“मिस्टर अँड मिसेस मोस्ट ब्युटीफुल अँड फिट कपल अबाव्ह फोर्टी प्लस” (!) (“Mr and Mrs most beautiful couple above 40 plus!”) स्पर्धा ऑफिसमध्ये जाहीर झाली आणि रीमाने त्यात भाग घ्यायचे ठरवले. वास्तविक लग्नापूर्वी ती ‛चवळीची शेंग’ वगैरे वर्गात मोडणारी होती. पण आता हळूहळू शेंगवर्गातून तिचा प्रवास ‛कोबी/फ्लॉवर’ या फळवर्गाकडे चालू होता. केसांनीही कात टाकायला सुरुवात केली होती. अर्थात अधूनमधून डायने आंजारून गोंजारुन त्यांना ती पूर्वपदावर ठेवत असे. पण नवरा केतन मात्र “वाढता वाढता वाढे” या न्यायाने आपली बॉडी मेंटेन (?) करून होता. भाळी अर्धचंद्रही मिरवू लागला होता. त्यामुळे या सहा महिन्यात वजन कमी करुन स्पर्धा जिंकायचीच आणि ऑफिसमधल्या “स्लिम आणि फिट – चारू” व तिच्या नवऱ्याला हरवायचे असा रीमाने चंगच बांधला. त्यासाठी रीमाला शब्दशः कंबर कसावी लागणार होती. अर्थातच केतनला असले काही खूळ मान्य नव्हते. सुखी जीव दुःखात टाकणे त्याला अजिबात पटत नव्हते. पण रीमाने साम-दाम-दंड-भेद या चारही आघाड्यांवरुन खेळी करुन केतनला चारी मुंड्या चीत केले व स्पर्धेसाठी तयार केले.
दुसऱ्या दिवसापासून दोघांचे डाएटचे प्रयोग सुरू झाले. सुरुवात “मॉर्निंग वॉक”ने झाली. दोन-तीन दिवस - ट्रॅक पॅन्ट, शूजच्या खरेदीसह दोघांचा मॉर्निंग वॉक झोकात झाला. चौथ्या दिवशी दोघांच्याही मोबाईलनी घात केला व गजरच झाला नाही. पाचव्या दिवशी आदल्या दिवशीच्या भारत-पाक क्रिकेट सामन्यामुळे जागरण झाले. त्यामुळे सकाळी दोघांचे मोबाईल बराच वेळ कोकलले तरी दोघांनी त्यांचे गळे दाबले व मस्त ताणून दिली. असे असले तरी दोघांचे आहाराचे पथ्य मात्र जोमात चालू होते. एक दिवस फलाहार, एक दिवस “निराहार” व एक दिवस “रसाहार” !
एकदा, दुसऱ्या दिवशी फलाहार होता म्हणून फळे खरेदी करण्यासाठी रीमा मार्केटमध्ये गेली असताना तिला योगायोगाने सूझी भेटली. तिने सल्ला दिला की - “रोज फिरायला जायला जमत नाही तर नो प्रॉब्लेम ! अगं, ‛लेस्ली सॅनसन’चा ‛वन माईल हॅप्पी वॉक’ कर. काही वॉक वगैरेला जायची गरज नाही.” तिने लगेच यू-नळीवरील तिच्या दृक्श्राव्यफितीची लिंकसुद्धा दिली. झाले! दुसऱ्या दिवशी दोघांचे व्हिडिओ बघत घरातच वॉक सुरु झाला. दोन दिवसांनी अंग खूप दुखू लागल्याने वेदनाशामक गोळी घेऊन अंथरुणातच पडून दोघांनी झोपूनच ‛मानसिक वॉकिंग’ केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी केतनला ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग असल्याने आणि त्यांच्याकडे केतनचे मामा-मामी त्यांचा सुखी संसार (?) बघायला आल्याने रीमालाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे मग दोन दिवस त्यांनी व्यायामाला दांडीच मारली.
केतनच्या मामी आपल्या सुनेचे खाण्या-पिण्याचे प्रयोग पाहून म्हणाल्या - “रिमे, सोड हा फलाहार वगैरे ! असे उपाशी राहून का वजन कमी होते ? त्यापेक्षा त्या दिवेकर का कोण बाई आहेत, त्यांनी दर दोन तासांनी खायला सांगितले आहे. आमची डॉली करते गं तसे आणि व्यायामही आठवड्यातून फक्त चारच दिवस सांगितला आहे त्यांनी. शिवाय एखाद्या दिवशी काही कार्यक्रम असेल तर खायचे बिनधास्त हवे तेवढे ! पुन्हा दुसऱ्या दिवसापासून नेहमीप्रमाणे डाएट सुरु करायचे म्हणे ! तुमच्या या असल्या नुसत्या रसाहाराच्या फॅडाने बबड्या किती वाळलाय बघ” (म्हणजे त्यांचा लाडका भाचा केतन बरे!)….
दर दोन तासांनी खायच्या कल्पनेने रीमाला खूप आनंद झाला. एकदम सुटका झाल्यासारखे वाटले. ही मामेसासू तिची नावडती असली तरी तिचा हा सल्ला ऐकून मात्र तिला देवदूत भेटल्यासारखे वाटले. पण सासूच्या शेवटच्या वाक्यावर मात्र तिने लगेच प्रतिटोला हाणलाच- “अहो, पण तो वजनकाटा सांगत नाहीये ना तुमचा बबड्या वाळला म्हणून! आणि मीसुद्धा त्या सत्यवानाच्या सावित्रीसारखी त्याच्याबरोबरच डाएट करतेय बरं का!”
त्यानंतर दोघांनी दुसऱ्या दिवसापासून डाएट प्लॅन बदलला. आता दर दोन तासांनी खायचे म्हणजे रोजच्या दिवसभराच्या दोघांच्या चार-पाच डब्यांची तयारी करावी लागायची. पहिल्यांदा उत्साहाने रीमाने जय्यत तयारी केली. पण नंतर मात्र प्रत्येक डब्यात रोज काय न्यायचे या विचाराने ती हैराण होऊ लागली. रात्रीच्या लवकर जेवण्याच्या नियमाने त्यांचा जीव मेटाकुटीला येऊ लागला. शिवाय रात्री भूक लागल्यामुळे झोपेचे खोबरे व्हायचे ते निराळेच ! आणि मग आठ-दहा दिवसांत या प्लॅनने पण गाशा गुंडाळला.
त्याच वेळी अचानक रिमाच्या हातात जादूची कांडी मिळाल्यासारखे झाले. त्यांच्या गावात ‛अतिविशाल दक्षता मंडळाच्या’ कार्यकर्त्यांनी ‛डॉ. जगन्नाथ दीक्षित’ यांचे व्याख्यान ठेवले होते. डॉक्टरांनी दोन वेळच जेवण्याचे महत्व पटवून दिले आणि रीमा हरखूनच गेली. “चार-पाच डब्यांऐवजी आता ‛नो डब्बा’ - आणि फक्त पातळ ताक प्यायचे” या कल्पनेने तिला एकदम सुटका झाल्यासारखे वाटले. आता तिला फक्त दोन वेळच्या खाण्याचीच चिंता करायची होती. मग दोघांनी ते डाएट इमानेइतबारे सुरु केले. रोज साडेचार किलोमीटर चालणे आणि दोन वेळा खाणे ! पण मध्येच आलेल्या दिवाळीने मात्र गडबड केली. यावर्षी तिच्याच घरी सगळे पाहुणे जमणार असल्याने फराळाची चव घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. शिवाय तिची आई आणि सासूबाई दोघीही जातीने आधीच मदतीला हजर झाल्या होत्या. दोघींच्यात फराळाचे पदार्थ करण्यात चढाओढ लागली होती आणि ती खिंड लढवताना, चवी बघताना, रीमा आणि केतनच्या ‛ टू मील्स डाएटची’ पार वाट लागली होती. त्यातच दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमून आलं, तरी दोन्ही आयांना लागणाऱ्या वस्तू आणून देण्यात, केतन - आणि पदार्थ करण्यासाठी हाताखाली राबावे लागल्यामुळे, रीमा – दोघे इतके दमून जात की व्यायामाचा विषयच त्यांनी सोडून दिला. दिवाळी संपली तरी डॉक्टर दीक्षितांशी काही त्यांची पुन्हा हातमिळवणी होईना. त्यामुळे हळूहळू या प्लॅननेही काढता पाय घेतला.
एके दिवशी आता ‘झीरो फिगर’चे काय करायचे, स्पर्धा कशी जिंकायची?” या विवंचनेत रीमा ऑफिसमध्ये हतबल होऊन डोक्याला हात लावून बसली होती. त्याच वेळी तिचा कॉलेजमधला मित्र रमेश तिला भेटायला आला. बोलताबोलता तिच्या चिंतेचे कारण त्याला समजले आणि ताबडतोब त्याने त्यावरचा उपाय हजर केला. “अगं, काय हे रीमा ! उगाच वेळ फुकट घालवलास. मला आधी नाही सांगायचेस ? मी बारीक झालेला तुला दिसतोय की नाही ? मी बारीक झाल्यावर कितीतरी लोकांना बारीक केलंय. इतकया दिवसांत तुला समजलं कसं नाही?” …… तसा रमेश काही फारसा बारीक वगैरे झाला नव्हता. पण “कावीळ झालेल्या माणसाला जसे सगळे जग पिवळे दिसते” तसे रीमाला बारीक होण्याच्या ध्यासापायी बाकी सर्व जग बारीक झाल्यासारखे वाटत होते. त्यातून रमेशच्या हातात तर आपसूकच गिऱ्हाईक आले होते. त्याने हातोहात आपल्याकडील मिल्कशेक व पाण्यातील औषधाचा हमखास वजन कमी करण्याचा ‛दहा हजाराचा’ (फक्त) माल रीमाच्या गळ्यात मारला. अत्यानंदाने त्याच पिशव्या गळ्यात मिरवत रीमाने घरात प्रवेश केला. दुसऱ्या दिवसापासून “नवीन प्लॅन”! — आणि काय आश्चर्य - आठवड्याभरात रीमाचे वजन चक्क ३८० ग्रॅमने आणि केतनचे वजन २७० ग्रॅमने कमी झाले होते !!!
‛जड’ असणारे रीमा-केतन जरा कुठे ‛हलके’ होत होते, तेवढ्यात पुतण्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीने घात केला. आदल्या दिवशी खाल्लेल्या चार चमचे शुगर-फ्री आईस्क्रीमने व चिमणीच्या दाताने तोडलेल्या केकच्या तुकड्याने रीमाचे वजन पुन्हा २०३ ग्रॅमने वाढले. सक्काळी सक्काळी रीमाच्या जोरजोरात रडण्याच्या आवाजाने केतन झोपेतून दचकून जागा झाला आणि बाहेर आला. तर वजनकाट्यावर उभी राहून रीमा हमसून-हुमसून रडत होती. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून स्फुंदत स्फुंदत ती म्हणाली, “केतन, बबड्याsss , हे काय झाले रे? माझे वजन पुन्हा वाढले. आता मी काय करु? पण थांब…. आधी तू पण उभा रहा बरे काट्यावर.” ….. बाप रे! केतनचे वजन तर चक्क ४१७ ग्रॅमने वाढले होते. आता मात्र स्पर्धेला खूप कमी दिवस उरले होते आणि युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज होती. दोघांनीही पटापट मोबाईल हातात घेतले आणि भराभरा यू-नळी चाळायला सुरुवात केली. तेवढ्यात ‘युरेकाsss.. युरेकाsss’ च्या थाटात रीमा किंचाळली……
-“अरे, ग्रेट! हे बघ केतन, येथे एका दिवसात एक किलो वजन कमी करण्याचा फार्म्युला आहे आणि त्याखाली बघ, एका महिन्यात पाच किलो वजन कमी करण्यासाठी लिंबू-मध-पाणी घ्यायला सांगितले आहे”.
-“ अगं तेवढेच काय? खाली राजीव दीक्षितांच्या टिप्स आणि रामदेव बाबांची आसनेही आहेत.” इति केतन. बघताबघता दोघांनी ३ तास १२ मिनिटे चर्चा केली आणि पुढचा प्लॅन ठरवला. त्यामुळे त्या रात्री बर्याच दिवसांनी रीमाला अगदी शांत झोप लागली. झोपेत ‘झीरो फिगर’ची रीमा केतनसह रॅम्पवर कॅटवॉक करताना स्वतःलाच बघत होती.
अरे पण हे काय? इकडे कुणाची गडबड चालू आहे….. म्हणून ती कानोसा घेऊ लागली. तर तिच्या शरीरांतर्गत रचनेतील कार्बमहोदयांच्या (carbohydrates) मनातील खळबळ तिला ऐकू आली. म्हणून ती कान देऊनच ऐकू लागली. तर कार्बमहोदय धावत प्रथिनमहोदयांकडे (Proteins) चालले होते. या डाएटच्या भानगडीत पहिला हल्ला आपल्यावरच व पहिली उपासमार आपलीच होणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच ते प्रथिनमहाशयांकडे चालले होते. प्रथिनमहाशय त्या मानाने निवांत होते. कारण आपल्याला या डाएटमध्ये किती महत्व आहे हे ते जाणून होते. तरी पण कार्बमहोदयांना सोबत म्हणून, आणि त्यांनी फारच आग्रह केला, म्हणून ते दोघेही मेदमहाराजांकडे (Lipids/Fats) गेले….
मेदमहाराज मस्तपैकी हातपाय ताणून पेशींच्या मंचकावर पहुडले होते. दोघांचे बोलणे ऐकून ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले – “कुछ टेन्शन लेने का नहीं भाय । ही रीमा-मॅम दर पंधरा दिवसांनी प्लॅन बदलते. त्यामुळे काय फरक पडला ? थोडीफार या कार्बभय्याची पुंजी कमी झाली असेल इतकेच ! त्याने त्याचे नुकसान असे किती झाले ? आणि आमच्या दोघांचे काय झाले? आपले काम तर आपण करतोच आहोत ना ? आणि मुख्य म्हणजे इतक्या दिवसांत माझे काही बिघडले का ? या रिमा-मॅमनी माझा इतका साठा करुन ठेवला आहे, की इतक्यात काही तो कमी होत नाही. आणि खरे सांगू ? जोपर्यंत ही रिमा-मॅमच काय; पण जो कोणी मानवप्राणी जेव्हा आपल्या शरीराच्या भुकेपेक्षा अधिक अन्न खातो, किंवा फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड्रिंक्स अधिक प्रमाणात घेतो, तेव्हा तेव्हा तो आपल्या कामात उगीचच ढवळाढवळ करत असतो; आणि असे झाले, की मग आपल्यालाही संप पुकारावा लागतो. आपले कामच हे लोक बिघडवून टाकतात. हल्ली माणसांची जीवनशैली सुखासीन झाली आहे. शरीराची हालचाल कमी आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपण तयार केलेला अतिरिक्त साठा वापरलाच जात नाही. आता याला जबाबदार कोण?
…… म्हणूनच शरीराचे आरोग्य मिळवायचे असेल तर ‛योग्य प्रमाणात आहार आणि आवश्यक तेवढा व्यायाम’ हे सूत्र या मानवजातीने पाळले पाहिजे. इसलिये, मेरे भाई लोग – बेफिकर रहो, मजे उडाओ, और अपने-अपने काम में लगे रहो । मेरा नंबर तो इतनी जल्दी आ ही नहीं सकता । त्यामुळे मी तोपर्यंत विश्रांती घेतो !!!”
… असे म्हणून मेदमहाराजांनी पेशींच्या गादीवरच ताणून दिली. आणि नेमक्या त्याचवेळी रीमाच्या मोबाईलने पहाटेची बांग दिली ….. !! ..रीमा स्वप्नातून दचकून जागी झाली ! .. कार्बमहोदय, प्रथिनमहाशय, आणि मेदमहाराजांच्या चर्चेने ती पार चक्रावून गेली. .. तिने ताबडतोब मोबाइल हातात घेतला, आणि या तिघांचा अभ्यास सुरू करण्यासाठी आंतरजाळयात शोधाशोध सुरू केली.
..दुपारपर्यंत बराच अभ्यास झाल्यानंतर, अखेर रीमा पुढच्या आठवड्याकरता नवा “डाएट प्लान” धुंडाळू लागली !! …(विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही …)
लेखिका: डॉ.मेधा फणसळकर (सिंधुदुर्ग) मो: 9423019961
मस्त,मजेशीर वाटले वाचायला !