top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

"पुरुषही छळले जातात तेव्हां "

पुरुषही छळले जातात तेव्हां बर्‍याच स्त्रियांना खटकेल कदाचित! पण नाण्याला दोन बाजू असतातच ना! पुष्कळदा एकाच बाजूचा म्हणजे स्त्रियांचाच विचार केला जातो. न्यायालय सुद्धा खूप बाबीमध्ये स्त्रियांच्या बाजूने निकाल देते. माझ्या मागची पिढी म्हणजे साधारण १९०० सालापर्यंत जन्मलेल्या स्त्रियांच्या वेळी नवरेशाही होती, पण माझ्या पिढीपासून ती खूपच कमी झाली. आताची जी पिढी आहे म्हणजे ४५ ते ५० वर्षांच्या स्त्रियांबाबतचे चित्र खूपच बदलले आहे. या स्त्रिया चांगल्या शिकल्या अर्थार्जन करू लागल्या, नवऱ्याला मित्र मानायला लागल्या आणि मग संसाराचे चाक रुळावरून घसरायला लागले. दोन व्यक्तींची सतत बरोबरी होऊ शकत नाही. तशी ती करायला सुरु केली की संसारात नवरा बायकोंचे खटके सतत उडू लागतात.


निसर्गानेच स्त्री व पुरुष यांच्यात फरक ठेवला आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा नाजूक शरीराची पण मनानं खंबीर, संकटाला न घाबरता सामना करणारी तर पुरुष शारिरीक बल असणारे पण हळव्या मनाचे, सहनशक्ती कमी असणारे. या विषमतेचा विचार स्त्रियांनीच करायला हवा. तिनेच का करायचा? तर ती विवाह झाल्यावर आपले घर सोडून नवर्‍याच्या घरी येते. आपल्या पसंतीनेच तिने नवरा निवडलेला असतो. मग दुसर्‍याच्या घरी गेल्यावर त्या घरच्या चालीरिती, स्वभाव, संस्कार तिने शांतपणे समजून घ्यायला नकोत का? आईच्या घरी असताना आईच्या मताप्रमाणे संसार चाललेला असतो. सासरी आल्यावर सासूच्या मताप्रमाणे चालणे तिला आवडत नाही. तिला वाटते माझा संसार माझी सत्ता चालावी, नवरा हा केवळ माझ्याच प्रेमाचा भागीदार असावा! आणि येथेच पुरुषाचे हाल, कोंडी सुरु होते. ज्या आईने मुलाला जन्म देऊन अनंत खस्ता खाऊन त्याला येथपर्यंत वाढविले त्या आईचे व मुलाचे एकमेकांवर प्रेम असणारच ना? नवऱ्याच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात आईच असणार, हे लग्न होऊन आलेल्या मुलीने लक्षात ठेवले पाहिजे. क्षुल्लक गोष्टींमध्ये सुद्धा या बायका नाराजी दाखवतात व नवऱ्याबरोबर भांडतात. नवऱ्याने आईच्या स्वयंपाकाचे कौतुक करू नये, तिच्याशी प्रेमाने गप्पा गोष्टी, तिची चौकशी या गोष्टी सुनेला आवडत नाहीत. मग सुरु होते पुरुषांची ओढाताण! त्याचे बायकोवरही प्रेम असतेच. तिच्यावाचून तर त्याचे अगदी सगळेच अडते. महत्वाचे म्हणजे रात्रीची सोबत सुद्धा! अश्या वेळी तो कात्रीत सापडतो. ज्या पुरुषाबरोबर स्वतःच्या मनाने लग्न करून ती येते असा पुरुष सुखी व्हावा असे तिला वाटू नये का ? ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याच्याबरोबर भांडणे, त्याचा पाणउतारा करणे हे कसे काय ती करू शकते? याला प्रेम कसे म्हणायचे? आपण कधीतरी चुकीचे त्याला काही बोललो तर सॉरी म्हणायची तिची मानसिक तयारी पाहिजे. निसर्गाने जन्माबरोबरच तीला जी सहनशक्ती दिली आहे ती वापरायला हवी ना? क्षुल्लक गोष्टी विकोपाला नेऊ नयेत हे पथ्य सांभाळावे. आई-वडील, बहीण-भाऊ यांच्यापासून नवऱ्याला पारखे करू नये. घरामध्ये भाऊबंदकी सुरु होते ती स्त्रियांच्यामुळेच. त्या मंथरेच्या भूमिकेत जातात. अश्यावेळी पुरुष काय करील बिचारा? त्याचा हा छळच नव्हे का? दिसायला लहान असणाऱ्या या गोष्टीमुळे त्याच्या मनाचे समाधान हरवते. अश्या लहान गोष्टीतून झालेला छळ कुणाला दिसतही नाही. मी बघितलेल्या काही स्त्रिया तर अश्या अचाट आहेत कि त्या अर्थार्जन करीत असतात पण आपण मिळविलेले पैसे संसारासाठी खर्च करण्यास देत नाहीत . स्वतःचे पैसे म्हणून त्या आपल्या नावावर बँकेत ठेवतात, असे का? तर प्रपंच चालविण्याची जबाबदारी पुरुषाची, म्हणून प्रपंचाला लागणारा पैसा त्यानेच खर्च करावा असे तिला वाटते. किती कोते मन? दोघांनी मिळून आर्थिक भार सोसूया असे असायला हवे ना? मीच कशी बरोबर हि जाहिरात करण्यात त्या वाकबगार असतात. पुरुष असे करत नाही. शेवटचे म्हणजे उत्तम जेवण व समाधानी कामजीवन या दोन महत्वाच्या नाड्या स्त्रियांच्या हातात असतात. त्याकडे त्यांनी योग्य ते लक्ष दिल्यास पुरुष नक्कीच कोंडमाऱ्यातून वाचेल आणि सुखी होईल. जयश्री सतीश पटवर्धन कागवाड ,कर्नाटक महिला वय 79वर्षे फोन नं 7406983273 jayashreep1941@gmail.com



विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा

401 views1 comment

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Mar 25, 2021

सुंदर लिहिले आहे तुम्ही !

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page