"तुलना" हा शब्दच मुळी व्यक्तीच्या प्रगतीच्या आड येणारा मोठा शत्रू आहे असे समजावे. जेथे तुलना असते तेथे स्पर्धा हमखास आलीच आणि स्पर्धा आली की समोरच्या व्यक्तीविषयी मनात ईर्षा, द्वेषाची भावना नकळतपणे जागी होऊ लागते.
परमेश्वराने प्रत्येक घटा-घटाचे वेगळे रूप निर्माण केले आहे तसेच प्रत्येक व्यक्तीची बुध्दीची आकलनशक्ती तसेच भाग्यरेषा ठरलेली असते. प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता वेगवेगळी असते, त्यानुसार त्याला त्याचे फळ मिळत असते. एकादी व्यक्ती बुध्दिमान असूनसुध्दा,त्याच्या संचितानुसार त्याला अपेक्षित असूनही म्हणावे तेवढे जीवनात यश मिळत नाही. त्याच्याउलट बर्याच वेळेस आपण पहात असतो फार कमी शिकलेली व्यक्तीसुध्दा, त्याच्या मेहनतीच्या जोरावर व त्याच्या भाग्यरेषेनुसार आपल्या व्यवसायात यशस्वी होऊन,धनाढ्य बनते. व सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेत असतात. पण आपण जर त्या व्यक्तीशी सतत तुलना करत राहीलो की, ह्या व्यक्तीची लायकी नसतानाही त्याला लक्ष्मीचे वरदान आहे. आणि मी एवढे माझ्या विद्वत्तेवर उच्च शिक्षण घेऊनही मला अपेक्षित नोकरी मिळत नाही, त्यामुळे माझा पगारही बेताचाच आहे. काय उपयोग मी एवढे शिक्षण घेऊन ? असे सतत आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने इतरांशी तुलना करून स्वतःचे आयुष्य नरक बनवून टाकतो.
एकदा का आपल्याला सतत दुसर्यांबरोबर तुलना करायची वाईट सवय लागली की आपल्याकडे कितीही शिक्षण, पैसा, कौटुंबिक स्वास्थ असले तरी त्याकडे आपले दुर्लक्ष होते. सतत आपल्याला दुसर्या व्यक्तीपेक्षा सरस ठरवायचे असते आणि मग नकळतपणे चुरस करण्याच्या नादात आपण आपले शारीरिक स्वास्थ व मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. आणि आयुष्यातील छोट्या छोट्या मिळणाऱ्या आनंदाला आपण कायमचे मुकतो.
मुळात जीव जन्माला येतो तेव्हाच त्याचे प्रारब्ध तो घेऊन आलेला असतो. म्हणूनच कोणत्या घरात जन्म घेणे, किती शिक्षण, संसारीक जीवनाची भाग्यरेषा आधीच आपल्या गतजन्माच्या कर्मसंचितानुसार प्रत्येकाची ठरलेली असते. आपण सगळेच त्याबाबतीत अज्ञानात वावरत असतो. म्हणूनच प्रत्येक जण आपापल्यापरिने सुखाच्या प्राप्तीसाठी सदैव झगडताना दिसत असतो.
सुख-दुःखाच्या व्याख्येतील फरक माणसाला जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा तो स्वतःचीही स्वतःशी तुलना करण्याच्या भानगडीत पडणार नाही. बर्याच वेळेला आपण म्हणतो दुसऱ्यांशी तुलना किंवा स्पर्धा नसावी. स्पर्धा आपलीच आपल्याशी असावी. पण माझ्यापुरतं बोलायचे झाले तर मी माझ्याशीही तुलना करत नाही. कारण आता जे मी काय लिहीत आहे त्यामध्ये मला आनंद मिळत आहे. परंतु माझे पुस्तक छापून यावे, म्हणून मी त्याचाच ध्यास सतत घेत बसले आणि माझीच माझ्या आता करत असलेल्या कामाची तुलना करत बसले तर आता ह्या क्षणाला मी मस्त लिहीण्याचा आनंद मिळवित आहे, तोही आनंदाचा क्षण मी माझ्या आयुष्यातून हिरावून बसेन. माझ्या भाग्यात जर पुस्तक छापून येणार असेल तर ते कसेही आणि केव्हाही येईल पण नसेलच तर त्याचा विचार करून मी हा आनंदाचा क्षण वाया घालविणे म्हणजे हाती सगळे असून गमावल्या सारखे होईल.
प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा असेल तर दुसर्यांशी तुलना आणि स्पर्धा करणे सोडून देणे सगळ्यात महत्वाचे आहे. जो तो आपापल्या भाग्यानुसार जीवनात आनंद लुटायला आला आहे. खरा आनंद लुटण्यासाठी, आत्मज्ञानाचा डोळा उघडावा लागतो. मग तुलना, स्पर्धा, चुरस, इर्षा ह्या श्ब्दांपरे आपण आनंदाची अनुभूती क्षणाक्षणाला घेत असतो. त्यासाठी कोणतेही शिक्षण किंवा परिस्थिती तुमच्या आड येत नाही. जिथे तुलना नाही तिथे स्पर्धा नाही. आणि जिथे स्पर्धा नाही तिथे दुसरा कोणी नसून आपण एकटेच असतो. आणि एकट्यामध्येच आनंदाचा स्रोत सापडतो. तेव्हा हा आनंदाचा स्रोत शोधून काढण्याचे साहस मात्र स्वतःलाच करावे लागते.
पुष्पा सामंत.
नाशिक 25-3-2021.
Email.: Samant1951@hotmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
कल्पना सुंदर आहे .तुलना करून निराश होण्यापेक्षा आहे ते जीवन आनंदात जगायला पाहिजे हे तर सत्यच आहे. परंतु बहुतेक लोक स्पर्धा आणि तुलना यात अडकून पडतात आणि जीवनातले बरेचसे आनंद गमावतात.