(राजेंद्र शशिकांत धबडे)
लग्नानंतर काही वर्षांनी मी स्वयंपाक करावयास शिकायला लागलो. अर्थात सौ जेवण छान करायची. पण त्याला माझ्या आईच्या हातची चव नाही असे तमाम पुरुषांसारखे काही काळ माझेही मत. मी स्वयंपाक शिकण्यासाठी ते कारण नव्हते हे आधीच स्पष्ट करतो. नाहीतर मला पुढील काळ कायम स्वयंपाकघरात काढावा लागेल. कदाचित पुढील पाच, सहा किंवा सात जन्म ही. तिने आमच्या पद्धतीने जेवण करणे लवकरच माझ्या आईकडून शिकून घेतले. आणि मग तिने मलाही शिकवले.
एकंदर प्रकरण फारच सोप्पे वाटले. मग वेगवेगळे प्रयोग करत मी बऱ्यापैकी स्वयंपाक करू लागलो. पोळी आणि भाकरी काही अजून पर्यंत शिकलो नव्हतो. कारण त्याचा पसारा जास्त असतो. लवकरच शिकावं लागेल बहुतेक.
स्वयंपाक शास्त्र खरंच कला आहे. वेळेचे गणित सांभाळून अनेक पदार्थ एका वेळी करणे या बाबत महिलांना मानले पाहिजे. परत सर्व काही म्हणजे ओटा वगैरे साफ करून, पसारा आवरून हे करणे म्हणजे ग्रेटच. याच्या नेमके उलट पुरुष स्वयंपाक करतात तेंव्हा होते. भरपूर पसारा,कचरा वगैरे.. अर्थात याला अपवाद ही असतीलच. त्यातलाच एक अपवाद मी आहे असे समजतो. पण तो माझा भ्रम आहे असे सिध्द करण्यास सौ समर्थ असते.
मला का ते माहीत नाही पण स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. कांदा बारीक कापणे,भाज्या साफ करून तयार करणे, मांसाहारी पदार्थ आणून साफ करून बनवणे, वेगवेगळे पुलाव, बिर्याणी, मासे बनवणे हे चांगले जमू लागले. ते काम फारच आव्हानात्मक वाटले. साहसपूर्ण ही वाटायचे. सुरवातीला सस्पेन्स ही असे.. कारण केलेल्या पदार्थाची चव कशी असेल सांगता येत नसे. तसा चवीचा सस्पेन्स मी अधून मधून राखतो.
नवनवीन पदार्थ करायला आवडत. काही वेळा छान होत, काही वेळा फसत. अशीच एकदा ऑफिसमध्ये सहकारी मैत्रिणीने डब्यात आणलेली कारल्याची भाजी खाल्ली. चिंच गूळ टाकून केलेली ही भाजी वेगळीच होती. चव पण भारी होती. करण्याची पद्धत विचारुन घेतली. दोन दिवसांनी बाजारातून चांगली एक किलो कारली आणली. मला आवडली म्हणजे सर्वांना आवडणार असा एक माझा पक्का समज..आणि सर्व म्हणजे सौ आणि मुलगा. तिने आधीच सावध केले. एवढी भाजी करू नकोस पहिल्यांदाच करतोयस फुकट जाईल. मला खात्री होती सर्वांना भाजी आवडेल याची.
सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे भाजी केली. भाजी भरपूर झाली होती. चव तितकीशी जमली नव्हती.. वाईट ही लागत नव्हती. घरात कोणी खायलाच तयार नव्हते. सौ ने थोडी माझ्या समाधानासाठी खाल्ली. मी जमेल तेवढी खाल्ली. वाल्या कोळ्याची गोष्ट आठवली. माझेच पाप असल्यासारखे घरातले कोणीही त्यात वाटेकरी झाले नाही. भाजी भरपूर उरली. दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते भाजीचे भांडे माझ्याकडे आs वासून बघत असल्याचा भास झाला. कशीबशी थोडी संपवली. उरलेली कामवाल्या बाईना दिली. नंतर त्या आल्या तेंव्हा भाजी कसली होती विचारत होत्या. भाजी कसली हे त्यांना कळले नाही हे यश की अपयश कळेना. पण चांगली झाली होती हे ही बोलल्या. माझा जीव त्यांनीच घासलेल्या भांड्यात पडला... त्यानंतर बिचारे कारले खूप दिवस आमच्या घरात दुर्लक्षित होते. हे असे वाल्या कोळी होण्याचे भाग्य मला त्या काळात अधून मधून मिळायचे.
इ टीव्हीच्या मेजवानी परिपूर्ण किचन या कार्यक्रमात कोकणात असताना सौ च्या आग्रहाने भाग घेतला. मी आणि सून यात भाग घेणार होतो. कॅमेऱ्याला तोंड देण्याचा काहीच अनुभव नाही. पदार्थ ही करायचा, बोलायचे पण.. त्यामुळे थोडे टेन्शन होते. माझा भाग एकदाचा झाला.. मी खूपच बावरलो होतो. पदार्थ पण फसला होता. अँकरने छान सांभाळून घेतले. मी केलेला तो फसलेला पदार्थ त्यांनेच छान सुशोभित केला..वेळ साजरी केली. तो कार्यक्रम परत बघायची हिंमत काही झाली नाही.
सध्या कोकणात एकटाच असल्याने असेच प्रयोग चालू असतात. विशेषतः भाताचे, खिचडीचे प्रकार. काही वर्षाच्या अनुभवाने छान होतातही. कधी कधी वेगळीच चव येते भाताला; अगदी खाववत नाही. मग परत काहीतरी प्रयोग करून खाणेबल बनवायचा. मग त्याला इंडो चायनीज किंवा चायनो इंडिज नाव देऊन संपवायचा. काय करणार आपलेच तोंड आपलेच पोट.
याच काळात व्हॉट्स ऍप मुळे एक नवीन पदार्थ करता आला. त्याची पद्धत अशी.. भांड्यात दूध घेऊन गॅस वर तापत ठेवायचे. आपण बाहेर हॉलमध्ये जाऊन चांगली जागा पकडून व्हॉट्स ऍप उघडायचे. मध्येच केंव्हा तरी करपल्याचा वास आलाच तर दुर्लक्ष करायचे. शेजाऱ्यांच्या निष्काळजी पणाला नावं ठेवत आपले काम चालू ठेवायचे. थोड्या वेळाने आपल्याच किचनमधून धूर येऊ लागला की धावत जायचे. दूधकोळसा हा नवीन पदार्थ तयार असतो गॅसवर काळ्याकुट्ट भांड्यासह. एकदा तर भांडे लाल बुंद झालेले पण बघितले आहे. नंतर घरातला वास काही दिवस काही केल्या जात नाही. दुधासाठी नवीन भांडे खरेदीचा योग येतो. यासाठी व्हॉट्स ऍप नसले तरी अडत नाही. एखादे पुस्तक चालते, गप्पा,झोप पण चालतात. हा हातखंडा प्रयोग आहे. नावशिके हा प्रयोग सराईतपणे करतात. नंतर कधीकाळी हा योग येतो. या प्रयोगात इतर पदार्थ ही वापरता येतात.
पोळी भाकरी येत नाही म्हणून खूप अडायचे. मग परवा यू ट्यूब वर बघून चक्क तांदळाची भाकरी केली. पुरीची थोडी मोठी बहीण वाटावी इतपत भाकरी करता आली. मीच केली असल्याने मला छान लागली.
एकदम भाकरी करू लागल्याचा आनंद वेगळाच. यू ट्यूब झिंदाबाद.
एकंदर ही कला आव्हानात्मक आहेच..तसेच मानसिक ताण तणाव पण कमी करणारी आहे. हा माझा अनुभव आहे. नोकरीत असताना ताण तणाव नेहमीचेच. मग घरी आल्यावर एखादी भाजी, भाताचा प्रकार केल्यावर निवांत वाटे.. ताण गायब. नोकरी सोडल्याने आता ताण तणाव नाहीच मग इतर गोष्टीत, छंदात जास्त लक्ष घालू लागलो. लेखन वाचन करू लागलो. स्वयंपाक घरात फिरकेनासा झालो..
एक दिवस लक्षात आले घरात वादविवाद होतायत. ताण तणाव वाढत आहेत. पर्यायाने माझ्यावर ताण आलाच. मग मी परत स्वयंपाक घरात जाऊ लागलो. एखादी भाजी करू लागलो. वाद कमी झाले. नंतर कळले.. हा एक मोठ्या कटाचा भाग होता. मी मधून मधून जेवण करावे म्हणून.. ज्यात मी सोडून घरातले सर्व सामील होते..
मजेचा भाग सोडला तर मी खरोखर पाक क्रियेचा छान आनंद घेतो. प्रत्येकाने शिकावी अशी ही कला आहे.
मुख्य म्हणजे कुठे अडत नाही.
ही पोस्ट आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. सर्व नवऱ्यांना शेअर करा.
राजेंद्र शशिकांत धबडे (डोंबिवली)
मो: ९३२४९५७५०५
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
असे अनुभव सगळ्यांनाच येतात ,पण लेखकाने ते मस्तच विनोदी शैलीत लिहिले आहेत.