top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

उत्सवांचे बदलते स्वरूप



सण -उत्सव हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. परंपरेने चालत आलेले ह्या उत्सवाचे स्वरूप आजच्या घडीला बदलले असले तरी पूर्णतः ते संपुष्टात आलेले नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते संक्रमित होत आलेले आहे. आणि आपणही हे सण-उत्सव तितक्याच आनंद व उत्साहाने साजरे करतो. पूर्वापार चालत आलेल्या या उत्सवांनी मानवी जीवनाला संजीवनी देण्याचे काम केलेले आहे. मानवी नाते-संबंध,आपुलकी,जिव्हाळा,कृतज्ञता,संवेदनशीलता यांना खतपाणी घालण्याचे काम सण-उत्सव करीत आले आहे.




शारीरिक,मानसिक,वैचारिक,बौद्धिक या घटकांचे पोषण करणारे असे होते. मनोरंजनाचा व करमणुकीचा भाग जरी त्यात असला तरी आचार-विचारांनी उत्तम पिढ्या घडवण्याचे कार्य हे उत्सव करीत असत.

समाजात जे-जे म्हणून चांगले आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजातील वाईट,चुकीचे जे आहे त्यावर बोट ठेवून निषेध करणे;म्हणजे एकप्रकारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य या उत्सवांनी केले आहे.

लो. टिळकांनी गणेशोत्स्वाची सुरवात करून इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना एकत्र आणून स्वराज्याची ज्वाला त्यांच्यात निर्माण करण्याचे फार मोठे असे कार्य केले. समाजभान जागृतकरणारी अशी दिव्य उत्सवाची परंपरा आपल्याला लाभली. आणि आपण आजही त्याचा भाग आहोत हि खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.



लो. टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवामागे त्यांचे देशप्रेम,राष्ट्रप्रेम यासारख्या उदात्त भावना होत्या त्या सर्व लोकांमधे एकत्र एकाच वेळी निर्माण होण्याकरिता लोकांनी एकत्र येणे गरजेचे होते. पण आज मात्र तशी परिस्थिती नसली तरी तत्कालिन समाजातले प्रश्न,समस्या यांचे रूप बदलले असले तरी आजच्या समाजापुढे प्रश्न,समस्या या आहेतच. आजही आपण या उत्सवांचा उपयोग समाजभान जागृतीसाठी करणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना आपण तो केला पाहिजे. काही ठिकाणी काही मंडळे याचा उपयोग करताना दिसत असली तरी अशी संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. समाजाची बदललेली जीवनशैली पाहता त्याचा विपरीत परिणाम जसा सगळ्या गोष्टींवर झाला तसाच तो आपल्या उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीवरही झाल्याचे आपल्याला दिसून येईल.



वरवरचा उथळपणा,दिखावेबाजपणा,अवडंबर माजवणे यासारख्या गोष्टींमुळे उत्सवाचे मंगल रूप आपण गढूळ करून टाकले आहे. या उत्सवांमागे दडलेल्या प्रेरणा,उद्देश,भावना,शिकवण आपण पुसून टाकत आहोत. याची जाणीव आपल्याला होईनाशी झाली आहे. प्रथा-परंपरांचा वसा ज्या पिढीने मोठ्या विश्वासाने आपल्या हाती सोपवला त्याला आपण चंगळवादाचा घाणेरडे रूप देऊन आपल्या संस्कृतीचा आपण एकप्रकारे अपमान करीत आहोत;आणि असे करण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. कारण येणाऱ्या नव्या पिढीला आपण चुकीच्या मार्गाला लावून त्यांचे जगणे उध्वस्त करीत आहोत. याचे भान आपल्याला उरलेले नाही.



प्रत्येक उत्सवामागे समता, बंधुता हि जीवनमुल्ले दडलेली आहेत. तुम्ही जर शोधली तर ती तुम्हाला सापडतील. परंतु आपण मात्र आजच्या घडीला त्याला केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहत आहोत आणि इच्छांची पोळी त्यावर भाजत आहोत. आधीच्या उत्सवाचे संस्कार वातावरण जाऊन त्याची जागा चंगळवादी वृत्ती आणि प्रदूषणाने घेतली. ध्वनी प्रदूषण,जल प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होऊ लागले. त्यातून आरोग्याला धोका पोहोचू लागला. वाट्टेल तसे भले मोठे मंडप घालणे,लायटिंग करणे,मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावणे हे तर नित्याचेच होऊन बसले. म्हणजे खरे तर देव असे म्हणत नाही की असा अवाजवी खर्च करून आमचे स्वागत करा;पण लोकांनी देवालाही स्पर्धेत उतरवले. कुठल्या मंडळाची सजावट चांगली त्यावर क्रमांक दिल्या गेले. पण असे करून देव थोडाच प्रसन्न होणार आहे. त्याला तर मनोभावे केलेला नमस्कारही पोहोचतो. खोट्या दिखाव्याची त्याला आवश्यकता नाही. म्हणजे इथे सुद्धा मानवाने आपल्या इच्छा,अपेक्षा त्याच्यावर लादल्या पण कायम देवाकडे काही मागण्यापेक्षा आपल्याला दाता ही होता आले पाहिजे. समजला,नव्या घडणाऱ्या पिढीला आपल्याकडून जितके म्हणून काही चांगले देता येईल असे आपण वागले पाहिजे. ज्ञानात,बुद्धीत भर पाडणाऱ्या संस्कारक्षम स्पर्धा आपण आयोजित केल्या पाहिजेत. त्यांच्यात दडलेल्या सुप्त गुणांना वाव मिळेल. आणि हसत-खेळत आनंदी वातावरणाची निर्मिती करून अगदी सहजरित्या आपण त्यांना बोधामृत देऊ शकू,असे काहीतरी करायला हवे.



आजची एकंदरीत सामाजिक स्थिती पाहता ती बदलण्यासाठी व त्याच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी खरे तर उत्सवांचे आयोजन असते. हीच त्यामागील प्रमुख भूमिका व उद्दिष्ट होय. परंतु निरर्थक असे वेळ वाया घालवणाऱ्या कर्यक्रमांचे प्रस्थ हल्ली खूप वाढल्याचे आपल्याला दिसून येईल.

घरगुती अगदी साध्या पद्धतीने साजरे केले जाणाऱ्या उत्सवांना आपण उगाच मोठे स्वरूप दिले. परंतु दिखाव्याने उद्दिष्ट साध्य होत नाही;त्याकरिता कृतीला विचारांची जोड हवी.

अजूनही वेळ गेलेली नाही आपण जर ठरवले तर आपली उत्सवांची ही संस्कृती जपू शकू व तिचे संवर्धन करू शकू.



सण उत्सवाची परंपरा

जपू या मनोभावे

नुसतेच नका गाऊ

तिचे गोडवे


त्यामागील खरा अर्थ

घ्या जाणून

येणाऱ्या पिढीस सांगा

मोल समजून



समाजाच्या जडणघडणीत उत्सवांनी फार मोठी भूमिका बजावली आहे. समाजाच्या मानसिक व वैचारिक घटकांचे भरणपोषण उत्सवांनी केले आहे. पण आज मात्र त्याला आलेले भिषण असे स्वरूप बदलवून त्यांना पुन्हा सोन्याचे दिवस आणणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. याकारिता यामागील वैज्ञानिक करणे जर त्यांच्यासमोर आणली तर केवळ परंपरेने चालत आले म्हणून आपण ते करायचे असे नाही तर त्याला शास्त्राची जोड देणे नितान्त गरजेचे आहे. ही सगळी अंगे जर आपण त्यांच्या समोर आणली तर यांचे मोल आणि आपल्या जगण्यातले यांचे स्थान आपण निश्तिच पटवून देऊ शकू. आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या उत्सवांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे.



नाव - सौ. मृगा मंदार पागे

मो. नंबर - ९७६६०१८२१६

शहर - नागपूर

Email.: mrugapagey@gmail.com


ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा

1,398 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page