बर्याच वेळेला आपण पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या प्रकाशात, रस्त्याने चालताना आपलीच सावली कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या तर कधी समोर, कधी पाठीमागे पडताना अनुभवत असतो. सावलीची दिशा बदलून अनेक भासल्या तरी आपला मूळ देह हा एकच असतो. त्याचप्रमाणे अध्यात्मिक दृष्ट्या पाहिले तर परमात्मारूपी एका बिंबातून, अनेक जीवात्मारूपी प्रतिबिंब, ह्या सजीव-निर्जीव सृष्टीत जन्माला येतात आणि मृत्यु पावतात. पण परमात्मा निरंतर,अखंड एक आहे. हे झालं समष्टी (विशाल) रूपाने जाणणे.
आता दुसरं उदाहरण बघायचे झाले तर चंद्राचे देता येईल. रात्रीच्या अंधुक प्रकाशात, चमचमत्या चांदण्यामध्ये आकाशात आपल्याला चंद्राचे दर्शन किती विलोभनीय दिसत असते. आपण अंगणात मस्त गप्पा मारत बसलेले असतो. बाजूलाच काही पाण्याने भरलेल्या बादल्या असतात. त्यात चंद्र बिंबाची अनेक प्रतिबिंब आपण पहात असतो. पण हे सगळं मिथ्या आहे. प्रतिबिंब हे क्षणिक आहे, बिंब हे शाश्वत आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवाचा आत्म्याशी असलेला संबंध व्यष्ठीरूपाने आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.
जीव हा आत्मरूपी बिंबाचे प्रतिबिंब आहे. शरीर नाशिवंत आहे परंतु आत्मा अमर आहे. जीव जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकत रहाणार, जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही. प्रतिबिंबाला, बिंबामध्ये आणि बिंबाला परमबिंबामध्ये समरस होऊन जाण्यासाठी, जीवाला "मी" ची ओळख होणे महत्वाचे आहे. माझी जर मला ओळख नसेल तर, "तुझे आहे तुझपाशी, परि जागा चुकलाशी" ही आपली सगळ्यांचीच अवस्था होऊन, परत परत जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकल्याशिवाय गत्यंतर नाही. अत्यंत दुर्मिळ असा मनुष्यजन्म, आपल्या भाग्यामुळे आपल्याला लाभला आहे, तेव्हा त्याचं सोनं करणं आपल्याच हातात आहे. तेव्हा जीवाचे मोल जाणून, विवेकाने आपली संसारातील आसक्ती हळूहळू कमी करून, परमार्थ साधून, सुख-दुःख, मान-अपमान, यश-अपयशाच्या, यातनादायक प्रवासाच्या बोटीतून सुटका करून निरपेक्ष, विरक्तीच्या अटकेपार नेणाऱ्या बोटीत बसून सहजसुलभ किनारा गाठावा. आणि अखंड आनंदाच्या अनुभूतीचा रसास्वाद घेत रहावा. हाच खरा "आनंदाची गुरूकिल्ली"चा मूलमंत्र आहे.
पुष्पा सामंत.
नाशिक 16-3-2021.
Email.: samant1951@hotmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments