काही वर्षे उलटली या गोष्टीला... सुनिल , माझा नवरा , मस्कतला जाऊन तीन माहिने झाले होते. तिथल्या रुक्ष ,कोरड्या डोंगरांना पाहून, मोठ्या पंख्याखाली नाहीतर ए. सी.मध्ये पार्टनरसह चालवून घेत राहून , प्रचंड उन्हाळ्याला कंटाळतही होता. एकाच माणसाचं डिपार्टमेंट... तेही शेतीचं - फार्मसीच्या कंपनीमधलं - त्यामुळे ओळखी व्हायलाही वाव नाही. दिवाळीनंतर मी येतेच म्हणून कबूल केलं होतं त्याला. तोही त्याच्या अॉफिसमधून व्हिसा घेऊन माझ्यासाठी एअरपोर्टवर डिपॉझिट करणार होता. काम अजून झालं नव्हतं.
इकडे मीही चौकशी करतच होते. ओमान एअरनी सांगितले , " आमच्याकडून तिकिट घेतलं तर आम्ही व्हिसा देतो." तिकीट काढलं. व्हिसाचा पत्ता नाही...
सगळ्या चौकशा करून करून वैतागले होते. फार काही हाती लागत नव्हतं. दिवसभर अॉफिस... उरलेल्या वेळात बऱ्याच कष्टानी वेगवेगळे नंबर शोधून फोनवरून चौकशा करत राहायच्या. धड उत्तर कुठेच मिळेना. शेवटी ठरवलं... तिथे अगदीच एकट्या पडलेल्या , फारसं काही कामही सुरू न झालेल्या माझ्या नवऱ्याला भेटायला जायचं मी कबूल केलंं होतं. आता काहीही झालं तरी जायचं. वेळ पडलीच तर मुंबईच्या विमानतळावरून परत येईन नाहीतर मस्कतच्या... !
जाण्याचा दिवस उजाडला - दिवस म्हणजे रात्र . नवऱ्यालाही कुणीतरी सांगितलं होतं , आपलं अॉफिस इथल्या विमानतळावर व्हिसा डिपॉझिट करतं... मुंबईत तो दिसतो त्यांना ! पण माझ्या हातात इथे काहीच नव्हतं , हे खरं. पहाटेचं विमान , त्यामुळे ठरवलेली गाडी मला न्यायला रात्री 12 वाजता येणार होती. आॉफिसमधून यायला उशीर झाला तरी हाताशी भरपूर वेळ होता. रात्री 9.30 नंतर मला भेटायला दीर , जाऊ , नणंद अशी मंडळी आली. " झाली का तयारी ?" मला विचारलं. मी म्हटलं , " फक्त व्हिसा नाहीये , बाकी सगळं तय्यार !" दीर चमकलाच. मग मी सगळी कहाणी सांगितली. तो म्हणाला , " माझा मित्र इमिग्रेशन अॉफिसर आहे. नेहमी म्हणतो , काही लागलं तर सांग. आपल्याला कशाला कधी काम पडतंय... त्याचा नंबर घे."
मी लगेच फोन लावला. त्यानं सगळी चौकशी केली. त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या दोघांची नावं सांगितली. हातात नसलेल्या गोष्टीसाठी किती टेन्शन घ्यायचं ? जे जे होईल ते ते पहावे... असा माझा विचार होता. पण एवढं एक बरं झालं.
मला नेणारी गाडी वेळेवर आली. वेळेवर विमानतळावर पोहोचली. चेक इनला त्यांनी व्हिसाचं विचारलं. म्हटलं , " ती कंपनी तिकडे डिपॉझिट करणार होती. तुम्हाला दिसतं का इथे ? " हो - नाही करता करता त्यांनी सामान घेतलं , बोर्डिंग पास दिला. इमिग्रेशनला अॉफिसरने व्हिसाचं विचारलंच. मी सगळी कहाणी सांगितली. तिथे ठेवला असेल म्हटलं... मी ओळख सांगितली. दिराच्या मित्राचं नाव सांगितलं . ' फोन लावू या ' , म्हणाले. रात्रीचे अडीच -तीन वाजलेले. मी म्हटलं , " नंबर देते , तुम्ही लावता का फोन ?" तेवढ्यावर निभावलं आणि मी पुढचा टप्पा गाठला.
दोन तासाच्या प्रवासात विमानात फार मोकळा वेळ मिळतो असं नाही. थोडी डुलकी काढता येते फार तर ! ओमान एअरचं नियतकालिक दिसल्यावर मी तेच वाचायला घेतलं. अॉन अरायव्ह व्हिसाबद्दल संपूर्ण माहिती त्यात होती. भारतीयांसाठी ही सुविधा कधीच नसते , हेही समजलं. पण हॉटेलचं बुकिंग असेल तर हॉटेल व्हिसा देऊ शकतं. नवऱ्याला भेटायला मी अगदीच त्याच्या पाठोपाठ चालले होते. त्यामुळे कंपनीनं राहाण्याची कुठलीही सोय करणं नाकारलं होतं. सुनिलनी अॉफिसजवळचंच परवडेल असं हॉटेल बुक केलं होतं. आधी माहीत असतं तर त्यांच्याकडून व्हिसा घेता आला असता...!
मस्कतच्या विमानतळावर उतरले. विमानातून उतरल्यावर बसनी मुख्य इमारतीपर्यंत आल्यावर मोठं काचेचं दार सरकलं आणि मी आत शिरले. सर्वत्र लाल रुजामे अंथरलेले , अन् सगळं चकचकीत ... समोरच्या भिंतीवर त्यांच्या राजाचा मोठ्ठा फोटो दिमाखात लटकलेला. हिज हायनेस सुलतान काबूस बीन सैद... अलीकडेच वृध्दापकाळाने त्याचं निधन झालं. 40 वर्षाहून अधिक इतकं दीर्घकाळ राज्य केलं त्यानं आणि त्यात सर्वच प्रकारच्या भरपूर सुधारणा घाडवून आणल्या. कामाच्या पध्दती सुकर केल्या.
हे छोटंसं विमानतळ. गर्दी मात्र होती. भारतातूनच कामासाठी आलेली बरीच कामगारमंडळी दिसत होती. आधी व्हिसा डिपॉझिट केला आहे का , हे बघण्यासाठी रांगेत थांबले. मी आणि एक प्रौढ गृहस्थ रांगेत वेगळे दिसल्यावर त्या सगळ्यांना फॉर्म भरून देण्याचं काम आमच्याकडे आलं.
माझा व्हिसा तिथे ठेवलेला नव्हता. म्हणजे कंपनीनं तेवढंही सहकार्य केलं नव्हतं ! मग अॉन अरायव्हल व्हिसा विचारायला गेले... त्यासाठी आधी करन्सी बदलून घेतली. ती एक रांग . मग व्हिसा घेण्याची... म्हटलं , " मला सांगितलं होतं ठेवलाय व्हिसा... मिळाला नाही." कंपनीचं नाव विचारलं. लगेच व्हिसाचा शिक्का पडला. त्यानंतरचं अगदी चिमुकलं ड्युटी फ्री शॉप ओलांडून मी बाहेर पडले. पुढे हे चित्र झपाट्यानं बदलत गेलं. आपल्या विमानतळावरही काही वर्ष सतत काम चालू होतं आणि मस्कतचं विमानतळही बघताबघता बदलत , मोठं होत गेलं.
एवढं होईतो बराच उशीर झाला होता. मी आल्ये तरी की नाही , असं सुनिलला वाटू लागलं असलं तर नवल नव्हतं. मला बघितल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.
माझी पहिलीवहिली मस्कत ट्रीप अशा रितीने सुरू झाली.
मुंबईहून सकाळी सातच्या आधीचं विमान.. यायला वेळ दोन तासांचा , मस्कत आपल्यापेक्षा दोन तास मागे. सकाळचे पावणे आठ - आठ वाजत असतील. बाहेर चकचकीत ऊन... 10 / 10.30 वाजता असावं तसं ! निळं , निरभ्र आकाश... सुनिलला सध्या कामासाठी दिलेली गाडी मित्सुबिशी लॕन्सर आणि ड्रायव्हर समोर हजर. लेफ्ट हँड ड्राइव्ह शिकायला सुनिलनी एव्हाना सुरुवात केली होती. पण तिथे एल् बोर्ड लावून गाडी चालवण्याची पध्दत मात्र नाही.
आपला द्रुतगती मार्ग तोवर सुरू झाला नव्हता... त्यामुळे रस्त्यांचं कौतुक ! 50 कि.मि.वर हॉटेल , जवळच आॉफिस , चालण्यापेक्षा थोडी दूर वाटेल अशी मेस; सुनिल तिथेच राहायचा. हॉटेलजवळच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही डोसाबिसा खाल्ला. सुनिल अॉफिसमध्ये. मी आंघोळ करून झोप काढली. मेसवरून रोज डबा आणून देण्याची जबाबदारी एकदोघांनी घेतली होती. उरलंसुरलं ठेवायला छोटासा फ्रीज होता. संध्याकाळी चालत फिरायला जायचं , येताना एका खानावळीतून लागेल तेवढीच पोळीभाजी घेऊन यायची , लागेल तसं दूध आणायचं... असं रुटीन ठरवून टाकलं.
पहिल्या दिवशी मात्र सुनिलनी कौतुकानं मला टॕक्सीनं फिरवलं. तो रोज मित्रांबरोबर पोहायला जायचा तो छोटासा बीच आणि जातानाचा रोलर कोस्टरसारखा रस्ता दाखवायला ! रस्ते आणि त्याच्या बाजूच्या सजावटी याची तर मला गंमतच वाटत होती.
या पोहण्याची पण एक मजा होती. अॉफिसच्या कामाव्यतिरिक्त फिरायला सुनिलकडे गाडी नव्हती. पोहायला येत नव्हतं असे काहीजण त्यासाठी उत्सुक होते. मग असं ठरलं की त्यांनी गाडीतून सुनिलला बरोबर न्यायचं आणि सुनिलनी त्यांना पोहायला शिकवायचं. रोज समुद्रावर जायचं आणि रोज पोहायचं... दोन्ही सुनिलच्या आवडीच्या गोष्टी ! संध्याकाळी काय करायचं, हा आणि व्यायामाचा... दोन्ही प्रश्न निकालात निघाले. मेसमध्ये टेबलटेनिसची सोय होती. मात्र राहत्या खोलीच्या मागच्या बाजूच्या लहानशा खिडकीतून दिसणारे उघडेबोडके डोंगर त्याच्या डोळ्यांना फार खुपायचे.
मी आले आणि त्याचं सगळं रुटीन बदललं. संध्याकाळी चालत फिरायला जायचं आम्ही ठरवून टाकलं. मग रस्त्याच्या बाजूने लावलेली - जोपासलेली झाडं , मुद्दाम राखलेली हिरवळ दृष्टीस पडू लागली . त्यावर घेतलेली मेहनत जाणवू लागली. तिथल्या कोरडया हवेत , 50 डिग्रीच्या उन्हाळ्यात झाडं पुरती वाळून जातात. उन्हाळा कमी झाला की बाहेरून मोठी रोपं मागवून रस्त्याच्या सुशोभिकरणाची कामं सुरू होतात. त्यासाठी मैलोन् मैल ड्रिपची सोय केलेली असते. मुळात तेल असणारा म्हणून श्रीमंत देश... निदान त्यावेळपर्यंत पाणी महाग आणि पेट्रोल स्वस्त अशी वस्तुस्थिती ! रस्त्याला आलिशान गाड्या दिसायच्या. पण तो सगळाच काळ बदलाचा होता. हे तेल आता फार वर्ष पुरेल असं नाही , याची चाहूल त्यांनाही लागलीच होती !
चालण्याच्या अंतरावर आम्हाला जाण्यासाठी लुलू हे छोटं मॉल होतं , जिथे भांड्यांपासून सगळ्या गृहोपयोगी वस्तू मिळत. मोठं भाजी मार्केट , कोरडी ठक्क वादी कबीर - म्हणजे मोठ्ठी नदी , जवळचा मोठा राऊंडअबाऊट , जॉगिंग ट्रॕक.. अशी ठिकाणं एकएक दिवस पहात आम्ही तिथेच आजूबाजूला फिरत असू. लुलूतून इस्त्री , भाजीमार्केटमधून फळं.. अशी किरकोळ खरेदी करत असू. फळं - भाजी बघत फिरणं ही सुध्दा चैन होती , अशा एकएक सुंदर भाज्या आणि मोठ्या आकाराची जगभरातली फळं तिथे बघायला मिळत.
सुनीलच्या नव्या तरुण मित्रमंडळींनी दोन सुट्ट्यांना त्यांच्या गाडीतून आम्हाला फिरवलं , मॉल दाखवले. तोवर मॉल संस्कृती आपल्याकडे आली नव्हती , म्हणून मला सगळ्याचं अप्रूप होतं. नंतर मात्र झपाट्याने सगळं चित्र आपल्याकडेही बदलत गेलं. दुसऱ्या संसारी दोघां मित्रांकडे एकेकदा जेवायलाही गेलो आम्ही !
मेसमध्ये एकमेकांना पाहून ओळखणारा कामानिमित्त बाहेर गेलेला सुभाष गावाहून आल्यावर शेवटच्या दिवशी संध्याकाळी थेट हॉटेलवर भेटायला आला. आल्याबरोबर त्याच्या कानावर सगळी हकिकत पडलीच होती. नव्यानं नोकरीला लागलेल्या कुणाला हॉटेलमध्ये राहायला लागावं हे त्याला मुळीच रुचलं नव्हतं.. " आताच रूम सोडा , उगीच अपरात्री कशाला , " असं म्हणून घरी न्यायलाच तो आला होता... पण आमचाही शेवटचाच दिवस होता तो. म्हणाला , " जेवण करू , शेजारी माझ्या घरी जाऊ , गप्पा मारू. मग सोडतो विमानतळावर. तुझ्या ड्रायव्हरला सांगून टाक... " एकच अॉफिस एवढी ओळख पुरली. संध्याकाळी छान फिरणं आणि मस्त जेवण झालं. त्यानं संकोचाला जागाच ठेवली नाही.
एकूण ही काटकसरीची ट्रीप सुनिलचे साठवलेले पैसे संपवून मस्त पार पडली.
लेखिका: स्वाती कर्वे
मो: 9420723354
रंजक आहे प्रवास वर्णन ! लेखनशैली छान आहे.