top of page

मुलांचा भावनिक विकास



एकदा एका वर्गात भाषा शिकवणार्‍या एका शिक्षिकेने मुलांना त्यांची आवडती चॉकलेटस दिली व त्यांना सांगितले की मी पंधरा मिनीटांनी वर्गात येईन, तोपर्यंत कोणीही चॉकलेटस खायची नाहीत. वर्गात एकूण तीस मुले होती. बाई वर्गाबाहेर पडल्या. काही मुले हातातल्या चॉकलेटकडे बघत बसली. काही मुलांनी इकडे तिकडे पाहून हळूच खाऊन टाकली. पंधरा मिनीटांनी बाई वर्गात परत आल्या. तर सोळा मुलांनी चॉकलेटस खाल्ली होती, दहा मुलांनी खायला सुरूवात केली होती आणि चार मुलांनी चॉकलेटला हातही लावलेला नव्हता. शिक्षिकेनी या सर्वांची नोंद करून ठेवली. तीस वर्षानंतर जेव्हा त्या शिक्षिकेने त्याच मुलांची माहिती घेतली तेव्हा असे लक्षात आले की, ज्या चार मुलांनी चॉकलेट्स खाल्ली नव्हती ते अतिशय सुस्थितीत, जीवनात यशस्वी झाले होते. ज्या मुलांनी चॉकलेट्स खाल्ली होती, ते सामान्य जीवन जगत होते.




याचा अर्थ मनुष्याचे आपल्या भावनांवर नियंत्रण असणे हा जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे. त्याला स्वनियंत्रण (self control) म्हणतात.

बुध्यांक जास्त असणारा माणूस हा बुद्धीमान व यशस्वी असतो असा समज पूर्वी होता. नुकतेच मी डॅनियल गोलमन (Daniel Goleman) याचे Emotional Intelligence हे पुस्तक वाचले. त्यातून मला हे समजले की, माणसाला यशस्वी होण्यासाठी भावनिक बुध्यांक (Emotional intelligence) महत्त्वाचा आहे.

प्रचंड बुद्धीमान असणारी माणसे जीवनात संकटे आली की कोसळतात पण सामान्य माणूस जीवनातील अनेक संकटे आणि कतृत्त्वाला आव्हान देणार्‍या प्रसंगांना तोंड देऊन उभा असतो. तेव्हा कोणत्याही प्रसंगात टिकून राहण्याचे बाळकडू त्यांना मिळालेले असते हे लक्षात येते. भोवतालचे वातावरण, परिस्थिती, घडणार्‍या घटना या रोज बदलणारच, पण या सगळ्याला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतो हाच मूळ मुद्दा आहे. मला कितीतरी मुले माहिती आहेत जी गरिबी असून, प्रतिकूल परिस्थिती असून यु.पी.एस.सी., एम.मी.एस.सी. या परिक्षेत यशस्वी झाली आहेत. कुठून येते ही शक्ती? कारण ही माणसं भावनिक दृष्ट्या समर्थ असतात. परिक्षेत मिळालेल्या गुणांपेक्षा जगाकडे वास्तवाच्या नजरेतून बघण्यानेच हे सामर्थ्य आलेले असते.

भावनिक विकास ही संकल्पना सध्या नविन आहे. तरी सकारात्मक विचार तुमचे आयुष्य सुंदर करतात हे आपण पहिल्यापासूनच जाणतो. सकारात्मक मनोवृत्ती बरोबर भावनिक विकासात


1] आपल्या भावनांची ओळख असणे

2] स्वनियंत्रण

3] स्वयंप्रेरणेने कामाला सुरूवात करणे

4] भावना ओळखणे व त्या प्रमाणे वर्तन ठेवणे

5] नातेसंबंध सुरक्षित करणे

या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलीने आत्महत्या केली अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतो. तेव्हा हे लक्षात येते की आपले व्यक्तिमत्त्व अशा भौतिक गोष्टींवर अवलंबून नसते हे मुलांना शिकवणे आवश्यक झाले आहे. आपण आपल्या परिस्थितीची इतरांच्या परिस्थितीशी तुलना करता कामा नये. आपल्या वर्गात शिकणार्‍या प्रत्येक मुलांत उद्याचा भावी नागरिक लपलेला आहे, एक सुजाण पालक आहे. आपल्या देशाच्या विकासाचा तो पाया असणार आहे. अशा परिस्थितीत मुलांचा भावनिक विकास करून त्यांचे आत्मभान जागृत करणे ही शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. “अनंत आमुची ध्येयाशक्ती अनंत अन आशा” असे आत्मभान जागृत झाले तरच मुलांना उत्कृष्टाचा ध्यास लागेल. नविन शैक्षणिक धोरणाचा आराखडा अतिशय चांगला आहे. पण तो यशस्वीरित्या अंमलात आणण्यात शिक्षक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. कोरोनामुळे काही ठराविक सामाजिक स्तरातील मुलांसाठी शिक्षण घेणे हे अतिशय कठीण झाले आहे. जगण्यासाठी धडपड करणार्‍या घरातील ही गरीब मुले चांगल्या शिक्षणासाठी शिक्षकांकडे आशेने बघत आहेत. सहा सात महिने घरात कोंडून राहिलेली ही मुले अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे शिक्षकाचा प्रेमाचा हात त्यांच्या पाठीवरून सध्या फिरणार नाही.



या ऑनलाइन माध्यमातून शिक्षण देताना त्यांच्या शैक्षणिक विकासाइतकेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला जपावे लागणार आहे. शाळांना आता शैक्षणिक गुणवत्ते इतकेच आरोग्य विषयक बाबींना महत्त्व द्यावे लागणार आहे. अनेक दिवस शैक्षणिक संस्था बंद असल्याने मुले कंटाळून गेली आहेत. कोरोनामुळे पालकांच्याही मानसिकतेत फरक पडला आहे. अशा वेळी मुले चिडचिडी होतात. त्यांच्यातला संयम कमी होतो. मुले एकलकोंडी होतात. तेव्हा आता आपल्याला भावनिक जपणूक करत पुढे जाणे आवश्यक आहे. मुलांचे अवधान (लक्ष केंद्रित करण्याची क्षमता) विकसित होण्यासाठी प्राथमिक शिक्षणातील ही वर्षे महत्त्वाची असतात. शिक्षण हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे पण त्या बरोबरीने भावनिक विकासाकडे लक्ष दिले तरच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नातेसंबंध दृढ होतील.

आपल्या संतांनी मनाला प्रसन्न ठेवून कार्य करण्याचा उपदेश केला आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन”.

भावनिक विकासामुळे मनाचे संतुलन साधते हे लक्षात ठेवून वाटचाल करावी लागेल एवढे मात्र नक्की.

(लेखक व्यक्तिमत्त्व विकास या विषयाचे अभ्यासक आहेत).




दिलीप फलटणकर

B-501, रिद्धि सिद्धि सोसायटी,

साई चौक, बालेवाडी,

पुणे – 411045

मो. 9881419796

Email.: renunishant@gmail.com




विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा


Recent Posts

See All
'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

 
 
 

2 commentaires


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
27 mars 2021

फार वेगळा विचार मंडल आहे आपण ! सुंदर !

J'aime

Ajit Patankar
27 mars 2021

Marshmallow Experiment

J'aime
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page