मी मेल्यावर ....माझ्या अंदाजा प्रमाणे', सामान्य माणसाच्या हातून क्वचीतच पाप घडत असल्याने आणि मी नित्य परमेश्वराच्या स्मरणात मला समज आल्या पासून काळ व्यतीत केल्याने , नक्कीच एखादा मार्गदर्शक माझ्या स्वागता करीता येईल अशा अपेक्षेत होतो , पण कुणीच दिसलं तर नाही , मी एकटाच आत्म्यांच्या गर्दीतून वाट काढत वर वर सरकत होतो ... मला वर जाता येत होतं याचेच इतरांना अप्रूप वाटत होते .... मधेच एक प्रकशित आत्मा दिसला. खरं तर तो माझी काळजी घेत होता आणि मला वर जाण्या साठी वाट करून देत होता, तोच माझा मार्गदर्शक होता ... म्हणजे इथेही गाईड असतो तर ... मी मनांत म्हणलो ... हिंदू संकल्पने नुसार अंतराळातल्या एका अति विशाल आकाश गंगे पर्यंत आम्ही आलो .. मार्गदर्शक मला तेथेच सोडून म्हणाला', 'इथपर्यंतच़ माझी हद्द आहे पुढे तुला एकट्यालाच जायचं आहे , तें सुद्धा तुझ्या भाग्यात असेल तर '..... मी आणखी काही विचारण्या पूर्वीच तो घाई घाई ने निघून गेला ...मी आर्त स्वरात मनातल्या मनांत त्या सर्व शक्तिमान परमेश्वराला आळवत होतो ...मी पहात होतो, असंख्य आत्मे या अलीकडील तीरावर अनंत काळा पासून रेंगाळत फिरत होते ... तें कशाची तरी वाट पहात होते ... एखादी दिव्य नाव .... पण .... मला पक्कं माहीत होतं ...नाव होडी वैगेरे काही नाही, एखादी गायच़ आकाश गंगेतून येईल .... मी प्रार्थनेत डुंबून गेलो आणि डोळे मिटून घेतले , .. अशी कदाचित शेकडो वर्ष गेली असतील , ....
गाईच्या हम्बर्ण्याने मी डोळे उघडले ... आजू बाजू ला कोणीच नव्हतं .निराशेने बाकीचे आत्मे कदाचित निघून गेले असतील .... मला स्वतःचा अभिमान वाटला ... ती गाय माझ्याच साठी उभी होती याची मला खात्री पटली मी जवळ गेलो. तिने शेपटी उंचावून मला इशारा केला , मी शेपटी धरली आता तीच माझी मार्गदर्शक होती.... आस्ते आस्ते कित्येक वर्षे आम्ही चालत होतो .... अखेरीस तिने पुन्हा एकदा शेपटीला हिसका दिला आणि इच्छित स्थळ आल्याची मला सूचना दिली ....
मी आजुबाजूला पहिलं दाट पांढऱ्या शुभ्र ढगांव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं .... गाय तर केव्हाच निघून गेली होती .... दूर एक अस्पष्ट क्षितिज रेषा दिसत होती .. मी धीराने नामस्मरण करीत त्या दिशेने चालू लागलो ..मोठ्या प्रयासाने इंच इंच सरकत मी पुन्हा कित्येक वर्षांनी किनाऱ्याला पोहचलो ... समोर एक अति-अति- अति विशाल भव्य सप्तरंगातील प्रकाश तत्वाची वास्तू होती परंतु त्याच्या भिंती मात्र अभेद्य होत्या ... एक कोठेतरी वरच्या दिशेला खिडकीसमान अष्टकोनी भाग होता .... खिडकी बंद जरी होती, तरी त्या खिडकी तून एक दिव्य प्रकाशाची तिरीप येत होती . मी तें अद्भुत प्रकाशकिरण पहाता पहाता दंगुन गेलो .... त्या नंतर कित्येक वर्षे मी ध्यानावस्थेत तेथेच खाली बसून होतो.....
कसल्याश्या प्रचंड आवाजाने मी ध्यानातून बाहेर आलो .... खिडकी उघडून त्यातून चंद्रकांती सम दिव्य चेहऱ्याचे प्रभू माझ्या कडे स्मित हास्याने पहात होते ....... मी मनोमन आनंदून गेलो .. त्यांनी मला खिडकी जवळ येण्याची खूण केली मी खिडकी खाली आलो .त्यांनी माझ्याशी आंतरिक संवाद साधला .. कोण ? कोठून ? त्यांनी विचारलं .... मी म्हणालो, 'प्रभू मी निर्मल... ठाण्याहून' ... त्यांचा चेहरा प्रश्नार्थक होता .... 'म्हणजे कोठून?' मी म्हणालो 'महाराष्ट्र ! ' प्रश्नार्थक चेहरा कायम होता .... मी पुन्हा म्हणालो, ' प्रभू भारत ... जम्बु द्वीपे! ' प्रभूंच्या चेहेऱ्यावर सूक्ष्म आठ्या उमटल्या ,' तें ठीक आहे , महोदय पण किम आकाश गंगे ?' किम नक्षत्र गुच्छे? किम सूर्यमालिके ? किम ग्रहे ? ' ....... मला लाज वाटली माझा पत्ता मला खरंच नीट सांगता येत नव्हता..... मी चाचपडत म्हणालो , प्रभू मील्की वे .... जो चौपन्न नक्षत्र गुच्छांचा बनला आहे ... ज्यात चारशे कोटी तारे आहेत , त्यातील पृथ्वीनामक ग्रहा वरून .... कुठे तरी मील्क्यी वे चा पत्ता बरोबर लागू पडला असं मला वाटलं ... मी प्रभुंना म्हणालो , ' प्रभू तुम्ही तर सर्व ज्ञानी आहात ! तुम्ही माझ्या प्रार्थनेला तर नेहमी तात्काळ प्रतिसाद देत होतात मग मला आपण कां जाणत नाही ?... प्रभू हसले ... स्मित पूर्वक म्हणाले, ' मला प्रभू प्रभू म्हणू नका , मी एक तुच्छ सेवक आहे ..माझ्या मधे आणि सर्वशक्तीमान परमेश्वरात पुढे सहस्त्रावधि सेवक आहेत ...महोदय तुम्ही जेथून आलात , तो येण्याचा ठावठिकाणा मी पुढिल सेवकास कळवणार आहे .... तुम्हाला अजून दोन सहस्त्र वर्षांनी तुम्ही आत येवू शकता कां तें मी कळवू शकेन ' .....
मी सन्तोषाने पुन्हा खाली बसलो नाम स्मरणात मग्न झालो ..... साधारण एक सहस्त्र वर्षांनी किंचित आवाजाची जाणीव झाल्याने मी डोळे उघडले ... काही दिव्य स्वयं प्रकाशी आत्मे आतून बाहेर आले होते आणि आकाश गंगे तून निघून जाण्याच्या बेतात होते , माझ्या वर त्यांची द्रुष्टी गेली त्यातील एकाने थबकून मला संबोधून विचारले , ' भारत ...जम्बु द्वीपे ... महाराष्ट्र .. ज्ञानेश्वर ... तुकाराम .... नामदेव ....शिवाजी महाराज ? माझा उर आनंदाने भरून आला मी अत्यानंदाने मान हलविली .... तें सद्गुरु म्रुदु आवजात म्हणाले , बाळा येथे वेळ घालवू नकोस , तुझे संचित पुण्य तोकडे आहे ... तु चल माझ्या बरोबर.... पुन्हा जन्मा जन्मान्तरी पुरेसं पुण्य गाठी बांधूनच़ इथे ये ! ... मी तुला तुझ्या ग्रहावर सोडतो ... तेथे मनुष्य जन्म पुन्हा जर तुला मिळाला तर ही स्म्रृती कायम जाग्रृत ठेव , माया मोहात फसु नकोस , मिळणारा मनुष्य जन्म वाया घालवू नकोस , थेंबा थेम्बाने पुण्य साठवत साठवत अनेक जन्मांनी तु पुन्हा येथून पुढे जावू शकशील ..... माझ्या नेत्रातून सदगुरुंच्या पायावर अविरत अश्रू ओघळत होते. वस्तुस्थिती माझ्या डोळ्या समोर लख्ख पणे चमकली , इथे देखील माझाअहं मला सोडत नव्हता तर ... मी त्या सद्गुरुचे पाय घट्ट धरले ... आणि नव्या उमेदीने पुन्हा त्यांच्या समवेत भू तलाच्या दिशेने निघालो ......
लेखक: निर्मलचंद्र पवार (ठाणे)
मो: 9702198307 ईमेल: kasturinirmal@gmail.com
कथा आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
विषय वेगळा आहे .पण छान मांडणी केली आहे .