नाटक म्हणजे वीर वामनराव दादांचा लहानपणापासून आवडता विषय. कलाकारांनी आपल्या कलेचा चांगला उपयोग करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रस्तुत केलेली मेजवानी म्हणजे नाटक. मनोरंजनाचे उत्कृष्ट साधन म्हणून नाटकास कित्येक दशकांपासून अढळ महत्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण वीर रसाने संचारलेली नाटके भारतीय स्वातंत्र लढ्यात जन जागृतीचे काम करू शकते, हे वामनराव दादांनी आपल्या लिहिलेल्या नाटकातून सिद्ध केले आहे. पारतंत्र्याची जाणीव करून देणारे विषय या वैशिष्ट्यामुळे दादांनी लिहिलेली नाटके प्रचंड गाजली.
वयाच्या विसाव्या वर्षी वामनराव दादांनी नाटक कंपनी सूरू करण्याचा विचार केला होता, परंतु दादांची आई अन्नपूर्णा बाईंनी दादांचे मन वळवून नाटक कंपनी काढण्याचे वेड दादांच्या डोक्यातून काढून टाकले.
त्याच दरम्यान पुणे येथे किर्लोस्कर नाटक मंडळात लोकमान्य टिळकांच्या प्रभावातील दोन व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्यापैकी वामनराव दादा हे एक होते.
वामनराव दादा मंचावर आले. त्यांची वेशभूषा रुबाबदार दिसत होती. तेजस्वी चेहरा, त्यावर झुपकेदार मिशा, डोक्यावर बांधलेला वऱ्हाडी फेटा, त्या तेजस्वी चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच वाढवत होता. तालमीत तयार झालेल्या बलदंड देहावर मखमलीचा सदरा उठून दिसत होता. या सर्व गोष्टी दादांकडे श्रोत्यांचे लक्ष केंद्रित करत होता.
दादांचे भाषण सुरु झाले. त्यांच्या बलदंड शरीराला साजेसा पहाडी, भारदस्त आवाजाने आसमंत दणाणून गेले. स्पष्टवक्तेपणा, व आवाजातील चढउतार यामुळे दादांचे वक्तृत्व कौशल्य श्रोतांनी पारखले होते. क्षणोक्षणी टाळ्यांच्या गजरासह श्रोते दादांच्या वक्तृत्वाला प्रतीसाद देत होते. याच सभागृहांत श्रोत्यांमधे ललित कला दर्शक नाट्य मंडळीचे मालक संगीतसूर्य केशवराव भोसले उपस्थित होते. दादांचे भाषण ऐकून ते प्रभावित झाले. व्याख्यानातील दादांची देह्बोली व वक्तृत्व कौशल्य पाहून, वामनराव दादांमध्ये दडलेला नाटककार केशवराव भोसल्यांनी ओळखला. त्यांच्या संथ पडलेल्या नाट्य मंडळीला उभारी देण्यासाठी हवाहवासा वाटणारा योग्य नाटककार वामनराव जोशींच्या रूपाने मिळाला.
नाटक संपल्यावर केशवराव भोसले यांनी दादांकडे नाटक लिहून देण्याचा आग्रह केला. केशवराव भोसले यांचे नाटकाबद्दलचे प्रेम व त्यांची तळमळ दादांनी ओळखली व नाटक नाटक लिहून देण्यास होकार दिला. पण काही अटी ठेवल्यात. नाटकाच्या मजकुराच्या संदर्भात कोणताही बदल करण्याची परवानगी कदापीही मिळणार नाही. माझ्या नाटकांत सुरवातीपासून शेवट पर्यंत वीररसच राहणार. विररसात सतत पांच तास श्रोतांचा उत्साह टिकवून ठेवण्याचे सामर्थ माझ्या लेखणीत आहे. नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय हे नाटक राहणार नाही, ही मी आपणास खात्री देतो. दादांच्या वाणीतील आत्मविश्वास पाहून केशवराव भोसल्यांनी सर्व अटी मान्य केल्या. दादांनी घातलेल्या अटींमध्ये स्वतःच्या मानधनाचा कोठेही उल्लेख नव्हता. देशसेवेसाठी नौकरीचा राजीनामा देणारा हा सुपुत्र फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्याचा भुकेला होता. दारिद्र्याचा स्वीकार करीत आपले संपूर्ण जीवन दारिद्र्यांत जगणारा हा राष्ट्रभक्त.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या आग्रहातव वामनरावांनी “राक्षसी महत्वाकांक्षा” हे आपले पहिले नाटक लिहिले. राज्यकर्त्याला जन्मसिद्ध हक्काने राजसिंहासन मिळणार नाही, जनतेच्या कौलाने व योग्यतेने मिळायला पाहिजे. जनतेला शासनकर्ता निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच गुलामगिरी झुगारण्याचा संपूर्ण प्रयन्न जनतेने करायला हवा, असा संदेश या नाटकाद्वारे दिला गेला. उर्दूतील “खुबसुरत बला” या नाटकापासून प्रेरणा घेऊन वामनराव दादांनी “राक्षसी महत्वाकांक्षा” हे नाटक लिहिले.
या नाटकाचा पहिला प्रयोग २० सप्टेंबर १९१४ साली मुंबई येथे झाला. या नाटकाने मराठी रंगभूमीला पहिला मखमली पडदा मिळवून दिला. या नाटकाच्या यशाने केशवराव भोसले यांच्या ललित कला दर्शन मंडळास प्रचंड पैसा व वैभव मिळवून दिले. याचे प्रमाण म्हणजे ही नाटक कंपनी “राक्षसी महत्वाकांक्षा” या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी आरक्षण करून रेल्वेने प्रवास करू लागली.
५ डिसेंबर १९१४ साली या नाटकाचा प्रयोग अमरावती येथे यशस्वी झाला. उत्तम कामगिरी बजावल्यामुळे दादासाहेब खापर्डे यांच्या हस्ते वामनराव दादांचा सत्कार करण्यांत आला.
पुण्याला “राक्षसी महत्वाकांक्षा” या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी लोकमान्य टिळक हजर होते. संपूर्ण नाटक पाहील्यानंतर टिळक दादांना म्हणाले, “ वामनराव दादा तुम्ही ब्रिटीश नौकरशाही मदालसे च्या रूपाने उभी केली आहे, असे कोणीही म्हणेल” पुढे हे भाकीत ओळखून ब्रिटीश शासनाने “राक्षसी महत्वाकांक्षा” या नाटकाच्या प्रयोगावर बंदी आणली, तरीही सामान्य जनतेच्या मनांत पारतंत्र्या विषयी द्वेष जागविणारे, वामनराव दादा जोशी यांचे हे पहिले नाटक इतिहासात अजरामर झाले.
नाटकास एवढी प्रसिद्धी आणि यश मिळाले असून, दादांनी नाटक लेखनाकडे लक्ष केंद्रित न करता, राष्ट्रासेवेस व स्वातंत्र्य चळवळीस आपले प्रथम प्राधान्य दिले. मी प्रथम देशभक्त आहे व नंतर नाटककार आहे. असे दादांचे म्हणणे होते. त्यामुळे पहिल्या नाटकाच्या प्रचंड यशानंतर दादांचे दुसरे नाटक “रणदुंदुभी” हे तब्बल तेरा वर्षाने रंगभूमीवर आले, व तेही नाटक कंपनीच्या आग्रहास्तव.
बलवंत कंपनीचे मालक चिंतामणराव कोल्हटकर व थोर संगीतकार दिनानाथ मंगेशकर या सारख्या दिग्गज कलावंतांच्या आग्रहास्तव दादांनी “रणदुंदुभी” हे नाटक लिहिले. यांतील गीते प्रचंड गाजली. त्या गीतांचे गायन स्वत: श्रेष्ठगायक मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी केले. “ परवशता पाश दैवे ज्याचा” व “जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा” ही दादांच्या लेखणीतून साकारलेली पदे, यामुळे नाटकास विशेष प्रसिद्धी मिळाली. आजही, ही गीते पसंत करणारा मोठा चाहता वर्ग आहे. काही काळ विद्यार्थांच्या मराठीच्या अभ्यासक्रमांत “रणदुंदुभी” नाटकाचा समावेश होता. २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्वाची भूमिका पार पाडल्यामुळे वीर वामनराव जोशी यांच्या “रणदुंदुभी” या नाटकाचे प्रसंग वर्णन पुणे रेडीओ केंद्रावरून प्रसारित करण्यांत आले होते.
”धर्म सिंहासन” हे वामनराव दादांचे रंगमंचावर तिसरे नाटक. दादांचे मेहुणे बाबासाहेब अभ्यंकर, लेले बंधू व भावे यांच्या “नाटक-कला-प्रसारक कंपनी” चा पडता काळ सावरण्यासाठी एक नाटक लिहून देण्याची विनंती त्यांनी दादांकडे केली होती. या नाटकामध्ये दादांनी मांडलेला संदेश अत्यंत मोलाचा आहे. “केवळ वारसा हक्काने कोणालाही राजसिंहासन मिळता कामा नये. प्रजेने आपल्या मताधिकार्याने राज्यकर्ते निवडावे, तसेच प्रजेचे हित राजाने जपायला पाहिजे.”
“शीलसंन्यास” हे वीर वामनराव दादांचे लिहिलेले व रंगमंचावर न येऊ शकणारे नाटक.
१९२० मध्ये पुणे येथे “नूतन आर्यभूषण” नाट्यगृहात “श्री सिद्धराज प्रासादिक संगीत नाटक मंडळी” यांच्या वतीने एक नाट्यसंमेलन आयोजित करण्यांत आले. या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद दादांनी भूषविले. या संमेलनात नाटककारांनी आपली नाटके राष्ट्रोन्नतीला पोषक होतील याप्रमाणे करावीत असा ठराव संमत करण्यांत आला.
२७ जानेवारी १९४६ रोजी मुंबई येथे मराठी साहित्य संघाच्या नाट्यमहोत्सवाच्या अध्यक्षपदी दादा होते. हा नाट्यक्षेत्रातील एक मोठा सन्मान होता. एक क्रांतिकारक, एक नाटककार, एक स्वतंत्र सेनानी, एक गीतकार, एक पत्रकार अश्या कितीतरी भूमिका पार पाडत, राष्ट्रोन्नतीत दादांनी आपले योगदान दिले. एवढे कर्तृत्ववान हे व्यक्तिमत्व.
त्यांना विनम्र आदरांजली.
भारत माता कि जय !
प्रदीप जोशी, पुणे
मोबाईल: 9423043173.
Comments