विठ्ठलाच्या भक्तीत
झाली कान्होपात्रा दंग
कधी भेटेल विठाई
पंढरीचा पांडुरंग !!
कशी जाऊ पंढरीस
कोण नेईल मजला
कान्होपात्राच्या मनीचे
गुज कळले विठ्ठला !!
मंगळवेढ्याची वारी
निघाली पंढरपुरी
कान्हा वारीत सामील
शेव तिचा डोईवरी !!
झाला राऊळी आनंद
आनंद विठ्ठलाचे मनी
नाथा, कशाची ही खुशी
पुसे..हसून रुख्मिणी !!
लेक माझी येते आहे
मला भेटायला
रूख्मिणी,
अंतरीची खूणगाठ
कशी दाखवू तुजला ?
येतेय माझी लेक
मी जातो वेशीपाशी
तू कर स्वयंपाक
कान्हा माझी उपवाशी !!
थकली माझी पोर
सुकलेल्या फुलावानी
आधी देशील नं तिला
हळूच गुळपाणी ?
नाथ, असे कसे निघालात ?
शेला खांद्यावर घ्या ना
लेकीला जवळ घेण्या
हात कमरेचे काढा ना !!
किती घाई देवा ..
लावा ना चंदनाचा टिळा
आणि कैसे विसरलात
तुळस मंजिरीच्या माळा?
हसला पांडुरंग
हसली रूखमाई
लेकीला भेटण्याची
दोघांनाही घाई !!
कवयित्री: विजया ब्राह्मणकर (नागपूर)
Comments