top of page

पौष म्हणजे



हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला पौष महिना असे म्हणतात. पौष हा मराठी वर्षाच्या कालगणनेनुसार दहाव्या क्रमांकाचा महिना आहे.


पौष महिना हा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे साधारणपणे डिसेंबर/जानेवारी महिन्यात येतो.सर्वसाधारणपणे पौष मासात लग्न,मुंज व इतर धार्मिक कार्यक्रम करीत नाहीत ,कारण हा महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो.काही लोक तर या महिन्यात शुभ कार्याची बोलणी सुद्धा करीत नाहीत ,पण या सगळ्या चुकीच्या समजुती आहेत असे वाटते,कारण या महिन्यात येणारा गुरूपुष्यामृताचा योग अतिशय चांगला व शुभ मानला जातो त्यामुळे पौष महिन्याला अशुभ म्हटले जाते ते मनाला पटत नाही. त्यामुळे या महिन्यात येणारी महत्वाची धार्मिक कामे पुढे ढकलणे योग्य नाही असे वाटते. ज्या पौष महिन्यात गुरुपुष्यामृत योग, आणि शाकंबरी देवीचे नवरात्र येते तो महिना अशुभ असेल असे वाटत नाही. पौष महिन्याला सूर्यदेवाचा महिना असे म्हटले जाते.त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केली जाते.या महिन्यात हेमंत ऋतु असल्यामुळे पौष महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना करायला सांगितली असावी. या दिवसामध्ये सूर्याचे ऊन चांगल्या प्रकारचे असल्यामुळे त्यातून भरपूर प्रमाणात आपल्याला " ड "जीवनसत्व मिळते आणि म्हणून आपली तब्बेत चांगली रहाण्यासाठी त्याची मदत होते. आपल्या संस्कृतीत सूर्य नमस्काराच पण फार महत्व आहे.सूर्याच्या उपासनेचे महत्व खालील श्लोकात सांगितले आहे.



*आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वंती दिने दिने*

*जन्मांतरम सहस्त्रेशु दारिद्र्यम नोपजायते*

*अकाल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनं*

*सुर्यपादो दकंतीर्थं जठरे धारयामि अहम*



वरील श्लोकामध्ये सूर्य नमस्कार घालून सूर्याची उपासना केल्यामुळे मनुष्याला अकाली मृत्यू येत नाही आणि सर्व व्याधींचा पण विनाश होतो असे सांगितले आहे.

या श्लोकामध्ये सूर्याच्या उन्हात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून ते पाणी प्यावे असे सांगितले आहे.



मार्गशीर्ष महिन्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून भोगीच्या सणापर्यंत या काळाला धनुर्मास किंवा धुंधुरमास असे म्हणतात. धुंधुरमास पण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच भोगीच्या सणापर्यंत साजरा केला जातो. या दिवसांमध्ये तीळ या तेलबियांच उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात येत. तिळामधलं तेल आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी आणि उपयुक्त असते. या दिवसांमध्ये हवेत गारठा असल्यामुळे बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते, आणि लोण्याबरोबर खाल्ली जाते. या दिवसात भाकरी सोबत जुळी भाजी केली जाते. जुळी भाजी म्हणजे,वांगी,पावटा,घेवडा,हिरवा ओला हरभरा ,ओले शेंगदाणे,आणि गाजर या सगळ्यांची एकत्र रस भाजी करून बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते आणि मुगाच्या डाळीची खिचडी,साजूक तुपाबरोबर खाऊन भोगीचा सण साजरा केला जातो



पौष महिन्याच्या प्रतिपदेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.हिंदू सणाची कालगणना चंद्राप्रमाणे पंचांगावर आधारित असते परंतु मकर संक्रांतीचे पर्व सूर्याच्या राशीबदलाप्रमाणे ठरविले जाते.तसं तर सूर्य प्रत्येक महिन्याला राशीबदल करीत असतो,त्यामुळे प्रत्येक महिन्यात संक्रांत (राशीबदल किंवा संक्रमण) असतेच.पण सूर्याच्या मकर संक्रमणाच्या वेळी उत्तरायणाला सुरुवात होते म्हणजेच पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकतो. त्यामुळे या संक्रमणाला विशेष महत्व आहे. त्यामुळे मकर संक्रांतीची तारीख दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी हीच असते. मकर संक्रांतीपासून ऋतुपरिवर्तन होते.शरद ऋतु क्षीण होतो आणि वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात होते. दिवस मोठे होत जातात आणि रात्री लहान होत जातात.भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. नवीन पिकं येतात आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळे वातावरण उत्साही आणि आनंदी असते त्यामुळे ही मकर संक्रांत पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये लोहडी या नांवाने साजरी केली जाते.तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यात मकर संक्रांत पोंगल म्हणून साजरी केली जाते.उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी या नांवाने मकर संक्रांत ओळखली जाते. आसाममध्ये ही संक्रांत बिहू या नांवाने प्रचलित आहे.तर गुजरातमध्ये या सणाला पतंगोत्सव साजरा करतात, व खूप मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून ते माघ महिन्याच्या सप्तमी पर्यंत (म्हणजेच रथसप्तमीपर्यंत) आपल्या महाराष्ट्रात सुवासिनी एकमेकींना हळदीकुंकू आणि तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणतात. आणि निरनिराळ्या वस्तूंचे,धान्यांचे वाण दिले जाते.सोबत तीळ आणि गुळाची वडी, पांढरा शुभ्र हलवा हे पण दिले जाते.घरामध्ये असलेली छोटी बाळे किंवा घरात नवीन लग्न होऊन आलेल्या सुनबाई यांना हलव्याचे दागिने घालून त्यांची तिळवण किंवा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या वेळेस बसू शकणाऱ्या लहान मुलांना काळे झबले आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून बोरनहाण पण घातले जाते. या वेळेला हवेत गारठा असल्यामुळे काळी वस्त्रे परिधान केली जातात. या दिवसात हवेतल्या गारव्यामुळे शरिरात आलेला रुक्षपणा घालविण्यासाठी घरोघरी गुळाची पोळी साजूक तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. एकूणच हवा चांगली असल्यामुळे सगळ्यांना भूक लागते आणि त्यामुळे दोन घास जास्तीचे जेवण होते,आणि त्यामुळे जेवण पचून शरीराला ऊर्जा मिळते.या दिवसात तयार होणाऱ्या भाज्या ( मटार,पावटा, उसाचे कर्वे,ओले हरभरे,बोरे, गाजर, रेवड्या) ह्या मातीच्या सुगडात घालून हे वाण पण सुवासिनी एकमेकींना देतात.एकूणच काय नवीन आलेली पिके,धन धान्याची सुबत्ता आणि वातावरणातला उत्साह यामुळे त्यातून मिळणारा आनंद एकमेकांना लुटण्याचा हा सण आहे.



मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. या दिवशी संक्रांतीदेवीने किंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचापासून प्रजेला मुक्त केले. किंकरासुरचा अंत झाला म्हणून या दिवसाला किंक्रांत असे म्हटले जाते,आणि म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी संक्रांतीदेवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो. पंचांगात या दिवसाचा उल्लेख करिदिन आस आहे.



पौष शुद्ध अष्टमीपासून ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला जातो.दुर्गादेवीच्या विविध रुपांपैकी एक महत्वाचे रूप म्हणजे शाकंभरी देवी ,तिलाअन्नपूर्णा देवी असेही म्हणतात.शाकंभरी देवी ही आदिशक्तीचे एक रूप मानले जाते. त्यामुळे या नवरात्रात अन्नपूर्णा देवीची स्थापना,पूजा आराधना केली जाते. देवी स्तुतीमध्ये शाकंभरी देवीला चतुर्भुजा किंवा अष्टभुजांच्या रुपात वर्णिलेले आहे. शाकंभरी देवीची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात बार्लीचे बीज पेरून त्यावर पाणी शिंपडले जाते.शाकंभरी देवीच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलशाला लाल रंगाचे कापड गुंडाळून त्याची पूजा स्थानी स्थापना करतात. कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याची पाने लावून त्यावर नारळ स्थापित करतात. नारळाला लाल ओढणी बांधून त्याला हळद कुंकू वाहून फुले,हार अक्षता वाहून देवीची पूजा केली जाते.नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी या व्रताचे उद्यापन करतात.



शाकंभरी देवीची स्थापना केल्यावर अष्टमीच्या पहिल्या दिवशी बाजारात जेवढ्या भाज्या मिळतील त्या सर्व भाज्या शिजवून त्यांचा एकत्र नैवेद्य दाखविला जातो आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. काही ठिकाणी साठ पर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या आणि कडधान्ये एकत्र करून त्यांना शिजवून त्यांचा नैवेद्य दाखविण्याची पण प्रथा आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले अन्न आपल्या देवतेला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा फार सुंदर आहे. पहिल्या दिवसाचा हा नैवेद्य झाल्यावर पुरणपोळी किंवा गोड खीर किंवा आणखी एखादा गोड पदार्थ यांचा नैवेद्य दाखविला जातो. शाकंभरी नवरात्र उत्सव राजस्थान,उत्तर प्रदेश, कर्नाटक,महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागात साजरा केला जातो.कर्नाटकमध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी असे म्हटले जाते. शाकंभरी देवीचं कर्नाटकातील मुख्य स्थान बदामी येथे आहे. तेथे होऊन गेलेल्या चालुक्य राजवटीतल्या राजे लोकांची बदामीची बनशंकरी देवी ही कुलदेवता होती असे सांगितले जाते.बनशंकरी देवीचे एक मंदीर उत्तराखंड राज्यात हरिद्वार येथे पण आहे.



शाकंभरी देवी म्हणजे माता पार्वतीचे एक रूप आहे.ती अन्नपूर्णेच्या रुपात आहे आणि पृथ्वीवरील समस्त सजीवांचे भरण,पोषण ती करत असते असे म्हटले जाते. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवांमध्ये स्थापित करून तिची रोज पूजा अर्चना करीत असतो. घरातल्या सर्वांना पोटभर जेऊ खाऊ घालणाऱ्या स्त्रीच रूप म्हणजे अन्नपूर्णा शाकंभरी देवीचेच रूप आहे असे म्हटले जाते. शाकंभरी देवीच्या वर्णनात तिला शंभर डोळे आहेत असे सांगितले जाते आणि त्या सर्व डोळ्यांनी संपूर्ण पृथ्वीवरील सजीवांकडे तिचे आईच्या मायेने लक्ष असते असे म्हटले जाते त्यामुळे तिचे एक नाव शताक्षी देवी असे पण आहे असे म्हटले जाते. आपल्या शत नेत्रांनी पृथ्वीवरच्या सजीवांकडे प्रेम भराने, मायेने बघून त्यांच्या भरणपोषणाची व्यवस्था करून साऱ्यांना सुखी,समाधानी आणि आनंदी ठेवणाऱ्या शाकंभरी मातेचे आपल्यावर खूप मोठं ऋण आहे.त्यामुळे अष्टमीपासून सुरू झालेले तिचे नवरात्र पौष पौर्णिमेला खूप मोठ्या उत्साहाने, आनंदाने पार पडून उद्यापन केले जाते.



पृथ्वी ३६५ दिवसात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते परंतु तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून कललेला आहे आणि याच कललेल्या परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वी कललेल्या अवस्थेत असल्यामुळे सूर्याभोवती फेरी मारताना सहा महिने पृथ्वीचा उत्तर ध्रुवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो तर सहा महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सारखेच असते. पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ येते तेथे उन्हाळा तर जी बाजू सूर्यापासून दूर असते तेथे हिवाळा असतो. हिंदू मान्यता आणि पंचांगानुसार वर्षातून दोन वेळा सूर्याचे आयन होत असते आणि आयन म्हणजे परिभ्रमण.या परिभ्रमणालाच दक्षिणायन आणि उत्तरायण असे म्हटले जाते. जेव्हा सूर्य मकर राशीतून मिथुन राशीपर्यंत भ्रमण करतो तेव्हा या सहा महिन्यांच्या काळाला उत्तरायण असे म्हणतात. उत्तरायण सर्व कामांसाठी खूप पवित्र आणि सकारात्मक कालखंड मानला जातो.उत्तरायणात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. जेव्हा सूर्य कर्क राशीतून धनु राशीपर्यंत भ्रमण करतो तेव्हा या सहा महिन्यांच्या काळाला दक्षिणायन असे म्हणतात. दक्षिणायनाच्या काळात रात्री मोठ्या आणि दिवस लहान असतात.



आकाशात आपल्याला लहान मोठे तारे दिसतात त्यांना सर्वसाधारणपणे नक्षत्र असे म्हणतात.परंतु अधिक शास्त्रीय दृष्ट्या चंद्रमार्गावरील ताऱ्यांना वा ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्रे असे म्हणतात. चंद्राला पृथ्वी भोवतीच्या प्रदक्षिणेमध्ये एक ताऱ्यापासून निघून पुन्हा त्याच ताऱ्यापाशी येण्यास सुमारे २७.१/३ दिवस लागतात म्हणूनच सत्तावीस किंवा Nकधिकाधिप1 अठ्ठावीस नक्षत्रांची संख्या ठरविली गेली असावी. काही विद्वानांच्या मते प्रथम नक्षत्रे चोवीस असावीत परंतु पुढे फल्गुनी,आषाढ आणि भाद्रपदा यांचे पूर्व आणि उत्तरा असे दोन विभाग पाडले त्यामुळे नक्षत्रांची संख्या सत्तावीस झाली. क्वचित कधीतरी अठ्ठावीसावे नक्षत्र पण असते,त्याचे नाव अभिजित असे आहे.खाली सत्तावीस नक्षत्रांची नावे आपल्या माहितीसाठी देत आहोत.



*नक्षत्रांची नावे : अश्विनी , भरणी , कृत्तिका , रोहिणी , मृगशीर्ष , आर्द्रा , पुनर्वसू , पुष्य , आश्लेषा , मघा , पूर्वा फाल्गुनी , उत्तरा फाल्गुनी , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , जेष्ठा , मूळ , पूर्वाषाढा , उत्तराषाढा , श्रवण , धनिष्ठा , शततारका , पूर्वा भाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा , रेवती.*



भारतातील वर्ष तीन मुख्य ऋतुंमध्ये विभागले गेले आहे.उन्हाळा , पावसाळा , आणि हिवाळा,तर उपऋतु सहा आहेत. ऋतु हा हवामानावर आधारलेला असलेला वर्षाचा ढोबळपणे बनविलेला भाग आहे. आपले सहा ऋतु आणि त्यांचे प्रचलित मान्यता असलेले चांद्र महिने आणि त्यावेळेचे हवामान याची माहिती खालीलप्रमाणे.



*१. वसंत ऋतू : चैत्र , वैशाख : उन्हाळा*

*२. ग्रीष्म ऋतु : जेष्ठ , आषाढ : उन्हाळा*

*३. वर्षा ऋतु : श्रावण , भाद्रपद : पावसाळा*

*४. शरद ऋतु : अश्विन , कार्तिक : पावसाळा*

*५. हेमंत ऋतु : मार्गशीर्ष , पौष : हिवाळा*

*६. शिशिर ऋतु : माघ , फाल्गुन : हिवाळा*




सौ. उमा अनंत जोशी , कोथरूड , पुणे.

फोन: ०२० २५४६८२१ ३

मोबा. ९४२०१७६४२९




ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा

Recent Posts

See All

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page