्ट राहते, संगीत कितीही अनिर्वचनीय असले तरी आपल्या मनाशी नेहमीच सांगाती असते आणि त्याचा आपल्याशी मूकपणे संवाद चाललेला असतो, "मौनराग" असतो, तो हाच!!


शेवटचे परिशिष्ट आहे "राग ललित". वास्तविक या नावाचा राग आपल्या भारतीय संगीतात आहे परंतु इथे त्या शब्दाची सांगड घातली आहे, ती "ललित" लेखनाशी आणि त्यानिमित्ताने ललित लेखनाच्या जातकुळीशी केलेला संवाद आहे. महेश एलकुंचवार मुळात नाटककार,तरीही त्यांना ललित लेखनाची ओढ कशी लागली, ललित लेखन हे "ललित"कधीच नसते, त्यासाठी लेखकाला अहर्निशपणे त्यात गुंतणे आवश्यक असते, वेगवेगळ्या विषयांचे अवधान ठेवावे लागते, या सगळ्यांचा उहापोह आहे. कुठलेही लेखन हा आपल्याला आलेल्या अनुभवांचे संचितच असते आणि त्यापलीकडे कुठलाही लेखक जाऊ शकत नाही. असे असले तरी येणाऱ्या अनुभवाच्या तऱ्हा आणि पातळ्या वेगवेगळ्या असतात आणि त्यानुरूप त्याची प्रतवारी लावायची असते, हा दृष्टीकोन महत्वाचा. हा लेख वाचताना मला दुर्गाबाई भागवतांचा असाच लेख आठवला. "पैस" पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी अशाच प्रकारे ललित लेखनामागील अथक प्रयत्नांचा मागोवा घेतला आहे. अर्थात, प्रत्येक लेखकाची अनुभूती वेगळी आणि त्यानुरूपच त्याचे लेखन प्रकट होणार, असे असले तरी भाषा, रचना, भाषा सौंदर्य म्हणून प्रत्येकाचे वेगळे संचित असते आणि त्यानुसार लेखनाचे प्रगटीकरण होणार, हाच विचार प्रामुख्याने या लेखामागे दिसतो.

तेंव्हा, असे हे ललित लेखनाचे तरीही वाचताना विचारप्रवृत्त करणारे पुस्तक. मी, पहिल्यांदा हे पुस्तक वाचले तेंव्हा मुंबईत सुटीवर आलो होतो आणि त्या सुटीत वाचले होते. आता मात्र इथे कायमचा आलो असल्याने, जरा अधिक शांतपणे वाचले आणि त्यामागील "अर्थ' जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला.


पाठवलेला लेख हा महेश एलकुंचवार यांच्या "मौनराग" पुस्तकावर आधारित आहे.


Email: govilkaranil@gmail.com


ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

755 views2 comments

2 Comments


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Mar 25, 2021

सुंदर लिहिले आहे तुम्ही !

Like

Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Mar 25, 2021

सुंदर लिहिले आहे तुम्ही !

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page