आमच्याकडे एक आंब्याचे रोपटे होते.असेच एका समारंभामध्ये वडिलांना भेट म्हणून मिळाले होते. घरी आणल्यानंतर बराच काळ तसेच त्या पॅक असलेल्या प्लास्टिक च्या पिशवीत एकदम बंद होते. आम्ही रोज पाणी घालायचो त्या रोपट्याला. आमच्या घराच्या छोट्या बागेमध्ये आधीच दोन आंब्याची झाडे आहेत म्हणून हे नवीन रोपटे कोणालातरी भेट द्यायचे ठरिवले होते. पण काही कारणास्तव ते काही शक्य झाले नाही आणि मातीमध्ये लावणे पण खूप लांबणीवर पडले. मात्र आम्ही रोज त्या रोपट्याला पाणी द्यायचो. तरी देखील , ते झाड ताजेतवाने वाटत नव्हते, अगदी आणले होते तेवढेच होते. आणि काही काळानंतर तर थोडे सुकायला लागले. मग मात्र सगळे बाकीचे सगळे काम सोडून , मी आणि वडिलांनी ते झाड आमच्या घराच्या बागेमध्ये मातीमध्ये लावले.त्याला व्यवस्थित पाणी दिले. आणि काय आश्चर्य , दोनच दिवसात त्या रोपट्याला नवीन पालवी फुटली. आम्ही घरात एकमेकांना सांगत, दाखवत खूप आनंदित झालो. याच आंब्याच्या रोपट्याचे मातीत लावल्यानंतरचे चित्र मी या लेखाचे मुखपृष्ठ म्हणून ठेवले आहे. त्या मध्ये तुम्ही पाहू शकता की या फोटो मध्ये तुम्हाला सुकलेली पाने ही दिसत आहेत आणि नवीन पालवी फुटलेली पाने देखील दिसत आहेत.
या प्रसंगामधून आपसूकच एक विचार मनात दाटु लागला....
तो म्हणजे.... घुसमट ....
असे वाटते, त्या आंब्याच्या रोपट्याची प्लास्टिक पिशवीमध्ये खूप घुसमट होत असावी, करण गरजेपेक्षा जास्त काळ ते त्या मध्ये राहिले. त्याच्या जीवाची खूप उलघाल होत राहिली असेल. जीव तळमळला असेल. आणि अशातच , त्याला मातीमध्ये, म्हणजेच जिथे त्याने असायला हवे तिथेच नेल्यानंतर जणू काय त्याला एक जगण्याची नवीन आशा, उम्मीद मिळाली. आणि मग ते बहरू लागले.
असेच काहीसे होत नसेल का मनुष्याचे...माणसाचे...आपले...
एखाद्या विद्यार्थ्याला अमुक एक शिक्षणाचे क्षेत्र निवडायचे असते. पण नाही मिळत तिथे जायला. मग जी होते ती घुसमट. पण थोडा काळ गेल्यानंतर आहे तेच आवडू लागते. पण आयुष्यात कायमच ते आवडणारे ...आपण मागे सोडून आलेले क्षेत्र आठवत राहते.
एखादा व्यक्ति काही कारणास्तव स्वतःला ना आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये काम आणि नोकरी करत असतो. जरी नाईलाज असला, तरी घुसमट ही होतेच ना.काही काळ जबाबदारी, नाईलाज म्हणून तो त्याच ठिकाणी कामही करतो ,पैशांबरोबर अनुभव देखील कमावतो. पण स्वतःच्या पॅशन चे काय ? काही काळानंतर मग होऊ लागते चिडचिड, ताण आणि नैराश्य. आणि मग काहीच नको वाटते आणि जीव गुदमरू लागतो. पण या मध्ये काही जण असेही असतात जे आहे ते स्वकरतात आणि मिळालेल्या गोष्टींमध्येच आनंद आणि समाधान शोधतात. परंतु घुसमटीत जगणाऱ्यांचं काय होत असेल...?
हेच लग्नाच्या बाबतीत, मला ह्याच मुलीशी लग्न करायचे आहे, मला ह्याच मुलाशी लग्न करायचे आहे ;अशी काही लग्नाळू मुला-मुलींची खूप इच्छा असते. पण काही परीस्थिती अशा निर्माण होतात की त्यांचे त्यांनी ठरवलेल्या व्यक्तींबरीबर नाही होऊ शकत लग्ने. मग पुन्हा एकदा होते ती घुसमट..
आयुष्याच्या अशाच छोट्या मोठ्या प्रसंगांमध्ये माणसाची नेहमीच घुसमट होत असते. काही घुसमटिनमधून बाहेर पडणे खूप गरजेचे असते. नाहीतर आयुष्याला योग्य दिशाच रहात नाही आणि मग जीवन भरकटत जाते. परंतु , काही घुसमटिनमधून बाहेर पडणे खूप खूप गरजेचे असते. कारण ही घुसमट आपण स्वतः च आपल्याभोवती निर्माण केलेली असते, ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. म्हणूच अशी घुसमट वेळीच नष्ट केली पाहिजे.
यातुनच असे म्हणावेसे वाटते की , काही घुसमटी ह्या सकारात्मक असतात तर काही घुसमटी नकारात्मक असतात.
ज्याला ह्या दोघांमधील फरक समजतो, तोच आयुष्य जिंकू शकतो.
ज्याला ह्या दोघांमधील सुवर्णमध्य साधता येतो तोच यशस्वी आणि शांत जीवन जगू शकतो.
आयुष्यात,माणसाच्या अपेक्षा खूप असतात. तेही इतरांच्या बाबतीत. म्हणजेच पालकांची आपल्या मुला-मुलींकडून, नवऱ्याची बायकोकडून, बायकोची नवऱ्याकडून, बॉस ची आपल्या कर्मचाऱ्यांकडून ,अपेक्षा मित्र-मैत्रिणींकडून इत्यादी.
पण, एवढे एकच वाक्य कायम लक्षात ठेवले पाहिजे :
अपेक्षा ह्या स्वतःकडूनच ठेवाव्यात , म्हणजे पुढची सर्व घुसमट टाळता येते.
शेवटी काय सकारात्मकता हाच आयुष्याचा मूलमंत्र.
कु. मेराज मोहंमदसलीम बागवान
बारामती, पुणे
मो: ७३९७९८३५०५
ईमेल: mbagwan111@gmail.com
Comments